![]()
ठाणे शहरातील अत्यंत दाट लोकवस्तीच्या आणि निवासी परिसरामध्ये बळदबस्तीने लादण्यात आलेल्या प्रस्तावित ‘अमेझॉन’च्या AI डेटा सेंटर प्रकल्पावरून राजकारण तापले आहे. स्थानिकांचा तीव्र विरोध आणि आंदोलनानंतर सरकारने तज्ज्ञ समिती नेमली असली, तरी या समितीचा अहवाल येईपर्यंत प्रकल्पाचे सर्व काम तात्काळ स्थगित करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. दुसरीकडे, कर्जत तालुक्यातील ‘सायडोंगर’ परिसरामध्ये गुजरातच्या ‘टोरंट पॉवर’ कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी हजारो झाडांची सुरू असलेली बेसुमार कत्तल आणि महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमधील भीषण दुष्काळाच्या मुद्द्यावरूनही आदित्य ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले आहे. ठाण्यातील AI डेटा सेंटर प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी ठाणेकरांच्या सुरक्षेचा आणि पर्यावरणाचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. राष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षते राज्य सरकारने तज्ज्ञ समिती गठित केली असून, त्यांना 3 महिन्यांच्या आत अहवाल सादर करायचा आहे. समितीच्या निष्कर्षांमधून प्रकल्पाचे संभाव्य परिणाम स्पष्ट होणार असल्याने, अहवाल प्राप्त होईपर्यंत ठाण्यातील प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाला तत्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध बाळकूम-माजिवडा परिसरातील निवासी क्षेत्रात हा प्रकल्प नको, अशी नागरिकांची स्पष्ट भूमिका आहे. ठाणे आणि उरणमधील नागरिकांना आधीच पाण्याचा तुटवडा जाणवत असताना, या अवाढव्य डेटा सेंटरमुळे शहराच्या पाणीपुरवठा आणि वीज वितरण व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येणार आहे. तसेच डिझेल जनरेटरमधून होणारे उत्सर्जन, ध्वनिप्रदूषण आणि उष्णतेचा (Heat Release) स्थानिकांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल, याचे कोणतेही स्पष्ट उत्तर अद्याप देण्यात आलेले नाही. समितीत स्थानिकांचा सहभाव हवा गठित करण्यात आलेल्या 17 सदस्यांच्या समितीत शासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक पातळीवर लोकचळवळीत कार्यरत असलेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश करावा, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या डेटा सेंटर व AI धोरणाबाबत आणि मंजुरी प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत शासनाने स्पष्टता द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. कर्जतमध्ये ‘टोरंट पॉवर’साठी हजारो झाडांची बेसुमार कत्तल ठाण्यापाठोपाठ कर्जत तालुक्यातील विनाशावरून आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियाद्वारे (X) राज्य सरकारवर अत्यंत घणाघाती प्रहार केला आहे. कर्जत तालुक्यात गुजरातच्या ‘टोरंट पॉवर’ कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी ‘सायडोंगर’ परिसरातील समृद्ध निसर्ग संपवून हजारो झाडांची बेसुमार कत्तल राजरोसपणे सुरू आहे. स्थानिकांचा आणि पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध असताना वन विभागाने ही परवानगी नेमकी कोणाच्या दबावाखाली दिली, असा सवाल त्यांनी केला आहे. नोव्हेंबरमधील भूमिपूजनाची घाई कशासाठी? आगामी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या घाईकरिता महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा बळी का दिला जात आहे? अशीच घाई राजवटीने हिंजवडी येथील मेट्रो किंवा गोराई येथील मॅन्ग्रोव्ह पार्कसाठी दाखवून जनतेचा विचार करावा, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्राला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न “बिल्डर मित्र आणि मालकांचे खिसे भरताना या राजवटीला महाराष्ट्राचे होणारे नुकसान दिसत नाही का? एकीकडे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ असताना, जंगले कापून महाराष्ट्राला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न भाजप राजवटीने हाती घेतला आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ——————————————————————– हेही वाचा… सूत्राच्या जिवाची हमी दिली तर शिंदे-फडणवीसांना क्लिप देतो!:मनोज जरांगे म्हणाले- षड्यंत्र उघड केल्याने आता दोन्ही पक्ष माझ्या मागे लागतील “गोरगरीब मराठा समाजाच्या आणि माझ्या राजकीय अस्तित्वाच्या विरोधात पडद्यामागे नेमके किती भयंकर कटकारस्थान शिजत होते, हे मी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उघडकीस आणले आहे. स्वतःचा हा मोठा अपराध झाकण्यासाठी आणि सत्य पचवण्याची हिंमत नसल्याने आता भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन माझ्या मागे लागतील, अशी दाट शक्यता आहे. मात्र, या सर्व राजकीय ताकदीला मी एकटाच पुरून उरेन! विशेष म्हणजे, माझी पत्रकार परिषद होण्याच्या 2 तास आधीच केवळ श्रीकांत शिंदेंच्या 500 कोटींच्या उल्लेखाची क्लिप टीव्ही चॅनेलवर रामदास कदमांनी वाजवली; मग एकनाथ शिंदेंची खरी बदनामी मी केली की रामदास कदमांनी?” असा खडा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
ठाण्याचा AI डेटा सेंटर प्रकल्प तत्काळ स्थगित करा!:कर्जतच्या निसर्गाचा बळी देणाऱ्या 'टोरंट पॉवर'च्या मनमानीवरही आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल