Headlines

मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा धमकीचा ई-मेल:शाळेवर ग्रेनेड हल्ला तर महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोटाची धमकी, सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर




“मुंबईतील 3 ते 4 शाळांवर येत्या 31 ऑक्टोबर रोजी ग्रेनेड हल्ला केला जाईल, तर 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात भीषण बॉम्बस्फोट घडवून आणले जातील,” अशी धमकी मुंबईच्या महापौर कार्यालयाला ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजून 31 मिनिटांनी हा धमकीचा ई-मेल थेट महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर प्राप्त झाला असून, यामध्ये उपमहापौर संजय घाडी यांनाही मार्क करण्यात आले आहे. या ई-मेलमध्ये खलिस्तान समर्थक आणि इतर काही कट्टरतावादी संघटनांच्या नावांचा थेट उल्लेख करण्यात आल्याने मुंबई पोलीस, सायबर सेल आणि दहशतवादविरोधी यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 31 ऑक्टोबरला शाळांवर ग्रेनेड हल्ला, 27 नोव्हेंबरला रेसकोर्स टार्गेट! धमकीच्या ई-मेलमधील मजकूर आणि घातपाताच्या तारखांविषयी मिळालेली धक्कादायक माहिती आहे. अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या ई-मेलमध्ये अत्यंत नियोजनबद्ध हल्ल्यांचा दावा करण्यात आला आहे. 31 ऑक्टोबर रोजी मुंबईतील 3 ते 4 नामांकित शाळांना लक्ष्य करून तिथे हातबॉम्बने (ग्रेनेड) हल्ला करण्याची, तर बरोबर एका महिन्यांनी म्हणजे 27 नोव्हेंबर रोजी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची खुली धमकी देण्यात आली आहे. खलिस्तानचा उल्लेख या धमकीच्या संदेशात खलिस्तान चळवळ आणि इतर काही संशयित संघटनांचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ खोडसाळपणा म्हणून याकडे न पाहता सुरक्षा यंत्रणांनी याला अत्यंत गांभीर्याने घेतले असून शाळा आणि रेसकोर्स परिसराची सुरक्षा तातडीने वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून कसून तपासणी; नागरिकांनी घाबरू नये धमकीचा ई-मेल मिळताच सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ शोधमोहीम राबवली. प्रमाणित कार्यपद्धतीनुसार तपास: ई-मेल प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कोणतीही हलगर्जी न दाखवता तत्काळ मानक कार्यपद्धती (एसओपी) लागू केली. बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस), श्वानपथक आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी तातडीने संभाव्य संशयित ठिकाणी जाऊन कसून शोधमोहीम राबवली. प्राथमिक तपासणीत कोणत्याही ठिकाणी संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आलेली नाहीत. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन: मुंबई पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आणि अफवांवर अजिबात विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ई-मेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा मागोवा घेण्यासाठी विशेष पथके कामाला लागली आहेत. महापौर कार्यालयाला धमक्यांचे सत्र; अवघ्या काही महिन्यांत तिसरी धमकी मुंबई महापालिका मुख्यालयाला यापूर्वीही लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला होता. यापूर्वी 10 जून 2026 रोजी महापौर कार्यालयासह थेट मुख्यमंत्री कार्यालय आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) या अतिसंवेदनशील ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्या वेळीही पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवली होती. 7 ऑगस्ट 2026 ची दुसरी धमकी त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत म्हणजे 7 ऑगस्ट 2026 रोजी पुन्हा असाच एक ई-मेल आला होता. त्यामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमांमध्ये विघ्न आणण्यासह मुंबई मेट्रो, शाळा आणि पुन्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला टार्गेट करण्याची धमकी दिली गेली होती. आता पुन्हा असाच प्रकार घडल्याने महापालिका परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सायबर पोलिसांसमोर आयपी अ‍ॅड्रेस आणि व्हीपीएनचे मोठे आव्हान ई-मेल पाठवणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाल्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांचा सायबर विभाग आता ई-मेलचा मूळ स्रोत, सर्व्हर माहिती आणि डिजिटल फूटप्रिंट्स शोधण्यात व्यस्त आहे. शहरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा खोडसाळपणा केला आहे की यामागे काही मोठे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. व्हीपीएन नेटवर्कचा वापर? यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये आरोपींनी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा (व्हीपीएन) वापर करून आपला मूळ आयपी अ‍ॅड्रेस लपवल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या वेळी पाठवण्यात आलेल्या ई-मेलचा माग काढणे हे सायबर तज्ज्ञांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. तपास यंत्रणा सर्व बाजूंची पडताळणी करत असून लवकरच आरोपीला बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ———————————————————— हेही वाचा… पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात स्पायकॅम पेनद्वारे पैसेवाटप: लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारे प्रकार खपवून घेणार नाही- सुप्रिया सुळे पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपिकडून पैसेवाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत, असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मतदारांच्या खिशाला असे पेन लावून, भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जात आहे आणि मतदान झाल्यानंतर तो व्हिडिओ दाखविल्यावर ठरलेली रक्कम दिली जात आहे, असा प्रकार सुरू असल्याची माहिती मतदार देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *