Headlines

गाड्यांचा ताफा बाजूला ठेवून माजी केंद्रीय मंत्री थेट दुचाकीवर:मराठवाडा पदवीधरच्या मतदानासाठी रावसाहेब दानवेंनी पत्नीसह मोटारसायकलवरून गाठले मतदान केंद्र




मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026च्या मतदानादरम्यान माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या अनोख्या एंट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. कोणतीही व्हीआयपी गाडी किंवा समर्थकांचा ताफा न वापरता रावसाहेब दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मलाताई दानवे यांच्यासह चक्क दुचाकीवरून मतदान केंद्रावर पोहोचून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भोकरदन येथील निवासस्थानापासून काही अंतरावरच असलेल्या स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 251 वर दानवे दाम्पत्याने सकाळीच उपस्थित राहून मतदान केले. मतदान केंद्रावर सामान्य मतदारांप्रमाणेच रांगेत उभे राहून त्यांनी पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण केली. लवाजमा सोडून दुचाकीने मतदान केंद्रावर हजेरी नेहमी आपल्या खास मराठवाड्यातील अस्सल ग्रामीण शैलीसाठी ओळखले जाणारे रावसाहेब दानवे यांनी मतदानाच्या दिवशीी आपला साधेपणा जपला. नेहमी सुरक्षारक्षक आणि गाड्यांच्या ताफ्यात वावरणारे दानवे आज सकाळी पत्नी निर्मलाताई दानवे यांना मागे बसवून स्वतः दुचाकी चालवत जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 251 वर पोहोचले. माजी केंद्रीय मंत्री स्वतः दुचाकीवरून मतदान केंद्रावर आल्याचे पाहून केंद्राबाहेरील तरुण मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठे कुतूहल पाहायला मिळाले. मतदान केल्यानंतर त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवादही साधला. पाहा दानवेंचे काही फोटोज… लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान पवित्र कर्तव्य; दानवेंचे आवाहन मतदान केल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करत नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. “लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदान हा प्रत्येक सुजाण नागरिकाचा अत्यंत महत्त्वपूर्ण अधिकार आणि आद्य कर्तव्य आहे. लोकशाहीच्या या महोत्सवात प्रत्येक पदवीधराने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला हक्क बजावला पाहिजे. आपले मत हीच आपली ताकद आहे, त्यामुळे लोकशाहीचा सन्मान करा,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले. विविध मतदान केंद्रांच्या बूथना भेटी; सतीश चव्हाणांच्या विजयाचा विश्वास मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी भोकरदन परिसरातील विविध मतदान केंद्रांवरील निवडणूक बूथना थेट भेटी देऊन व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. मतदान केंद्रांवरील व्यवस्था, मतदारांच्या रांगा, महायुतीचे टेबल आणि कार्यकर्त्यांचे नियोजन याबाबत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. महायुतीचे सतीश चव्हाण आघाडीवर असल्याचा दावा यावेळी माध्यमांशी व कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले, “मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश भानुदास चव्हाण यांच्या विजयासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने मैदानात उतरले आहेत. नियोजनबद्ध प्रचार आणि कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत यामुळे महायुतीचा विजय निश्चित आहे.” ——————————————— हेही वाचा… चौरंगाएवढी मतपत्रिका अन् बॅलेट बॉक्सचे छिद्र मात्र लहान!: पेटीत टाकता-टाकता मतपत्रिका फाटली तर अवैध ठरवू नका -सुधीर मुनगंटीवार नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विभागात मतदानाची रणधुमाळी सुरू असतानाच, मतदान प्रक्रियेतील ढिसाळ नियोजनावरून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “रिंगणात तब्बल 38 उमेदवार असल्याने मतपत्रिकेचा आकार चौरंगाएवढा मोठा झाला आहे. मात्र, मतपेटीचे छिद्र अत्यंत लहान असल्याने मतपत्रिकेची जाड घडी आत सरकवताना ती फाटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मतपत्रिका डब्यात कोंबताना फाटली तर निवडणूक अधिकाऱ्यांनी ती कोणत्याही परिस्थितीत अवैध (Invalid) ठरवू नये,” अशी थेट आणि आक्रमक मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *