“मुंबई आणि महाराष्ट्रावर सिनेक्षेत्रातील कलाकारांचा, दिग्दर्शकांचा आणि तंत्रज्ञांचा मोठा विश्वास आहे. हा विश्वास मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आधारलेला आहे. परदेशात बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या देणे किंवा शूटर पाठवून गोळीबार करून दहशत निर
.
अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर जुहू येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत राज्य शासनाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी कलाकारांची सुरक्षा, बिश्नोई गँगची कार्यपद्धती, विरोधी पक्षनेत्यांचे आरोप आणि ठाण्यातील पुर्णेकर प्रकरणावर उत्तरे दिली.
परदेशातील गँगस्टर्सचे कंबरडे मोडणार
बॉलिवूड सेलिब्रिटींना मिळणाऱ्या धमक्यांवर बोलताना गृहराज्यमंत्री कदम म्हणाले, “मागच्या विधिमंडळ अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेला आला होता. त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री आणि मी सरकारची भूमिका सभागृहात स्पष्ट केली होती. परदेशात सुरक्षित बसून स्थानिक पातळीवर तरुणांची माथी भडकवणे आणि गोळीबार घडवून खंडणी उकळणे, ही टोळ्यांची पद्धत ठेचून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांची मदत घेतली जात आहे.”
सुरक्षेचे ‘थ्रेट परसेप्शन’ ऑडिट
“टायगर श्रॉफ असो वा इतर सेलिब्रिटी; पोलीस यंत्रणा ‘थ्रेट परसेप्शन’चे (धोक्याची पातळी) तांत्रिक विश्लेषण करून आवश्यकतेनुसार अतिरिक्त सुरक्षा पुरवत असते. भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा समाजकंटकांचा डाव कधीही यशस्वी होऊ दिला जाणार नाही. कोणालाही कसलीही धमकी आल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, पोलीस त्यांना संपूर्ण संरक्षण देतील.”
राकेश रोशन यांच्यावरील हल्ल्याचा संदर्भ
90च्या दशकात चित्रपट निर्माते राकेश रोशन यांच्यावर झालेल्या गोळीबाराप्रमाणेच केवळ धमकावणे आणि पब्लिसिटी मिळवणे हा या टोळ्यांचा हेतू असल्याचे स्पष्ट करत, जुन्या काळातील गँगवॉरची पुनरावृत्ती मुंबईत होऊ दिली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

पूर्णेकर हत्येवर विरोधकांनी राजकारण थांबवावे
ठाण्यातील राजकीय कार्यकर्ते प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, “एखाद्या व्यक्तीचा असा दुर्दैवी मृत्यू होतो, तेव्हा कुटुंबावर काय संकट कोसळते याची सरकारला पूर्ण जाणीव आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी केवळ राजकीय पोळ्या भाजण्याचे काम करू नये. घटनेनंतर आमचे मंत्री प्रताप सरनाईक प्रत्यक्ष भेटायला गेले होते. विरोधक केवळ पोलीस ठाण्यात बसून राजकीय मागण्या करत होते, त्यांच्याकडे कोणतेही थेट पुरावे नव्हते. पुर्णेकर हत्या प्रकरणात तपासादरम्यान ज्या कोणाचे नाव निष्पन्न होईल आणि ज्यांच्याविरोधात भक्कम पुरावे मिळतील, त्या प्रत्येकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणालाही वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
उद्योजकांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवणाऱ्यांनी आम्हाला प्रशासन शिकवू नये!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लावण्याची केलेली मागणी कदम यांनी पूर्णपणे फेटाळून लावली. “संजय राऊतांचे नेते मुख्यमंत्री असताना काय घडले होते? निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेऊन देशातील आणि जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि बॉम्ब ठेवण्याचे काम त्यांच्याच काळात झाले. साधूंची हत्या झाली. स्वतःच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात सरकार आणि गुन्हेगारांचे कसे लागेबांधे होते, हे विसरून आज ते आम्हाला कायदा आणि प्रशासन शिकवत आहेत, हे हास्यास्पद आहे.”
50 आमदार गेले तरी गृहमंत्र्यांना कळले नाही
“राऊत म्हणतात पूर्णवेळ गृहमंत्री पाहिजे; पण महाविकास आघाडीत पूर्णवेळ गृहमंत्री असताना 100 कोटींच्या वसुलीचे आरोप झाले, थेट मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांचा प्रशासनावर कंट्रोल उरला नव्हता आणि 50 आमदार निघून गेले तरी त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना पत्ता लागला नाही. अशी निष्क्रियता असलेल्या लोकांनी आमच्यावर बोट दाखवू नये.”
फडणवीसांच्या नेतृत्वात कायदा व सुव्यवस्था अबाधित!
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचे समर्थन करताना योगेश कदम म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 7 वर्षांत गृहखाते अत्यंत सक्षमपणे आणि संयमाने हाताळले आहे. राज्यात अनेक मोर्चे आणि संवेदनशील आंदोलने झाली; मात्र सामान्य जनतेला आणि संविधानाला कुठेही धक्का न लावता पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित राखली. हे पोलिसांचे काम कौतुकास्पद आहे. विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने ते नैराश्यातून असे बिनबुडाचे आरोप करत आहेत.”
—————————————————
हेही वाचा…
शिक्षकांना धमकावले तर अनुदान बंद करू, गय करणार नाही!:महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा, म्हणाले- फडणवीसांवर बोलताना राऊतांनी आधी स्वतःचा आकार बघावा!

“अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काही शिक्षण संस्थाचालक शिक्षकांना धमकावत असून ‘काँग्रेसला मतदान केले नाही तर नोकरीवरून काढून टाकू’, अशी उघड गुंडगिरी करत आहेत. सरकारी अनुदानावर चालणाऱ्या आणि शासनाकडून पगार घेणाऱ्या शाळांमध्ये ही मग्रुरी कदापि खपवून घेतली जाणार नाही. अशा संस्थाचालकांची रीतसर चौकशी करून त्यांचे शासकीय अनुदान कायमचे बंद केले जाईल. शिक्षकांनी कोणाच्याही दबावाला किंवा धमकीला घाबरण्याची गरज नाही, सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे,” असा थेट आणि सज्जड दम महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी