Headlines

मविआत बंड तंटायुक्त परिषद:विधान परिषद निवडणूक, शिरसाटांचा सतीश चव्हाणांना पाठिंबा, अब्दुल सत्तार चव्हाणांच्या विरोधात




विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीत महायुती, मविआतील बंडोबांनी तंटाबखेडा वाढवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करूनही पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपविरुद्ध बंडखोरीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम आहेत. त्यांना काही महिन्यांपूर्वीच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेतील पराभवाचे उट्टे काढायचे आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातही शिवसेनेविरुद्ध भाजपचे किमान तीन बंडखोर आहेत. मराठवाडा पदवीधरमध्ये शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी २४ तासांत पलटी मारत अजित पवार गटाच्या सतीश चव्हाणांना पाठिंबा जाहीर केला. पण शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी आपण शरद पवार गटासोबत असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे मराठवाडा पदवीधरमध्ये शरद पवार गट-काँग्रेसच्या विरोधात उद्धवसेना लढत आहे. नागपूरमध्ये काँग्रेसविरोधात शरद पवार समर्थक मैदानात आहेत. एकुणात बंडोबांमुळे सर्व लढती रंगतदार होणार आहेत. आता चव्हाणांना तन, मन, धनाने पाठिंबा : शिरसाट मराठवाडा पदवीधरचे अजित पवार गटाचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी शनिवारी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेचा तन, मन, धनाने सतीश चव्हाण यांना पाठिंबा असल्याचे शिरसाट म्हणाले. महायुती एकत्रच -देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणाची कुणाशी जवळीक असली तरी पुण्यातील दोन्ही मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार आणि मंत्री महायुती, भाजपचे काम करतील. पुण्यात सचिन सानप अपक्ष आहेत. पदरात पाडून घेण्यासाठी ही व्यूहरचना असू शकते पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत पसंतीक्रमानुसार मतदान होते. विजयासाठी ‘एकूण वैध मतांपेक्षा एक जास्त मत’ असा कोटा असतो. पहिल्या पसंतीत कोणताही उमेदवार विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करू शकला नाही तर पहिल्या पसंतीच्या मतांपैकी सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराला मिळालेल्या दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. विजयाचा कोटा पूर्ण होईपर्यंत प्रत्येक फेरीत शेवटच्या क्रमांकावरील उमेदवाराला मिळालेल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. त्यामुळे युती, आघाडीतील बंडखोरीमागे दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी व्यूहरचना असावी. काँग्रेसच्या भूूमिकेने उद्धवसेनेत नाराजी मराठवाडा पदवीधरमध्ये काँग्रेसने शरद पवार गटाला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे उद्धवसेनेत नाराजी व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या खासदारांना लोकसभा लढायची नाही का, असा सवाल उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला. सचिन सानप यांच्यासाठी मंगेश चिवटे मैदानात पुणे शिक्षक मतदारसंघात उपमुख्यमंत्री शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटेंनी माघार घेतली असली तरी मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय सचिन सानप यांना शिंदेंनी स्वत: पाठिंबा जाहीर केला. चिवटे सानपांसाठी मैदानात उतरले आहेत. काही ठिकाणी अपवाद -एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने त्यांना पाठिंबा (सचिन सानप) दिला आहे. काही ठिकाणी अपवाद वगळता ही विधान परिषदेची निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढतोय आणि पाचही जागा महायुतीच जिंकेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *