Headlines

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून उदयनराजेंची माघार:म्हणाले, ‘का मीच पाहिजे सगळीकडे? सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे’




सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत त्यांनी ही माघार घेतल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या माघारीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ‘सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. का मीच पाहिजे सगळीकडे?’ अशी भूमिका मांडत उदयनराजेंनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, बँक नागरी पतसंस्था मतदारसंघातून माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांचा प्रथमच सातारा जिल्हा बँकेत प्रवेश होणार आहे. उदयनराजे भोसले यांनी अर्ज माघारीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयानेच संपूर्ण निर्णय घेतला आहे की, 10 वर्षे ज्यांची झाली असतील, ते पात्र ठरू शकत नाहीत. कायद्याचे पालन केले पाहिजे. त्यामुळे आज माझा फॉर्म विथड्रॉ केला.” कायद्याचा आदर राखून आपण अर्ज मागे घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता इतर उमेदवारांना संधी मिळण्याचा मार्ग खुला झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘का मीच पाहिजे सगळीकडे?’ उदयनराजेंनी माघार घेतल्यानंतर सामान्य कार्यकर्त्यांनाही संधी मिळणार का, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना त्यांनी सर्वांना संधी मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. “सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. का मीच पाहिजे सगळीकडे? सगळ्यांना कुणी पण,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होत आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणात अनेक वर्षांपासून प्रभाव असलेल्या नेत्यांच्या भूमिकांकडे सर्वांचे लक्ष लागले असताना उदयनराजेंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. नाराजीच्या चर्चेवर उदयनराजेंचे मिश्किल उत्तर उदयनराजेंनी अर्ज मागे घेतल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा सुरू असल्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले. त्यावर त्यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिले. “नाराज असतो तर असं झालं असतं का? नाराज कशामुळे? नाराज काय असतं?” असा सवाल त्यांनी केला. निर्णयाच्या स्वागताबाबत विचारले असता, “तुम्हा सगळ्यांना पार्टी देतो या!” असे म्हणत त्यांनी उपस्थित पत्रकारांमध्ये हशा पिकवला. त्यांच्या या उत्तरामुळे माघारीनंतरच्या पत्रकार परिषदेत वातावरण हलकेफुलके झाले. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा जिल्हा बँकेत प्रवेश दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बँक नागरी पतसंस्था मतदारसंघातून माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या माध्यमातून त्यांचा प्रथमच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रवेश होणार आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणात हा महत्त्वाचा बदल मानला जात आहे. या निवडणुकीत खासदार नितीन पाटील यांनीही माघार घेतली आहे. तसेच बँका नागरी पतसंस्था मतदारसंघातून आमदार मनोज घोरपडे आणि अविनाश कदम यांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील समीकरणे बदलली असून, विविध मतदारसंघांतील उमेदवारांच्या माघारीमुळे निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होत आहे. एकीकडे उदयनराजे भोसले यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत माघार घेतली, तर दुसरीकडे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पुढील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाच… 500 कोटींच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे जरांगेंना प्रत्युत्तर:‘पुरावे असतील तर यंत्रणांकडे द्या, दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या’ मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून केलेल्या आरोपांना शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी 500 कोटी रुपये कोणाला दिलेही नाहीत आणि कोणाकडून घेतलेही नाहीत. आरोप करण्यापूर्वी त्याची शहानिशा करायला हवी होती. जरांगे यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते संबंधित यंत्रणांकडे द्यावेत. या प्रकरणाची चौकशी होऊन दूध का दूध, पानी का पानी झाले पाहिजे,’ असे शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या विधानावरूनही शिंदे यांनी विरोधकांना लक्ष्य केले. मोदी आणि शाह यांच्यावर आरोप केले की त्याची ब्रेकिंग न्यूज होते, असा टोला लगावत त्यांनी विरोधकांवर सत्तेविना तडफडत असल्याची टीका केली. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *