Headlines

मराठवाड्याचे वाळवंट व्हायला 15 वर्षे पुरेशी:राज ठाकरेंचा गंभीर इशारा; पाणी टंचाई आणि ऑडिओ क्लिपवरूनही जोरदार हल्लाबोल




महाराष्ट्रात सध्या जाणवणारी भीषण पाणी टंचाई, दुष्काळी परिस्थिती आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत परखड मते मांडली. मराठवाड्यातील भूजल उपसा आणि पाण्याचे नियोजन न झाल्यास पुढील 15 ते 20 वर्षांत मराठवाड्याचे वाळवंट होईल, असा गंभीर इशारा देतानाच राज्यातील पाणी टंचाईमागे टँकर लॉबी, प्लास्टिक टाक्यांच्या कंपन्या आणि राजकीय लागेबांधे असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. मराठवाड्याचे वाळवंट झाल्यास पूर्ववत करायला 250 ते 300 वर्षे लागतील मराठवाड्यातील पाणी संकटावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी गेल्या 20 वर्षांपासून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज सातत्याने मांडत आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या एका अहवालानुसार, जर पाण्याचा वेडावाकडा वापर असाच सुरू राहिला, तर पुढील 15 ते 20 वर्षांमध्ये मराठवाड्याचे पूर्ण वाळवंट होईल. जर एकदा हे वाळवंट झाले, तर मराठवाडा पुन्हा पूर्ववत करायला 250 ते 300 वर्षे लागतील. आज तिथे कसलीही परवानगी न घेता शेकडो बोअरवेल खोदल्या जात आहेत, बिअरचे कारखाने सुरू आहेत, विहिरींमधून पाणी उपसून टॅप वॉटरच्या नावाखाली अवैध विक्री केली जात आहे. मात्र यावर कोणाचेही नियंत्रण नाही.” पाणी टंचाई कृत्रिम? टँकरचे अदृश्य मालक कोण? पाणी संकटावरून सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधताना राज ठाकरे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. “कल्याण-डोंबिवलीमध्ये आठवड्यातून 3 दिवस पाणीपुरवठा बंद असतो, पुण्यात गुरुवारी पाणी नसते, तर जालन्यासारख्या शहरात तब्बल 15 दिवसांतून एकदा पाणी येते. पाण्याचे कायमस्वरूपी नियोजन न करता प्लास्टिक टाक्या बनवणाऱ्या कंपन्यांच्या नफ्यासाठी सरकार काम करत आहे का? कारण 15 दिवसांतून एकदा पाणी आल्यास लोकांना टाक्या विकत घ्याव्याच लागतील. तसेच रस्त्यांवर धावणाऱ्या हजारो पाण्याचे टँकर्स कोणाचे आहेत? या टँकर्सचे अदृश्य मालक हे सर्वपक्षीय आमदार, मंत्री आणि नगरसेवकच आहेत. टंचाई टिकून राहिली तरच टँकर लॉबीचा व्यवसाय चालतो, हेच भीषण वास्तव आहे.” मतदार जोपर्यंत चिडणार नाहीत, तोपर्यंत सुधारणा होणार नाही पाणी आणि दुष्काळाच्या मुद्द्यावर बोलताना मतदारांच्या मानसिकतेवरही त्यांनी बोट ठेवले. “शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षे केवळ मतदानासाठी वापर झाला. पाच वर्षे पाण्यासाठी बोंब मारायची आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी पाणी, विकास सोडून धार्मिक मुद्दे, जात आणि पैशांच्या पाकिटांवर मतदान करायचे, ही एक दुर्दैवी पद्धत झाली आहे. जोपर्यंत सामान्य जनता आणि शेतकरी कुटुंब यावर संताप व्यक्त करणार नाहीत, तोपर्यंत कोणतेही सरकार पाण्याचा प्रश्न गांभीर्याने सोडवणार नाही.” पुढील 1 ते 2 महिन्यांत शहरांकडे तांडे वळतील; अन्नाचेही संकट येणार राज्यातील भविष्यातील भीषण परिस्थितीचे चित्र मांडताना त्यांनी सांगितले की, “सध्या निर्माण झालेली टंचाई ही केवळ सुरुवात आहे. पुढच्या 1 ते 1.5 महिन्यांत पाण्यासोबतच अन्नधान्याची मोठी टंचाई जाणवेल. पाण्यासाठी आणि जगण्यासाठी ग्रामीण भागातून शहरांकडे लोकांचे तांडेच्या तांडे स्थलांतर करतील. आज ग्रामीण भागात गुरांचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे.” दिवाळीनंतर मराठवाडा दौरा करण्याआधी पक्षाकडून दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर अहवाल मागवला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कथित ऑडिओ क्लिप राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या कथित 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर बोलताना राज ठाकरे यांनी राजकीय षड्यंत्रांवर प्रहार केला. “प्रश्न केवळ 500 कोटींचा नाही, तर मीडिया आणि नॅरेटिव्ह कसे नियंत्रित केले जात आहे, हा खरा गंभीर मुद्दा आहे. कोणत्या पत्रकाराने बातमी द्यायची आणि कोणी नाही, यासाठी पत्रकारांना धमकावले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांना आधी जवळ करायचे, नंतर त्यांच्याच विरोधात माणसे उभी करायची, त्यांच्याच लोकांमध्ये फूट पाडून त्यांना बदनाम करण्याचे पद्धतशीर कट रचले जात आहेत. हे नियोजन करणारे कोण आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. ज्या दिवशी यांची सत्ता जाईल, त्या दिवशी ही सर्व पापे यांच्या अंगाशी येतील,” असा थेट इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. —————————————————————— हेही वाचा… पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात स्पायकॅम पेनद्वारे पैसेवाटप: लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारे प्रकार खपवून घेणार नाही- सुप्रिया सुळे पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपिकडून पैसेवाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत, असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मतदारांच्या खिशाला असे पेन लावून, भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जात आहे आणि मतदान झाल्यानंतर तो व्हिडिओ दाखविल्यावर ठरलेली रक्कम दिली जात आहे, असा प्रकार सुरू असल्याची माहिती मतदार देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *