Headlines

मोसंबीसह फळपिकांसाठी दुष्काळी पॅकेज जाहीर करा:खासदार संदिपान भुमरे यांना शेतकऱ्यांचे साकडे




दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या मोसंबीसह सर्व फळपिकांच्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने दुष्काळी पॅकेज जाहीर करावे, तसेच मोसंबी पिकासाठी स्वतंत्र केंद्रीय धोरण मंजूर करावे, या प्रमुख मागण्यांचे निवेदन मोसंबी चळवळ दादेगावच्या वतीने छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान पाटील भुमरे यांना देण्यात आले. दुष्काळ, भीषण पाणीटंचाई, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चिततेमुळे फळपीक उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने मदत करून फळबागांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मोसंबी चळवळ दादेगावचे संस्थापक दीपक सुधाकरराव हजारे यांनी केली. या निवेदनातून मोसंबीसह सर्व फळपिकांच्या उत्पादकांसाठी मोठे दुष्काळी पॅकेज व प्रतिहेक्टरी मदत जाहीर करावी, मोसंबीसाठी स्वतंत्र केंद्रीय धोरण मंजूर करावे, आणि उपलब्ध मर्यादित पाण्यात फळबागा वाचवण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा मागण्या मांडण्यात आल्या आहेत. तसेच नुकसानग्रस्त फळबागायतदार शेतकऱ्यांना भरपाई व पीकविम्याचा लाभ द्यावा, मोसंबीला भाव मिळण्यासाठी हमीभाव व शासकीय खरेदी व्यवस्था करावी, मोसंबीच्या विक्रीसाठी बाजारपेठ विकसित करावी, या मुद्द्यांवरही भर देण्यात आला. हे निवेदन देताना हर्षीचे सरपंच डॉ. गणेश राऊत, सोसायटी चेअरमन ज्ञानदेवराव पाटील हजारे आणि माजी सरपंच परसराम पाटील हजारे आदींसह शेतकरी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *