Headlines

राष्ट्रवादीला अर्थखाते मिळावे ही आमची ठाम भूमिका!:सुनील तटकरे म्हणाले- रोहित पवारांचे बोलणे सोयीनुसार, जरांगेंना संपवण्याचे कोणी प्रयत्न करत नाही




“राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थखाते मिळावे ही आमची पहिल्यापासूनची ठाम भूमिका राहिलेली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्याशी यावर अद्याप चर्चा झाली नसली, तरी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ही अपेक्षा रास्त आहे आणि गरज पडल्यास मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही पुन्हा चर्चा करू. रोहित पवार हे नेहमी स्वतःच्या राजकीय सोयीनुसार विधाने करतात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आणि नाशिकचे सर्व मंत्री राष्ट्रपती महोदयांच्या भेटीसाठी गेले असताना तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली, तर त्यात वावगे वाटण्याचे काहीच कारण नाही,” अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. रायगड जिल्ह्यातील पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना तटकरे यांनी अर्थखात्यावरील हक्क, रोहित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर, मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या आरोपांची ऑडिओ क्लिप, सेलिब्रिटीजवरील हल्ले आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवर पक्षाची अधिकृत भूमिका मांडली. राष्ट्रवादीला अर्थखाते मिळालेच पाहिजे अर्थखात्यावरून विरोधकांनी सुरू केलेल्या चर्चेचा समाचार घेताना तटकरे म्हणाले, “सुनेत्रा वहिनी काल दिल्ली दौऱ्यावर होत्या. त्यांच्याशी माझी आज या विषयावर सविस्तर चर्चा झालेली नाही. मात्र, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकर्ता म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते मिळाले पाहिजे. यासंदर्भात यापूर्वीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, गरज पडल्यास पुन्हा यावर बैठक घेतली जाईल.” रोहित पवारांना टोला “आमदार रोहित पवार हे प्रत्येक विषयावर आपल्या राजकीय सोयीनुसार बोलत असतात. सुनेत्रा वहिनी या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा कालचा दिल्ली दौरा राष्ट्रपतींच्या भेटीसाठी होता. अशा वेळी अमित शाह यांची भेट झाली तर केवळ तर्कवितर्कांच्या आधारे विरोधकांनी बालिश राजकारण करू नये.” मनोज जरांगेंनी समर्थ चळवळ उभी केली, पण त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोणी करत नाही! मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर आणि ‘आपल्याला संपवण्याचे कट रचले जात आहेत’ या दाव्यावर तटकरे म्हणाले, “मी आज सकाळपासून पक्षसंघटनेच्या कामात व्यस्त असल्यामुळे ती ऑडिओ क्लिप प्रत्यक्षात पाहिलेली नाही. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.” आरक्षणाच्या लढ्याचे कौतुक “मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एक अतिशय समर्थ आणि मोठी चळवळ उभी केली, यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. आमचे ज्येष्ठ नेते दिवंगत अजितदादा पवार असतानाही आमच्या पक्षाने मराठा आरक्षणाला नेहमीच भक्कम पाठिंबा दिला होता. चळवळीचे यश-अपयश हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते; मात्र त्यांना कोणी संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असे मला अजिबात वाटत नाही.” फडणवीसांच्या हातात कायदा-सुव्यवस्था सुरक्षित बाबा सिद्दिकी यांची हत्या आणि टायगर श्रॉफ, सलमान खान यांच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनांवरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तटकरेंनी गृहमंत्र्यांची पाठराखण केली. “देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 या काळात आणि आताही अत्यंत कणखरपणे व संवेदनशीलतेने गृह विभाग सांभाळलेला आहे. अशा घटना घडतात तेव्हा पोलिसांसमोर मोठे आव्हान असते, मात्र फडणवीसांच्या आदेशानुसार पोलीस शीघ्र गतीने तपास करत आहेत.” गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणार “सेलिब्रिटींचे जीवन वेगळे असते आणि सार्वजनिक जीवनातील लोकांचे जीवन वेगळे असते. आज महायुती सरकारचे तिन्ही प्रमुख नेते—देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार—राज्यातील शांततेबाबत अतिशय संवेदनशील आहेत. ज्या महाराष्ट्र पोलिसांची तुलना जागतिक पातळीवर स्कॉटलंड यार्डशी होते, त्या दलावर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. गुन्हेगारांवर कायद्याचा कडक वचक बसवण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत आहे.” दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारकडून भरीव मदत मिळणार राज्यातील वाढत्या दुष्काळी परिस्थितीवर बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. “राज्यात दुष्काळाची भीषणता वाढत असून शासनाने मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती सातत्याने आढावा घेत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की बळीराजा हा आमच्या सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे.” निसर्गाच्या संकटात शासन पाठीशी “यापूर्वीही जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर नैसर्गिक संकटे आली, तेव्हा सरकारने नियमांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना थेट मदत पोहोचवली आहे. आगामी काळातही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी आर्थिक मदत देऊन दिलासा दिला जाईल,” असा ठाम विश्वास खा. सुनील तटकरे यांनी शेवटी व्यक्त केला. ———————————————————– हेही वाचा… शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर: 1 लाख 15 हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तातडीने आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ची राज्यभरात अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्ज खाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यादी आता आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *