![]()
उपचारासाठी मित्राला घेऊन आलेल्या तिघांनी रुग्णालयात गोंधळ घालत बंदोबस्तावरील पोलिसाला मारहाण केल्याची घटना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात घडली. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. वैभव सुभाष साळुंखे (वय ३२, रा. आदर्शनगर, पिंपळे गुरव), कुशाल नैना गोयल (वय २८, रा. पवनानगर, पिंपळे गुरव) आणि सोहेल शब्बीर शेख (वय २७, रा. मोरया पार्क, पिंपळे गुरव) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार अमोल सुरेश शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहेत. डॉक्टरांशी अरेरावीच्या भाषेत बोलून आरडाओरडा करत गोंधळ घातल्याचा आरोप फिर्यादीनुसार, शिंदे आणि त्यांचे सहकारी डगवार हे शासकीय गणवेशात रुग्णालयाच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यावेळी आरोपी त्यांच्या मित्राला, कौस्तुभ गुप्ता याला, उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आले होते. वैद्यकीय अधिकारी उपचार करत असताना आरोपींनी त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणला. डॉक्टरांशी अरेरावीच्या भाषेत बोलून आरडाओरडा करत गोंधळ घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्याने आरोपींना गोंधळ न करण्यास सांगितले. त्यावर आरोपींनी शिंदे यांना धक्काबुक्की केली, गणवेशाची कॉलर पकडली आणि शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक पोलीस मदत मागण्यासाठी शिंदे रुग्णालयातील पोलीस चौकीत गेले असता, वैभव साळुंखे त्यांच्या पाठोपाठ चौकीत आल्याचा आरोप आहे. साळुंखे याने जीवे मारण्याची धमकी देत शिंदे यांचा गळा पकडून दाबला. तसेच हातातील जाड लोखंडी कडा पंजामध्ये पकडून त्यांच्या तोंडावर ठोसा मारल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात शिंदे यांच्या डाव्या डोळ्याच्या वर, कपाळावर गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अन्य दोघांनीही शिवीगाळ करून बाहेर भेटल्यास संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेबाबत शिंदे यांनी तिन्ही आरोपींविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली आहे. त्याआधारे भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण आणि धमकी दिल्याच्या आरोपांचा तक्रारीत समावेश आहे. रुग्णालयातील उपचारादरम्यान सुरू झालेला वाद पोलीस चौकीपर्यंत पोहोचला आहे. बंदोबस्तावरील पोलिसाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली असून, तिन्ही आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. —————- हेही वाचा.. शिकवणी चालकावर अल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप: पुण्यात संताप, पोक्सोअंतर्गत गुन्हा
खासगी शिकवणी चालकाने बारा वर्षीय मुलाशी अश्लील कृत्य करुन त्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दत्ता लांडगे (रा. जय को-ऑपरेटिव्ह सोसायटी, घोरपडे पेठ) याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), अश्लील कृत्य करणे, तसेच मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
Source link
पुण्यातील वायसीएम रुग्णालयात पोलिसाला मारहाण:डोळ्याला गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा