महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान पार पडत असून या सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार विजय मिळवतील, असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळ
.
सुशिक्षित मतदार विकासाच्या पाठीशी; 5 पैकी 5 जागांवर विजयाचा दावा
स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा या सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला भरभरून साथ दिली आहे, याची आठवण करून देत मोहोळ म्हणाले, “केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचा वेग जनतेने अनुभवला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदार हा अत्यंत सुशिक्षित, सजग आणि विचारी आहे. देशात आणि जगात काय घडते आहे, राज्य कुणाच्या हातात सुरक्षित राहील याची पूर्ण जाणीव या मतदाराला असते. त्यामुळे हा सुशिक्षित वर्ग विकासाच्या विचारालाच मतदान करेल आणि महायुती सर्व 5 जागांवर निर्विवाद विजय मिळवेल.”
‘गोकुळ’ दूध संघाचा निकाल आणि पदवीधरची तुलना चुकीची
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ देत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मोहोळ यांनी स्पष्ट शब्दांत फरक समजावून सांगितला. ते म्हणाले, “सहकार क्षेत्रातील निवडणुका आणि पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असते. सहकारात सोसायट्या आणि संस्थांचे प्रतिनिधी मतदान करतात, जिथे अवघे 5,000 ते 5,400 च्या आसपास मतदान होते. उलटपक्षी, पदवीधर मतदारसंघात एकट्या मतदारसंघात तब्बल 4 लाखांच्या घरात मतदान आहे. गोकुळमध्येही निवडणूक एकतर्फी झाली नसून तिथे 12 ते 13 जागांवर महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे सहकारातील समीकरणांची तुलना इथल्या सुशिक्षित मतदारांच्या कलशी करणे चुकीचे ठरेल.”
पुणे शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत; कौस्तुभ गावडेंनाच पसंती
पुण्यातील उमेदवारांविषयी बोलताना मोहोळ म्हणाले की, पुणे पदवीधरमधून स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे हे महायुतीचे सक्षम चेहरे रिंगणात आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत असल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, “दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाने ही मैत्रीपूर्ण लढत मान्य केली आहे. मात्र, युतीचा पारंपरिक आणि निष्ठावंत मतदार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासोबतच राहील. कौस्तुभ गावडे हे तरुण नेतृत्व असून त्यांचा शिक्षण क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि कौटुंबिक वारसा पाहता शिक्षक मतदारांची पहिली पसंती त्यांनाच मिळेल.”
जरांगे पाटील ऑडिओ क्लिप वाद आणि मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा
मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून सुरू असलेल्या वादावर आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट यावर बोलताना मोहोळ यांनी महायुतीत कोणताही तणाव नसल्याचे स्पष्ट केले. “जरांगे पाटलांवर आरोप झाले होते, त्यामुळे त्यांनी स्वतःची बाजू मांडण्यासाठी त्या क्लिप्स समोर आणल्या. मात्र त्या कोणी तयार केल्या आणि पसरवल्या, याविषयी तथ्य समोर आल्याशिवाय कोणावरही बोट दाखवणे योग्य नाही. मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सक्षम नेते असून महायुतीमधील कसलेही गैरसमज दूर करण्यास ते समर्थ आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, शिवसेना नेत्यांकडून सातत्याने ‘एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार’ असे दावे केले जात असल्याच्या मुद्द्यावर मोहोळ यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आपापल्या सर्वोच्च नेत्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात अशा भावना असणे स्वाभाविक आहे. मात्र, लोकशाहीत अंतिमतः आकड्यांचे गणित आणि संख्याबळ सर्वात महत्त्वाचे असते. सत्ता आणि पदांचे निर्णय याच संख्याबळावर ठरतात.”
—————————————————————–
हेही वाचा…
पदवीधर मतदानानंतर चंद्रकांत पाटलांचे भाकीत: म्हणाले- पुणे पदवीधर अन् शिक्षक निवडणुकीतही महायुतीचाच गुलाल; दोन्ही उमेदवार एकतर्फी जिंकणार!

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज अत्यंत चुरशीने मतदान पार पडत आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळच्या सत्रात कोल्हापुरातील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान केंद्राबाहेरील बूथना भेटी देत मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ निवडणुकीप्रमाणेच पुणे पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीतही महायुतीचे दोन्ही उमेदवार 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतांचा कोटा मिळवून पहिल्याच फेरीत एकतर्फी विजयी होतील, असे मोठे भाकीत वर्तवले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी