![]()
राज्यातील विधान परिषदेच्या 5 जागांसाठी (शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ) आज सकाळपासून मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत तब्बल १८२ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळपासूनच ‘स्पाय पेन’ आणि ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आता पुणे शिक्षक मतदारसंघातील एका नव्या वादामुळे निवडणुकीत आणखी भर पडली आहे. भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी गळ्यात पक्षाचे चिन्ह घालून मतदान केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आचारसंहिता भंगाचा गंभीर आरोप करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. नेमका वाद काय आहे? पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा मतदान करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गावडे हे गळ्यात आपल्या पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे घालून मतदान केंद्रात प्रवेश करताना आणि मतदान करताना दिसत आहेत. नियमानुसार मतदान केंद्राच्या आत कोणत्याही पक्षाचे चिन्ह, झेंडा किंवा प्रचार साहित्य नेण्यास सक्त मनाई असते. सुप्रिया सुळे यांचा निवडणूक आयोगाला सवाल या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सदर व्हिडिओ शेअर करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्या म्हणाल्या, “मतदान केंद्रावर पक्षीय ओळख बाजूला ठेवून एक सामान्य मतदार म्हणून जाणे अपेक्षित असते. लोकशाहीच्या या पवित्र प्रक्रियेचे पावित्र्य आणि मतदान केंद्राची निष्पक्षता प्रत्येकाने जपली पाहिजे. उमेदवाराला पक्षाचे चिन्ह गळ्यात परिधान करून मतदान केंद्रावर प्रवेश कसा दिला? ही सवलत केवळ सत्ताधारी उमेदवारालाच का दिली जाते? हा थेट आदर्श आचारसंहितेचा भंग नाही का?” असा सवाल करत महाराष्ट्र शासन आणि निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. महाविकास आघाडीचे नेते एकवटले सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाविकास आघाडीचे इतर नेतेही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड, मेहबूब शेख, तसेच शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. “सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे आणि विरोधकांसाठी वेगळे नियम आहेत का?” असा प्रश्न उपस्थित करत या सर्व नेत्यांनी कौस्तुभ गावडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आरोपांच्या फैरी आणि चुरशीचे मतदान आज सकाळपासूनच या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी सुरू आहेत. पुण्यात भाजपकडून ‘स्पाय पेन’चा वापर करून पैसे वाटले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यातच आता आचारसंहिता भंगाचा हा नवा व्हिडिओ समोर आल्यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे यांची पोस्ट.. ——————- हेही वाचा… विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान: स्पाय पेनपासून 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावर आरोपांच्या फैरी, 182 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार; 27 तारखेला निकाल
राज्यातील विधान परिषदेच्या बहुचर्चित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी आज (शुक्रवार, २३ ऑक्टोबर) मतदान पार पडत आहे. पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) या विभागांमधील एकूण ५ मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होत असून, तब्बल १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. अनेक मतदारसंघांमध्ये प्रस्थापित विरुद्ध बंडखोर अशी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. २७ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सविस्तर वाचा
Source link
भाजप उमेदवारावर आचारसंहिता भंगाचा आरोप:गळ्यात पक्षाचे चिन्ह घालून मतदानावरून मविआ आक्रमक, सुप्रिया सुळेंचा निवडणूक आयोगाला सवाल