“राज्यात ऑक्टोबरअखेर धरणे पूर्ण क्षमतेने भरणे अपेक्षित असते, जेणेकरून पुढील मे-जूनपर्यंत पाण्याचे नियोजन करता येते. मात्र यंदा तशी परिस्थिती नसून वाढत्या उन्हामुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने होण्याची भीती आहे. मी 1972 चा भ
.
नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ यांनी संभाव्य दुष्काळाचे संकट, पाणी आणि चाऱ्याचे नियोजन, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिली जाणारी तातडीची आर्थिक मदत, बिअर कारखान्यांचा पाणीपुरवठा आणि मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर सविस्तर भूमिका मांडली.
72 सारखा दुष्काळ ओढवू नये म्हणून नियोजन आवश्यक
राज्यातील पाणीटंचाईची तीव्रता आणि सरकारच्या नियोजनाबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, “पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य: “धरणांमध्ये जे काही पाणी उपलब्ध आहे, ते पिण्यासाठी राखून ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. शासनाने ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचे पाणी कसे पुरेल, या दृष्टीने कडक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी अनेक भागांत पाणीपुरवठ्यामध्ये अंतर ठेवावे लागेल. रोज मिळणारे पाणी एक दिवसाआड किंवा दोन दिवसांआड करावे लागेल. उद्योगांच्या पाण्यालाही कात्री लावावी लागू शकते.”
चार कलमी प्राधान्यक्रम
“शासनाने दुष्काळाचा सामना करण्यासाठी चार पातळ्यांवर प्राधान्यक्रम ठरवला आहे. पहिली प्राथमिकता नागरिकांना पिण्याचे पाणी देणे, दुसरी जनावरांना पिण्याचे पाणी, तिसरी गुरांच्या चाऱ्याची सोय आणि चौथी गरजूंना अन्नधान्य पुरवणे ही आहे. वनक्षेत्रात तसेच पाण्याच्या साठ्यांजवळ चारा पिकवण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचाही विचार आहे.”
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने 5 हजार रुपये जमा होणार
नुकसानभरपाई आणि दुष्काळी उपाययोजनांवरून विरोधकांच्या टीकेचा समाचार घेताना त्यांनी मदत जाहीर केली. “शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले आहे, फळबागांची काय स्थिती आहे याचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. अंतिम अहवाल येईपर्यंत आणि एकूण नुकसानभरपाई निश्चित होईपर्यंत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. दिवाळीच्या तोंडावर पहिला हप्ता म्हणून प्रत्येकी 5,000 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.”
योजनांचा आधार कायम
“या मदतीशिवाय राज्यात अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अविरतपणे सुरूच आहेत. विरोधक दुष्काळी दौरे करत असले तरी या संवेदनशील मुद्द्यावर राजकारण करण्याची अजिबात आवश्यकता नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”
बिअर कंपन्यांच्या डेड वॉटरवर सरकार विचार करेल!
मराठवाड्यातील बिअर कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्यावर विचारलेल्या थेट प्रश्नावर भुजबळ म्हणाले, “मराठवाड्यातील बिअर कंपन्यांच्या पाणीवापराचा मुद्दा नेहमीच चर्चेत येतो. धरणांमधील सुमारे 27 टक्के किंवा 27 टीएमसी पाणी हे मृत साठा (डेड वॉटर) म्हणून गृहीत धरले जाते आणि अनेक कंपन्या त्याचा वापर करतात. मात्र जर सर्वसामान्य जनतेलाच पिण्यासाठी पाणी शिल्लक राहत नसेल, तर बिअर कारखान्यांच्या या पाणीवापरावर सरकारला गांभीर्याने फेरविचार करावाच लागेल; अन्यथा लोकांचा तीव्र असंतोष आणि उठाव होऊ शकतो.”
अन्नधान्याची कोणतीही टंचाई नाही
“राज्यात दुष्काळ असला तरी धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे केंद्राकडे वाढीव मागणी करण्याची गरज भासणार नाही. प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेतील सर्व गरीब लाभार्थ्यांना नियमित वेळेवर अन्नधान्याचा पुरवठा केला जाईल.”

500 कोटींची ऑडिओ क्लिप म्हणजे निव्वळ शिळोप्याच्या गप्पा
मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या कथित 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळ यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. “चार लोक एकत्र बसून गप्पा मारताना कोणीतरी ते रेकॉर्ड केले आणि त्याला क्लिपचे नाव दिले. अशा शिळोप्याच्या गप्पांवर विश्वास ठेवण्याचे काहीच कारण नाही. 500 कोटींचा आकडा कल्पनेपलीकडला आहे; 5 किंवा 10-15 कोटींचा विषय असता तरी लोकांनी विचार केला असता. भाजपच्या नेत्यांना पैसे द्यायचे असते तर ते थेट भेटत होते, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यामार्फत कशाला दिले असते? कोणी उद्या उठून भुजबळांनाही हजार कोटी दिले म्हणेल, त्याला काही अर्थ आहे का?”
दोन वर्षांनंतर क्लिप काढण्यामागे विचलित करण्याचा हेतू
“दोन वर्षांपूर्वीचे हे संभाषण आज बाहेर काढण्यामागे काय हेतू आहे? जरांगे यांच्याच सोबत राहिलेले सहकारी आणि भगिनी त्यांच्याविषयी उघडपणे बोलू लागले आहेत. अंतर्गत नाराजीवरून लक्ष विचलित करण्यासाठीच ही जुनी क्लिप बाहेर काढण्यात आली असावी. राज ठाकरे नॅरेटिव्हबद्दल बोलत असले तरी चार लोकांच्या खासगी गप्पांनी समाजात कोणताही नॅरेटिव्ह तयार होत नाही. त्यामुळे या बिनबुडाच्या गोष्टींच्या चौकशीची अजिबात गरज नाही,” असे सांगत भुजबळ यांनी हा विषय फेटाळून लावला.
राष्ट्रपतींना भेट दिली हजारो वर्षांची परंपरा असलेली पैठणी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि नाशिकच्या मंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, “समीर भुजबळ यांनी खास निवडून आणलेली पारंपरिक पैठणी आणि पैठणीची वैशिष्ट्यपूर्ण शाल आम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सप्रेम भेट दिली. ही केवळ एक साडी नसून हजारो वर्षांची समृद्ध कला आणि महाराष्ट्राची ओळख असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रपतींना समजावून सांगितले.”
————————————————-
हेही वाचा…
रामदास कदमांना ऑडिओ क्लिपची तारीख कशी माहीत झाली?: क्लिप एआयची नाही, रेकॉर्डिंग खरी आहे; सत्य लपवू नका, कदमांच्या कॉल डिटेल्सची चौकशी झाली पाहिजे – मनोज जरांगे

एकनाथ शिंदे यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ती ऑडिओ क्लिप कधीची आहे, याची तारीख जाहीर केली. त्यांना ही तारीख कशी काय माहिती झाली? रामदास कदम आणि त्यांचा मुलगा लोकांना संभ्रमात टाकत असून ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. कदमांकडे ही तारीख आली कशी? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचा छडा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लावला पाहिजे, असे ते म्हणाले. येथे वाचा संपूर्ण बातमी