![]()
शनी शिंगणापूर येथे दर्शन घेऊन हिंगोलीकडे परतणाऱ्या भाविकांच्या कारला जालना जिल्ह्यातील रामनगरजवळ शनिवारी (ता. 24 ) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. जालना-मंठा मार्गावर झालेल्या या अपघातात भगवान चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील लाख गावावर शोककळा पसरली आहे. टिप्परने अचानक ब्रेक लावल्याने कार धडकली याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील विद्यानिकेतन इंग्रजी शाळेतील कार्यालयीन कर्मचारी शुक्रवारी (ता. 23 ) कारने शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शिर्डीमार्गे हिंगोलीकडे परतीचा प्रवास सुरू केला. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जेवण केले. त्यानंतर जालना मार्गे हिंगोलीकडे जात असताना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रामनगर गावाजवळ हा अपघात झाला. जालना-मंठा मार्गावर कारच्या पुढे एक टिप्पर जात होता. या टिप्परचालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून येणाऱ्या कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट टिप्परच्या मागील बाजूस धडकली. धडक इतकी जोरदार होती की, कार टिप्परखाली घुसली. या अपघातात कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. भगवान चव्हाण यांचा जागीच मृत्यू या भीषण अपघातात भगवान चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. राजू जाधव, सचिन पईतवार आणि कारचालक गंभीर जखमी झाले. अन्य एका व्यक्तीलाही दुखापत झाली असून, अपघातात एकूण चौघे जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच जालना जिल्ह्यातील मौजपुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मृत भगवान चव्हाण यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. लाख गावावर शोककळा; कुटुंबाचा आधार हरपला रविवारी (ता. 25 ) सकाळी भगवान चव्हाण यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रविवारी दुपारी औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भगवान चव्हाण यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. धार्मिक दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर परतीच्या प्रवासात काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. भगवान चव्हाण यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, लाख गावात शोककळा पसरली आहे. हेही वाचा… रामदास कदमांच्या संपत्तीवरून भाजपचा हल्लाबोल:‘बोरिवलीपासून CST पर्यंत किती जमिनी, याची माहिती माझ्याकडे’, सूर्यकांत दळवींचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधत, त्यांनी भाजपविरोधात पुन्हा वक्तव्य केल्यास मतदारसंघात काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा दिला आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करण्यापूर्वी रामदास कदम यांनी स्वतःच्या संपत्तीबाबत माहिती द्यावी, असे आव्हानही दळवी यांनी दिले. सविस्तर वाचा….
Source link
शनी शिंगणापूरच्या दर्शनानंतर परतीचा प्रवास ठरला अखेरचा:रामनगरजवळ भाविकांच्या कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, चौघे जखमी