![]()
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास तातडीने सुरू केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तपासाचा आढावा घेतल्याचे बन यांनी सांगितले. मात्र, या घटनेवरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांनी महाविकास आघाडीच्या सत्ताकाळातील घटनांचाही विचार करावा, असे ते म्हणाले. ‘महाविकास आघाडीच्या काळातील घटनांची आठवण ठेवा’ नवनाथ बन यांनी पत्रकारांशी बोलताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील काही घटनांचा उल्लेख केला. पालघर साधू हत्याकांड, अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणांचा दाखला देत त्यांनी विरोधकांवर टीका केली. या घटनांवरून तत्कालीन सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवटीच्या मागणीबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले. नवनाथ बन यांनी काढली मविआ काळातील घटनांची आठवण: पालघर साधू हत्याकांड (एप्रिल २०२०): दोन साधू आणि त्यांच्या चालकाची मॉब लिंचिंग करून हत्या करण्यात आली. तेव्हा राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही? असा सवाल बन यांनी विचारला. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरण (२०२०): या मृत्यू प्रकरणांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. दिशा सालियानचे वडील आजही न्याय मागत आहेत. अँटिलिया आणि सचिन वाझे प्रकरण: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी गुंडांचा नाही, तर सचिन वाझे या पोलिसाचा वापर करण्यात आला. एका उद्योगपतीकडून वसुली करण्यासाठी खाकी वर्दीचा वापर झाला, याला माफियाराज म्हणतात. मनसुख हिरेन हत्या (मार्च २०२१): मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत सापडला. या हत्या प्रकरणात सचिन वाझेची भूमिका संशयास्पद असतानाही, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वाझे काय लादेन आहे का?’ असे म्हणत त्याचे समर्थन केले होते. १०० कोटींची वसुली: तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काळात रोज १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट आणि बदल्यांचे घोटाळे झाले. संजय राऊत, उद्धव ठाकरे, रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांना त्यांच्याच काळातील या ‘जंगलराज’चा दुर्दैवाने विसर पडला आहे, अशी सडकून टीका नवनाथ बन यांनी केली आहे. ———— हेही वाचा.. महाराष्ट्रात गँगस्टर राज, राज्यात राष्ट्रपती राजवट लावा!:संजय राऊतांची मागणी, दसरा मेळाव्यातून ‘रेझिम चेंज’च्या एल्गाराची घोषणा
“राज्याची राजधानी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार आणि हत्येचे सत्र सुरू आहे. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडल्या गेल्या, ठाण्यात राजकीय कार्यकर्ते प्रदीप पुर्णेकर यांची निर्घृण हत्या झाली आणि आता टायगर श्रॉफच्या गाडीवरही गोळीबार झाला. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून गुंड टोळ्या मोकाट सुटल्या आहेत. जनतेच्या जीविताचे रक्षण करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या राज्यात उघडपणे ‘जंगलराज’ सुरू असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्यपालांनी राज्यात तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी,” अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सविस्तर वाचा
Source link