![]()
शिक्षण कधीही थांबवू नका, कायम नवनवीन गोष्टी शिकत राहा. एमएड पूर्ण झाल्यानंतर नेट, सेट आणि पीएचडीपर्यंत मजल मारा. शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, असे स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी सातत्याने ज्ञानार्जन करावे असे आवाहन शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी देसाई यांनी केले. विद्या प्रतिष्ठान (महाराष्ट्र) नगर केंद्र संचलित डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पदव्युत्तर महाविद्यालय व संशोधन केंद्र येथे एमएड प्रथम वर्षाच्या विद्यार्थी शिक्षक व शिक्षिकांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शिवाजीराव बालकू देसाई होते. यावेळी प्रा. सुनील वाकचौरे, प्रा. मनीषा वर्पे-सहाणे, दीपक आढाव, दर्शन राहिंज उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे व्हावे, प्रगती करावी आणि आपल्या आई-वडिलांसह गुरुजनांचे व शिक्षण संस्थेचे नाव उज्ज्वल करावे, तसेच जीवनात यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छा प्राचार्य डॉ. देसाई यांनी दिल्या. तसेच त्यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षिकांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले. शिक्षणाचे सामर्थ्य आणि ज्ञानातून निर्माण होणाऱ्या आत्मविश्वासाचे महत्त्व त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून उपस्थितांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व विद्यार्थी शिक्षक मनोगत विद्यार्थी शिक्षक प्रतिनिधी कुलदीप कुलकर्णी यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतातून नव्या शैक्षणिक प्रवासाविषयीच्या भावना व्यक्त केल्या. तसेच प्रेरणादायी कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. “आम्ही पुन्हा आलो’ या कवितेतून त्यांनी महाविद्यालयातील नव्या शैक्षणिक प्रवासाची, नव्या स्वप्नांची आणि ‘चाय पे चर्चा’च्या माध्यमातून ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची भावना व्यक्त केली. तर “फक्त हिमतीने लढ’ या कवितेतून प्रतिकूल परिस्थिती, संघर्ष आणि अडचणींना न घाबरता जिद्दीने पुढे जाण्याचा हृदयस्पर्शी संदेश दिला. त्यांच्या ओघवत्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच, विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका यांनी त्यांच्या काव्यसादरीकरणाचे कौतुक केले. विद्यार्थी शिक्षिका वंदना राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, अभ्यासक्रमाबाबत अपेक्षा आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवासाबद्दल आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थी शिक्षक चेतन बटवल यांनी आभार मानले. नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात, परस्पर परिचय, स्नेहभाव आणि प्रेरणादायी विचारांची देवाणघेवाण यांमुळे स्वागत समारंभ आनंददायी वातावरणात पार पडला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Source link
शिक्षणाला वयाची मर्यादा नाही, सातत्याने ज्ञानार्जन करा, शिक्षणशास्त्र महाविद्यालयात एमएड प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत