![]()
मुलांची उंची वाढावी, शरीराची चांगली वाढ व्हावी आणि ताकद मिळावी, यासाठी त्यांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. दूध, अंडी, पनीर यांसोबतच प्रोटीन पावडर, प्रोटीन बार आणि प्रथिनयुक्त पदार्थांना पसंती दिली जात आहे. मात्र, बहुतांश निरोगी मुलांना संतुलित घरगुती आहारातूनच पुरेशी प्रथिने मिळू शकतात. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक प्रथिने देण्याचा आग्रह धरण्याची आवश्यकता नाही, असे आहारतज्ज्ञ डॉ. इंशारा मुस्तफा यांनी स्पष्ट केले. मुस्तफा म्हणाले, प्रथिने ही शरीरातील पेशी आणि ऊतींची निर्मिती, स्नायूंचा विकास, हार्मोन्सची निर्मिती तसेच रोगप्रतिकारक शक्तीच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असतात. मात्र, प्रत्येक मुलाची प्रथिनांची गरज त्याचे वय, वजन, वाढीचा वेग आणि शारीरिक हालचाली यांनुसार बदलते. त्यामुळे सर्व मुलांना सारख्याच प्रमाणात प्रथिने देणे योग्य नाही. वयानुसार प्रथिनांची गरज आयसीएमआर-एनआयएनच्या २०२० मधील शिफारशींनुसार, एक ते तीन वर्षांच्या मुलांना दररोज सुमारे १२.५ ग्रॅम, चार ते सहा वर्षांच्या मुलांना १६ ग्रॅम, तर सात ते नऊ वर्षांच्या मुलांना सुमारे २३ ग्रॅम प्रथिनांची गरज असते. दहा ते बारा वर्षांच्या मुलांसाठी हे प्रमाण सुमारे ३२ ते ३३ ग्रॅम असू शकते. डाळी, कडधान्ये, दूध, दही, पनीर, अंडी, मासे, चिकन, सोयाबीन, सुका मेवा आणि बिया हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. या पदार्थांचा मुलांच्या आहारात योग्य समावेश केल्यास प्रथिनांची गरज भागवता येते. त्यासाठी महागडे पूरक पदार्थ खरेदी करणे आवश्यक नाही. अतिरिक्त प्रथिनांचा आग्रह टाळा डॉ.मुस्तफा म्हणाले, केवळ मूल बारीक आहे, भरपूर खेळते किंवा त्याचे स्नायू पुरेसे विकसित झालेले नाहीत, म्हणून त्याला अतिरिक्त प्रथिने किंवा प्रोटीन पावडर देण्याची गरज असेलच असे नाही. संतुलित आहाराऐवजी केवळ प्रथिनयुक्त पदार्थांवर भर दिल्यास कर्बोदके, आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या अन्य पोषक घटकांकडे दुर्लक्ष होऊ शकते. मूत्रपिंडाशी संबंधित आजार असलेल्या मुलांना अतिरिक्त प्रथिने देताना विशेष काळजी आवश्यक असते. मुलाची वाढ योग्य होत नसेल, आहार अत्यंत मर्यादित असेल किंवा वैद्यकीय समस्या असतील, तर बालरोगतज्ज्ञ अथवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच पूरक आहार द्यावा. जाहिराती किंवा सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे प्रोटीन पावडर देण्याऐवजी मुलांना विविध पदार्थांचा समावेश असलेला संतुलित आहार देणे अधिक महत्त्वाचे आहे.
Source link
निरोगी मुलांना प्रोटीन पावडरची गरज नाही:संतुलित घरगुती आहार पुरेसा असतो – आहारतज्ज्ञ डॉ. इंशारा मुस्तफा