Headlines

डफरीनमध्ये ‘एसएनसीयू’च्या ‘सिरिंज पंप’ पिनमधून धूर:3 चिमुकल्यांच्या बळीनंतरही अमरावतीचे डफरीन प्रशासन सुधारेना




येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरीन) विशेष नवजात शिशू उपचार कक्षात (एसएनसीयू) दोन महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर बंद असलेला हा विभाग गुरुवारी (दि. २३) तळमजल्यावर नव्याने सुरू करण्यात आला. मात्र, अवघ्या २४ तासांतच या नव्या कक्षातील वॉर्मरजवळील सिरिंज पंप मशीनच्या पिनमधून धूर निघाल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) सकाळी घडली. कर्मचाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र यामुळे बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. २४ ऑगस्टच्या दुर्घटनेनंतर एकावेळी १५ बालकांवर उपचार करता येतील अशा क्षमतेचा नवीन एसएनसीयू सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे, गुरुवारी आरोग्य आयुक्त संजय काटकर यांनी स्वतः पाहणी केल्यानंतर हा विभाग सुरू झाला होता. परंतु, दुसऱ्याच दिवशी वैद्यकीय उपकरणातून धूर निघाल्याने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शुक्रवारी सकाळी सिरिंज पंपच्या पिनेतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वीज बंद करून तंत्रज्ञांना पाचारण केले व दुरुस्ती करून घेतली. या घटनेत कोणतीही हानी झाली नसली, तरी अतिसंवेदनशील विभागात गंभीर घटनेच्या अवघ्या दोन महिन्यानंतर असा प्रकार घडणे ही चिंतेची बाब आहे. यापूर्वीच्या आगीनंतर तत्कालीन आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांवर निलंबनाची कारवाई झाली होती, तसेच पुरवठादार व पीडब्ल्यूडीच्या विद्युत शाखेतील कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली होती. एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही पुन्हा धूर निघाल्याने उपकरणांची तपासणी आणि विद्युत सुरक्षेच्या खातरजबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून तांत्रिक बिघाड की विद्युत जोडणीत दोष होता, याचा खुलासा होणे आवश्यक आहे. कारण या ठिकाणी विद्युत यंत्रणेचे पूर्ण काम नव्याने करण्यात आले आहे. गुरुवारी आरोग्य आयुक्तांच्या पाहणीनंतरच सुरू झाला विभाग आरोग्य आयुक्त संजय काटकर शुक्रवारी ते मेळघाट दौऱ्यावर असताना ही घटना घडली. या प्रकाराची ते काय दखल घेतात व कोणते निर्देश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण शुक्रवारी रात्रीपर्यंत ते शहरातच होते. २४ तारखेचा दुर्दैवी योगायोग! डफरीन रुग्णालयातील एसएनसीयूला २४ ऑगस्ट रोजी आग लागून तीन बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांनी, २४ ऑक्टोबर रोजीच नवीन कक्षात धूर निघाल्याची घटना घडली. दोन्ही घटना २४ तारखेलाच घडल्याचा योगायोग चर्चेत असला, तरी यापेक्षा बालकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *