Headlines

सत्तेसाठी मराठा-ओबीसींमध्ये वाद:भाजप अन् शिंदे गट सत्तेसाठी भुकेले; 500 कोटींच्या क्लिप प्रकरणाची चौकशी करा- विजय वडेट्टीवार




या सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. भाजप आणि शिंदे गट शिवसेना सत्तेसाठी भुकेले आहेत. ओबीसी असो की मराठा, या समाजापैकी कोणाचेही आरक्षण न काढता न्याय देण्यात यावा आणि कोणाचेही नुकसान होऊ नये, ही आमची भूमिका होती. पण सत्तेतील या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी अजूनही स्पर्धा सुरूच आहे. एकनाथ शिंदे आणि देवाभाऊ यांनी मराठा-ओबीसींमध्ये वाद लावून राज्यातील जनतेचे वाटोळे केले आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुती सरकारने सत्तेत येण्यासाठी दोन समाजांमध्ये भांडणे लावण्याचे काम केले आणि त्या माध्यमातून आपली खुर्ची मिळवली. आता खुर्चीसाठी सुद्धा त्यांच्यात प्रचंड वाद सुरू आहेत. काल जी क्लिप बाहेर आली, ती कोणी आणली याची चौकशी झालीच पाहिजे. असा आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे आणि त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ती कुठल्या स्तरावर व्हावी, हे सत्तेत बसलेल्या लोकांनी ठरवले पाहिजे. भाजप-शिंदे गटात दरी वाढली विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्तेतील दोन्ही पक्षांची भांडणे विकोपाला गेली आहेत. त्यातच महाराष्ट्रात बेरोजगारी, दुष्काळ, पेपर लीक आणि एमपीएससीची वाट लागली आहे. असे असताना केवळ क्लिप बाहेर काढत सत्तेसाठी कुठल्या स्तराला जावे, हे सत्तेतील लोकांना ठाऊक आहे, जनतेला नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. कोणाचा जीव गेला काय आणि कोणी भांडत मेले काय, यांना त्याचे काहीही पडलेले नाही. कालच्या क्लिपच्या माध्यमातून दोन पक्षांमधील दरी अत्यंत वाढली असल्याचे आता लपून राहिलेले नाही. कोण बदनाम करतंय पुढे यावे विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, 500 कोटी रुपयांची जी क्लिप आली आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. कोणाची चौकशी करावी, कोण जवळचे आणि कोण दूरचे, यापेक्षा निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, हे आमचे स्पष्ट मत आहे. ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करून वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. यामध्ये कोण कोणाला बदनाम करत असेल, तर ते सुद्धा जनतेसमोर आले पाहिजे. परदेश दौरे करून काय फायदा? विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने आधी दुष्काळ निवारणासाठी काम केले पाहिजे. इथे लोकांना खायला अन्न नाही, मग परदेश दौरे करून काय फायदा? असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांनी बाहेर देशात जाऊन तिथले तंत्रज्ञान शिकले पाहिजे, ते शिकू नये असे आमचे काही म्हणणे नाही. 180 काय, पण गरज पडल्यास दोन हजार शेतकऱ्यांना बाहेर देशात पाठवा. पण आजची परिस्थिती पाहता, आता शेतकऱ्यांना भरीव मदत करणे जास्त गरजेचे आहे. विधान परिषदेचा निकाल मविआच्या बाजूने लागेल विजय वडेट्टीवार म्हणाले की, नागपूर पदवीधर मतदारसंघात आम्ही 100 टक्के जिंकणार असून, जनतेने यांना नाकारले आहे हे उद्याच्या निकालातून स्पष्ट होईल. मतदान याद्यांमध्ये घोळ केल्याशिवाय भाजप निवडणूक जिंकू शकत नाही. त्यांच्या याद्या सदोष नसतात, तर ते बेईमानी करत निवडणुका जिंकत असतात. निवडणूक प्रामाणिकपणे लढवली पाहिजे. अनिल सोले यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यावर अन्याय झाला असून, त्यांच्या समर्थकांमध्ये आणि भाजपच्या लोकांमध्ये मोठी चीड आहे; ज्याचा परिणाम निवडणुकीवर होईल. अमरावती, नागपूर, पुणे आणि मराठवाड्यातील सर्वच जागांवर मविआचे उमेदवार विजयी होतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *