Headlines

एका दगडात 3 पक्षी मारण्याचा डाव कोणाचा?:कथित 500 कोटींची ऑडिओ क्लिप, SIT चौकशी आणि स्पाय कॅमेऱ्याच्या आरोपांवर भाजपचा थेट पलटवार




विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच राज्यातील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेली कथित ऑडिओ क्लिप, त्यातील 500 कोटी रुपयांच्या व्यवहाराचे दावे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला ‘स्पाय कॅमेरा’ गैरव्यवहाराचा मुद्दा यावरून भारतीय जनता पक्षाने विरोधकांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. “एका दगडात 3 पक्षी मारून भाजप, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील या तिघांचीही बदनामी करण्याचे हे महाविकास आघाडीचे पद्धतशीर षडयंत्र आहे,” असा थेट आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत केला. रेहान वाड्रांच्या समर्थनावरून संजय राऊतांवर टीका पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले, “कालपर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची मर्जी सांभाळण्यात धन्यता मानणाऱ्या संजय राऊत यांच्यावर आता प्रियांका गांधी यांचे पुत्र रेहान वाड्रा यांचे समर्थन करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. रेहान वाड्रा यांच्या कथित छायाचित्र प्रदर्शनाचे मुंबईत आयोजन करण्याची भाषा राऊत करत आहेत. ‘काँग्रेससोबत जाण्यापेक्षा दुकान बंद करेन’ असा स्वाभिमानी विचार मांडणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सत्तेसाठी पायदळी तुडवून राऊतांनी आपला स्वाभिमान कोणाच्या चरणी गहाण ठेवला आहे, याचे उत्तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिले पाहिजे.” कथित ऑडिओ क्लिप, बदनामीचा पूर्वनियोजित कट? मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या कथित ऑडिओ क्लिपवर बोलताना नवनाथ बन यांनी तांत्रिक आणि राजकीय पैलू मांडले. “आजचा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) आहे. संगणकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोणाचाही आवाज आणि बनावट ऑडिओ क्लिप सहज तयार करता येतात. जरांगे पाटलांनी ही क्लिप स्वतः बनवली असा आमचा दावा नाही, मात्र त्यांना कोणीतरी ही क्लिप पुरवून त्यांची दिशाभूल केली असण्याची दाट शक्यता आहे. या क्लिपचा संदर्भ सुमारे 2 वर्षे जुना असल्याचे स्पष्ट दिसते.” संजय राऊत यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले, “राऊत स्वतः म्हणतात की या एका क्लिपमुळे भाजप, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील असे 3 पक्षी एकाच दगडात घायाळ झाले आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की, या तिघांचेही राजकीय शत्रू असणाऱ्यांनीच ही क्लिप तयार करून पेरली आहे. स्वतःची बदनामी भाजप किंवा शिंदे करणार नाहीत. मग यामागे राऊत, काँग्रेस, रोहित पवार की शरद पवारांचा गट आहे? भाजप किंवा एकनाथ शिंदे यांनी कोणालाही 1 रुपयाही दिलेला नाही आणि जरांगे पाटलांनीही 1 रुपयाही घेतल्याचे पूर्णपणे नाकारले आहे. अशा स्थितीत 500 कोटींचा कोणताही बँक व्यवहार किंवा हवाला पुरावा नसताना ही बदनामी कशासाठी केली जात आहे? म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही लावून धरली असून मुख्यमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.” तसेच राऊतांवर निशाणा साधताना बन म्हणाले, “राऊत यांच्यावर झालेले 100 कोटींच्या वसुलीचे आरोप हे कोणत्या ऑडिओ क्लिपवर आधारित नव्हते, तर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी लेखी स्वरूपात केले होते; ज्या आरोपांमुळे त्यांच्या गृहमंत्र्यांना थेट तुरुंगात जावे लागले होते.” पदवीधर निवडणुकीत 10 हजार रुपयांचा दर? विरोधकांना पुराव्यांचे आव्हान पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मताला 10 हजार रुपयांचा दर सुरू असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेताना नवनाथ बन म्हणाले, “पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाठा गटाचेही उमेदवार रिंगणात आहेत. मग हे 10 हजार रुपये त्यांच्या उमेदवारांनी मतदारांना वाटले आहेत का? 