“राज्याची राजधानी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार आणि हत्येचे सत्र सुरू आहे. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडल्या गेल्या, ठाण्यात राजकीय कार्यकर्ते प्रदीप पुर्णेकर यांची न
.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट शरसंधान साधले. तसेच सत्ताधाऱ्यांचा ‘रेझिम चेंज’ (सत्तापालट) केल्याशिवाय जनता शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
सामान्य कार्यकर्त्याच्या हत्येनंतर सांत्वनालाही वेळ नाही!
ठाण्यातील गुन्हेगारीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार करताना संजय राऊत म्हणाले, “काल टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने अभिनेत्याच्या घरी पोहोचले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले तर केवळ रडायचेच बाकी होते. बॉलिवूड, हॉलिवूड आणि उद्योगपतींवर गोळ्या चालल्या की यांना प्रचंड काळजी वाटते, त्यांना झेड प्लस (Z+) सुरक्षा देण्याच्या चर्चा सुरू होतात.”
पुर्णेकरांच्या हत्येकडे दुर्लक्ष
“दुसऱ्या बाजूला स्वतः एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरासमोर राजकीय कार्यकर्ते प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली. मात्र, ठाण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री असूनही शिंदे पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करायला गेले नाहीत. या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी गटाच्या स्थानिक नेत्यांसोबत उघडपणे दिसत आहेत. आरोपींना वाचवण्याचे काम गृहखाते करत असल्यामुळेच मुख्य आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.”
गृहमंत्री फडणवीस विरोधकांना अडकवण्यात व्यस्त
राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढताना ते म्हणाले, “महाराष्ट्राला एक पूर्णवेळ आणि सक्षम गृहमंत्री हवा आहे, अशी मागणी आम्ही सातत्याने करतोय. मात्र, गृहखात्याचा वापर गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी न होता केवळ राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्यासाठी आणि तुरुंगात डांबण्यासाठी केला जात आहे. त्यामुळेच माफिया टोळ्यांना कायद्याची किंवा पोलिसांची कोणतीही भीती उरलेली नाही.”
‘गजनी’ झालेली सत्ता
“राज्यातील रोजच्या हत्या आणि गोळीबारावर जाब विचारला की मुख्यमंत्री 40 आणि 50 वर्षे जुना इतिहास काढून विरोधकांकडे बोट दाखवतात. मोदी अजूनही नेहरूंच्या काळात आणि अमित शाह राजीव गांधींच्या काळात अडकले आहेत. केंद्रात 12 वर्षे तुमची सत्ता आहे, महाराष्ट्रात 5 वर्षे तुमची सत्ता आहे; मग तुम्ही काय करत आहात? काल झालेल्या हत्यांवर बोलायचे सोडून 50 वर्षांपूर्वीचा पाढा वाचणे म्हणजे मेंदूला बधिरता आल्याचे लक्षण आहे.”
साबरमतीतून लॉरेन्स बिश्नोईला बाहेर का काढले जात नाही?
बॉलिवूडमधील वाढत्या खंडणी आणि गोळीबाराच्या घटनांवर भाष्य करताना राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्रालयावर गंभीर आरोप केले. “मुंबई पोलिसांना अनेक प्रकरणांत साबरमती तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करायची आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याला साबरमतीतून बाहेर पडू देत नाहीत, त्याला पाठीशी घातले जात आहे. गुंड टोळ्या आणि राजकीय सत्तेची मिलीभगत झाल्यामुळेच कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. आज कलाकारांवर गोळ्या झाडणाऱ्या टोळ्यांचा वापर उद्या विरोधकांवर हल्ले करण्यासाठी केला जाईल, अशी भीती निर्माण झाली आहे.”
अमित शहांवर निशाणा
“कृष्ण मेनन रोडवरील बंगल्यात 1 लाख सशस्त्र जवानांच्या सुरक्षेत बसणाऱ्या देशाच्या गृहमंत्र्यांना देशाच्या आर्थिक राजधानीतील या जंगलराजाची लाज वाटली पाहिजे.”
दसरा मेळाव्यातून ‘रेझिम चेंज’चा अंतिम एल्गार!
पक्षांतर आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी ठाम भूमिका मांडली. “सत्तेच्या आणि तपास यंत्रणांच्या गैरवापरातून आमदार फोडणे सोपे असते. उद्या महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या हातात सत्ता येऊ द्या, मग तुमचे किती आमदार आणि खासदार पळतात ते संपूर्ण महाराष्ट्र बघेल.”
दसरा मेळाव्यातून रणशिंग
“शिवसेनेची स्थापना होऊन आता 60 वर्षे पूर्ण होत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने अनेक जय-पराजय आणि संघर्ष पाहिले आहेत. शिवसेना आता परिपक्व आणि अनुभवी झाली आहे. उद्या होणारा दसरा मेळावा अत्यंत ऐतिहासिक ठरणार असून या भ्रष्ट आणि बेकायदेशीर सरकारचा ‘रेझिम चेंज’ करण्यासाठी शिवतीर्थावरून अंतिम एल्गार पुकारला जाईल,” असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
——————————————————————-
हेही वाचा…
आरोपींचे आका कुठेही लपलेले असोत, त्यांना शोधून काढू: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा गँगस्टर्सना इशारा

जुहूसारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या धक्कादायक घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या तपासाची माहिती दिली. पोलिसांनी रातोरात आरोपींची ओळख पटवली असून, हे भ्याड हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड (आका) जगाच्या पाठीवर कुठेही लपले असले, तरी त्यांना शोधून काढले जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी