![]()
शहरालगतच्या रोटेगाव शिवारातील उड्डाणपुलाजवळ शनिवारी पहाटे उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला भरधाव आयशरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आयशरचा क्लीनर गौरव समाधान काकडे (२३, रा. चिखली, जि. जळगाव) गंभीर जखमी झाला, तर चालकासह ट्रॅक्टरवरील एकजण किरकोळ जखमी झाला. धडकेची तीव्रता एवढी होती की, आयशरच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. अपघातानंतर रस्त्यावर उसाचे तुकडे विखुरले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास रोटेगाव उड्डाणपुलाजवळून उसाने भरलेला ट्रॅक्टर जात होता. त्याचवेळी भरधाव आलेल्या आयशरने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या अपघातात आयशरच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. क्लीनर गौरव काकडे गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.आयशर चालक शेख जुबेर शेख वजीर (रा. दाताळा, ता. मलकापूर) आणि ट्रॅक्टरवरील भाऊसाहेब राठोड (रा. कासारी, ता. नांदगाव) यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. अपघातग्रस्त वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, घटनेची नोंद वैजापूर ठाण्यात करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे घडला, याचा तपास पोलिस करीत आहेत.
Source link
उसाच्या ट्रॅक्टरला आयशरची धडक; क्लीनर गंभीर जखमी:रोटेगावजवळील घटना, आयशरच्या दर्शनी भागाचा चुराडा