100 कोटींच्या कथित वसुलीतून यांच्याकडे जमा झालेले 90 हजार कोटी रुपये या निवडणुकीत मतदारांवर खर्च केले जात आहेत का? जर राऊतांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते तात्काळ निवडणूक आयोगासमोर ठेवावेत, हवेत बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे.” सुप्रिया सुळेंचा ‘स्पाय कॅमेरा’ दावा, मतदारांमध्ये भीती पसरवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानासाठी स्पाय कॅमेरे वापरले जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना बन म्हणाले, “सुप्रिया सुळे या संसदेच्या जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. मतदारांच्या खिशाला किंवा चष्म्याला गुप्त स्पाय कॅमेरे लावून भाजपला मतदान केल्याची पडताळणी केली जात असल्याचा त्यांचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. अशा प्रकारे हजारो मतदारांवर पाळत ठेवण्यासाठी हजारो स्पाय कॅमेरे वापरणे शक्य आहे का? त्या हजारो कॅमेऱ्यांपैकी किमान 1 तरी स्पाय कॅमेरा सुप्रिया सुळेंनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी पकडून निवडणूक यंत्रणेला दाखवून द्यावा. सुशिक्षित पदवीधर आणि शिक्षक मतदार घराबाहेर पडून भाजपला मतदान करतील या भीतीने, मतदारांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण करण्यासाठीच हा अपप्रचार केला जात आहे.” उद्योगपतींवर दुटप्पी भूमिका, मतदार याद्या आणि सत्तेचा अमरपट्टा पत्रकार परिषदेच्या शेवटी नवनाथ बन यांनी विरोधकांच्या इतर सर्व आरोपांना सविस्तर उत्तरे देत भाजपची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “महाविकास आघाडीचे नेते जाहीर सभांमध्ये उद्योजक अदानी आणि अंबानी यांच्यावर सतत टीका करतात, मात्र मागच्या दाराने त्यांचे स्वागत करतात, त्यांच्या घरी जातात आणि त्यांच्या वाहनांचे सारथ्य करतात. जनतेने 2024 च्या लोकसभा निवडणुकीतच हा मुद्दा पूर्णपणे निकालात काढला आहे. त्यामुळे विरोधकांनी ही जुनी, गुळगुळीत झालेली टेप पुन्हा पुन्हा वाजवून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.” मतदार यादीतील नावे वगळल्याचा खोटा प्रचार “मतदार पडताळणी प्रक्रियेत 13 कोटी घुसखोरांची नावे वगळल्याचा खोटा दावा विरोधकांकडून केला जात आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, निवडणूक प्रक्रियेतील विशेष पडताळणी मोहिमेत वगळण्यात आलेल्या नावांमध्ये जवळपास 10 कोटी नावे ही स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांची आहेत. मतदार याद्या शुद्ध करण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला विरोधकांनी विनाकारण राजकीय रंग देऊ नये.” जनतेचा निर्णय आणि सत्तेचा अमरपट्टा “लोकशाहीत सत्तेचा अमरपट्टा कोणत्याही राजकीय पक्षाकडे कायमस्वरूपी नसून तो केवळ जनतेच्या हातात असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देशातून नक्षलवाद संपवणे, काश्मीरमधील कलम 370 हटवणे आणि अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी करणे यांसारखी ऐतिहासिक कामे झाली आहेत. याच जनसेवेच्या जोरावर जनतेने 2014, 2019 आणि 2024 च्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या पाठीशी उभे राहून विरोधकांना सत्तेचा चाबूक दाखवला आहे. जर विरोधकांनी सामान्य जनतेला पुढे करून स्वतः केवळ भाषणबाजी करण्याचे राजकारण सुरू ठेवले, तर आगामी निवडणुकांमध्येही जनता त्यांना असाच धडा शिकवेल.” आंदोलनातील सहभागावरून राऊतांना टोला “संजय राऊत यांनी रस्त्यावर उतरून केलेले एक तरी प्रत्यक्ष आंदोलन दाखवावे. मुंबईतील भांडुपच्या गाढव नाक्याच्या पलीकडे न जाता, लाठ्या-काठ्या खायला सामान्य मराठी कार्यकर्त्यांना पुढे करायचे आणि स्वतः मात्र केवळ माध्यमांसमोर प्रतिक्रिया द्यायला पुढे यायचे, एवढेच काम राऊतांनी केले आहे. त्यांनी रस्त्यावर उतरून कोणत्याही मोर्चाचे किंवा आंदोलनाचे प्रत्यक्ष नेतृत्व केलेले नाही.” —————————————– हेही वाचा.. शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर: 1 लाख 15 हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तातडीने आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ची राज्यभरात अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्ज खाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यादी आता आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *