Headlines

पदवीधर मतदानानंतर चंद्रकांत पाटलांचे भाकीत:म्हणाले- पुणे पदवीधर अन् शिक्षक निवडणुकीतही महायुतीचाच गुलाल; दोन्ही उमेदवार एकतर्फी जिंकणार!




पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज अत्यंत चुरशीने मतदान पार पडत आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळच्या सत्रात कोल्हापुरातील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान केंद्राबाहेरील बूथना भेटी देत मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ निवडणुकीप्रमाणेच पुणे पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीतही महायुतीचे दोन्ही उमेदवार 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतांचा कोटा मिळवून पहिल्याच फेरीत एकतर्फी विजयी होतील, असे मोठे भाकीत वर्तवले आहे. याचवेळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भाष्य करताना, ही क्लिप ‘AI’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) निर्मित असू शकते, असा संशय व्यक्त करत महायुतीच्या नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. दोन्ही उमेदवार 50 टक्क्यांच्या वर कोटा घेऊन जिंकणार! गेल्या 3 आठवड्यांच्या प्रचार दौऱ्याचा अनुभव सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “गेल्या 3 आठवड्यांच्या प्रचारातून एक स्पष्ट चित्र समोर आले आहे. माझे अंतर्मन सांगत आहे की, ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होईल. पदवीधर मतदारसंघातील आमच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे हे दोघेही 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतांचा कोटा पहिल्याच पसंतीक्रमात पूर्ण करून विजयी होतील. एकीकडे जाधव कुटुंबाची मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे, तर दुसरीकडे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा शैक्षणिक वारसा आहे. दोन्ही उमेदवार स्वतः उच्चविद्याविभूषित असल्याने सुशिक्षित मतदार त्यांच्याच पाठीशी उभा राहील.” शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडून (शिंदे गट) स्वतंत्र उमेदवार देण्यात आला असला, तरी त्याचा महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जरांगेंची क्लिप AI निर्मित असू शकते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरून राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “मनोज जरांगे यांनी समोर आणलेली ऑडिओ क्लिप ही AI निर्मित असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या क्लिपच्या सत्यतेबाबत मोठी शंका आहे.” महायुतीच्या नेत्यांना सल्ला “अशा संदिग्ध ऑडिओ क्लिपवर महायुतीमधील कोणत्याही नेत्याने खात्री केल्याशिवाय लगेच माध्यमांसमोर प्रतिक्रिया देऊ नये. तसेच रवींद्र धंगेकर यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, महायुती म्हणून काम करताना माझ्यासह सर्वांनीच सांभाळून बोलले पाहिजे.” निवडणूक रणधुमाळी: 77 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार पुणे विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. एकूण मतदान केंद्रे: 1,051 (पदवीधरसाठी 741 आणि शिक्षकसाठी 310 केंद्रे) एकूण मतदार संख्या: 4,49,959 रिंगणातील उमेदवार: पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार, तर शिक्षक मतदारसंघात 30 उमेदवार नशीब आजमावत आहेत. प्रमुख लढती: पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीच्या डॉ. स्मिता जाधव यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) हर्षदा देशमुख-जाधव यांचे कडवे आव्हान आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि शिंदे सेनेचे सचिन सानप यांच्यात तिरंगी लढत होत आहे. एका दृष्टिक्षेपात आकडेवारी (Pune Division Election 2026 Data): 1. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ (एकूण केंद्रे: 741 | एकूण मतदार: 3,88,019) 2. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ (एकूण केंद्रे: 310 | एकूण मतदार: 61,940)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *