Headlines

'दुष्काळाकडे समस्या म्हणून नव्हे, संधी म्हणून पाहा':IAS तुकाराम मुंढेंचा खचलेल्या शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला, काय म्हणाले मुंढे?




पिंपरी-चिंचवड येथे आयोजित ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो’मध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दुष्काळाकडे केवळ एक समस्या म्हणून न पाहता त्यातून नव्या संधी शोधण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. दुष्काळाची कारणमीमांसा करून पुढील सहा ते सात महिन्यांत त्यावर मात करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, या संकटकाळातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला दुग्ध व्यवसाय, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान आणि जलसंधारणासारख्या शाश्वत पर्यायांची जोड द्यावी, असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन त्यांनी या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमात बोलताना तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन केल्यास कमी पाण्यात चारा उपलब्ध करणे शक्य होऊ शकते. या पद्धतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना योग्य माहिती देणे आवश्यक आहे, दर्जेदार दूध उत्पादन, दुग्ध प्रक्रिया आणि दुधावर आधारित उद्योगांमधूनही ग्रामीण भागात व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात. पाणी टिकून ठेवण्यासाठी उपाययोजना गरजेची पुढे बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, दरवर्षी टँकर आणि ट्यूबवेलची मागणी केली जाते. मात्र या उपायांचा दीर्घकालीन परिणाम काय होतो, याचा विचार करायला हवा. गावातील पाण्याचे स्रोत, विहिरी आणि ट्यूबवेल आटत असताना पावसाचे पाणी वाहून जाण्यापासून रोखणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. गावातील रस्ते आणि इतर बांधकामांसाठी काँक्रिटीकरण करताना पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता यांचाही विचार करायला हवा. आवश्यक ठिकाणी बांधकाम करावे. मात्र पावसाचे पाणी गावात आणि शेतात टिकून राहील, यासाठी नियोजन असणे गरजेचे असल्याचे मुंढे यांनी म्हटले आहे. दुग्ध व्यवसायातून ग्रामीण विकासाच्या संधी तुकाराम मुंढे यांनी ग्रामीण भागातील उत्पन्नाचा एक सक्षम पर्याय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. अन्न व औषध प्रशासन तसेच पशुसंवर्धन विभागात काम करताना आलेला अनुभव विषद करताना त्यांनी देशातील दुधाची वाढती मागणी, उत्पादकांना मिळणारा दर आणि या क्षेत्रातील विपुल संधींचा उल्लेख करत, या व्यवसायाकडे केवळ जोडधंदा नव्हे तर उद्योजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज निदर्शनास आणून दिली. ग्रामीण भागात हा व्यवसाय सुरू करण्यासाठी चारा आणि पाण्याचे योग्य नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र पारंपरिक पद्धतींना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी पाण्यातही दर्जेदार चारा उत्पादन घेऊन दुग्ध व्यवसायातून उत्पन्नाच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात, असे मुंढे म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *