![]()
५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना, आता भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपचे दिग्दर्शक, पत्रकार आणि क्रिएटर स्वतः संजय राऊतच आहेत. सामनाच्या प्रेसमध्ये बसून ही स्क्रिप्ट लिहिली गेली असून, सर्वप्रथम राऊत यांच्यावरच गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करावी,” अशी आक्रमक मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. ‘सामना स्टुडिओतच क्लिप बनली’ प्रसाद लाड म्हणाले, संजय राऊत यांनी सामनाच्या प्रेसमध्ये बसून या क्लिपची स्क्रिप्ट लिहिली. सुरुवातीला १०० कोटींचा आरोप होता, पण तो मीडियात फारसा चालणार नाही म्हणून त्यांनी ५०० कोटींची लाईन धरली. या संपूर्ण क्लिपचे क्रिएटर राऊतच असल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे एसआयटीने (SIT) सर्वप्रथम संजय राऊतांची आणि सामनाच्या स्टुडिओची चौकशी केली पाहिजे. हा ‘सपनों का सौदागर’ कोण आहे आणि कशा पद्धतीने स्वप्ने विकतोय? याचा शोध घ्यावा लागेल.” ‘खिचडीत चिंधी चोरी करणारे आता ५०० कोटींवर बोलतायत’ संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या ५०० कोटींच्या आरोपावर लाड यांनी सडकून टीका केली. “खिचडी प्रकरणात दोन-पाच लाखांची चिंधी चोरी कोणी केली, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांना आता ५०० कोटींचा नवा विषय मिळाला आहे. आम्ही या ५०० कोटींच्या आरोपाचे खंडन केलेले नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की याची एसआयटी मार्फत फॉरेन्सिक चौकशी होईल आणि सत्य समोर येईल,” असे लाड यांनी स्पष्ट केले. ‘हाथी चले बाजार और कुत्ते भोंके हजार’ सोशल मीडियावरील त्यांच्या चर्चेत असलेल्या ट्विटबाबत बोलताना ते म्हणाले, “संजय राऊतांनी असा आरोप केला होता की भाजपच्याच एका विधान परिषदेच्या आमदाराने ही क्लिप ओपन केली. त्यावरच मी ‘हाथी चले बाजार और कुत्ते भोंके हजार’ असे म्हटले होते. अशा आरोपांनी काहीही फरक पडत नाही. भाजप आणि शिवसेनेमध्ये (शिंदे गट) भांडण लावण्याचे संजय राऊत यांचे षड्यंत्र आता उघडे पडले आहे. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा सन्मानच करू आणि ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू.” ‘चौकशीसाठी मुख्यमंत्री आणि DGP ला पत्र लिहिणार’ या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार का? या प्रश्नावर लाड म्हणाले, “मी राज्याचे मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना (DGP) पत्र लिहिणार आहे. या क्लिपचा क्रिएटर संजय राऊतच असल्याचा आम्हाला पूर्ण संशय आहे. त्यामुळे राऊत यांना चौकशीला बोलावून त्यांची सखोल चौकशी करण्याची विनंती मी करणार आहे. कोणी काय बोलावे, याचे ‘व्हॉईसओव्हर’ एआयच्या माध्यमातून राऊतांनीच केले आहे.” —————— हेही वाचा.. 500 कोटींची ऑडिओ क्लिप संजय राऊतांनीच AI च्या मदतीने बनवली:नवनाथ बन यांचा आरोप, म्हणाले- तातडीने गुन्हा दाखल करा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले असताना, आता भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केला आहे. “ही ५०० कोटींची ऑडिओ क्लिप संजय राऊत यांच्या वाशी येथील वॉर रूममध्ये ‘एआय’ (AI) च्या मदतीने तयार करण्यात आली असून, याचे मुख्य सूत्रधार संजय राऊतच आहेत,” असा मोठा गौप्यस्फोट नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकरणी राऊत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. सविस्तर वाचा
Source link
संजय राऊतच सपनों का सौदागर अन् क्लिपचे क्रिएटर:त्यांच्यावरच पहिला गुन्हा दाखल करा, प्रसाद लाड यांची मागणी; म्हणाले- मुख्यमंत्री-DGP ला पत्र लिहिणार