![]()
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या क्लिपमधील संभाषणावरून शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर अत्यंत सडकून टीका केली. ‘श्रीकांत शिंदेंना आंदोलन संपवण्यासाठी ५०० कोटी रुपये दिल्याची चर्चा क्लिपमध्ये आहे, मग हे पैसे गेले कुठे?’ असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. ‘५०० कोटी आले कुठून आणि गेले कुठे?’ ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत राऊत म्हणाले, “मनोज जरांगे खोटे बोलत आहेत का? हे आधी भाजपने सांगावे. या नाट्यातील सर्व पात्रे भाजपचीच आहेत. मनोज जरांगेंचे आंदोलन संपवण्यासाठी श्रीकांत शिंदेंना ५०० कोटी रुपये दिल्याचे यातून समोर येत आहे. जरांगे म्हणतात की त्यांच्यापर्यंत पैसे आलेच नाहीत. मग हे ५०० कोटी आले कुठून? गेले कुठे? आणि त्याचे झाले काय? हा प्रश्न अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पडला पाहिजे.” ‘ईडी आणि सीबीआय आता झोपलीये का?’ केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधताना राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “काल ईडीने स्त्री बीज प्रकरणात धाडी टाकून २९ लाख रुपये जप्त केले. तिथे ईडी तत्परता दाखवते, पण इथे ५०० कोटींचा विषय समोर येऊनही ईडीचे डोळे उघडत नाहीत, त्यांना ऐकू येत नाही. निवडणूक आयोगाप्रमाणेच या संस्थाही गुलाम झाल्या आहेत,” असा घणाघात राऊत यांनी केला. ‘AI चा दावा खोटा, रेकॉर्डिंगची यंत्रणा सत्ताधाऱ्यांकडेच’ भाजपकडून ऑडिओ क्लिप ‘एआय’ (AI) जनरेटेड असल्याचा दावा केला जात आहे, तो राऊत यांनी फेटाळून लावला. “फोन टॅपिंग आणि रेकॉर्डिंगची यंत्रणा भाजप आणि सत्ताधाऱ्यांकडेच आहे. त्यासाठी त्यांनी बाहेरून अधिकारी बसवले आहेत. ज्या काळात हे रेकॉर्डिंग झाले, तेव्हा ‘एआय’चा एवढा जोर नव्हता. त्यामुळे हे सर्व फॅब्रिकेटेड असल्याचा दावा खोटा आहे,” असे ते म्हणाले. ‘SIT म्हणजे तुमचाच दांडिया, तुमचाच ढोल’ भाजपने या प्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी करण्याची मागणी केली आहे, त्यावर राऊत म्हणाले, “एसआयटी काय असते? तुमचाच दांडिया आणि तुमचाच ढोल. देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत ११२ एसआयटी स्थापन केल्या असतील. पूर्वी अत्यंत दुर्मिळ प्रकरणात एसआयटी नेमली जायची, आता दररोज ५-६ एसआयटी स्थापन होतात. आता एसआयटीला काहीही महत्त्व राहिलेले नाही,” असा टोला त्यांनी लगावला. ‘जरांगेंनी पैशांचा खेळ उघड केला’ मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करताना राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून पैशांचा कसा खेळ सुरू आहे, याचा स्फोट जरांगे पाटील यांनी केला आहे. हे अत्यंत महत्त्वाचे काम त्यांच्याकडून घडले आहे. पैशाने आपण पक्ष, आमदार, खासदार आणि आंदोलने विकत घेऊ शकतो, अशी सत्ताधाऱ्यांची मानसिकता झाली आहे.” ———————- हेही वाचा.. शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर:1 लाख 15 हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तातडीने आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन
राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ची राज्यभरात अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्ज खाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यादी आता आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. सविस्तर वाचा
Source link
जरांगे खोटं बोलतायत का? भाजपने सांगावं, 500 कोटी कुठे गेले?:संजय राऊतांचा सवाल, ED-CBI गप्प का? महायुतीवर पैशांच्या खेळाचा आरोप