Headlines

BJP Slams Sanjay Raut Over AI Video Controversy


“राज्यात सध्या गाजत असलेली कथित 500 कोटी रुपयांची ऑडिओ क्लिप ही पूर्णपणे बनावट असून ‘सामना’च्या कार्यालयात बसून पारावरच्या गप्पांच्या स्क्रिप्टवरून तयार करण्यात आली आहे. संजय राऊत यांनीच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) माध्यमातून ही क्लिप तयार केली आ

.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला. तसेच 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून विरोधकांनी रचलेले कथित कारस्थान, कर्जत प्रकल्प विरोध, अभिनेत्यांची सुरक्षा आणि महायुतीतील एकीवर पक्षाची रोखठोक भूमिका मांडली.

500 कोटींच्या क्लिपचे निर्माते संजय राऊत; एसआयटीमार्फत चौकशी करा

ऑडिओ क्लिप प्रकरणावर संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवताना नवनाथ बन म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचलेली ही ऑडिओ क्लिप एआय जनरेटेड आहे. पारावरच्या निरर्थक गप्पांची स्क्रिप्ट लिहून संजय राऊत यांनी ही क्लिप बनवली. राऊतांनी ती छत्रपती संभाजीनगरमधील एका मध्यस्थाला दिली आणि तिथून ती जरांगेंपर्यंत पोहोचवली गेली. या क्लिपमुळे राजकीयदृष्ट्या सर्वाधिक फायदा उठवण्याचा प्रयत्न स्वतः राऊतच करत आहेत.”

हवालाचा आरोप करून जरांगेंची बदनामी

“खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी कोणालाही पैसे दिले नाहीत आणि जरांगे पाटील यांनीही पैसे घेतले नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही संजय राऊत हवालाच्या माध्यमातून 500 कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करून मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांची नाहक बदनामी करत आहेत. राऊतांकडे काही पुरावे, तारखा किंवा बँक व्यवहारांची माहिती असेल, तर त्यांनी ती थेट ईडी आणि सीबीआयकडे द्यावी; हवेत आरोप करू नयेत.”

पाकिस्तान किंवा बांगलादेशच्या कोर्टात जावे

“राऊतांचा देशाच्या संविधानावर, सर्वोच्च न्यायालयावर, ईडीवर किंवा सीबीआयवर विश्वास उरलेला नाही. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानच्या किंवा बांगलादेशच्या पंतप्रधानांना आणि न्यायालयाला पत्र लिहून तिकडून चौकशी करून घ्यावी. उद्या तपास यंत्रणांनी ही क्लिप खोटी ठरवली की राऊत पुन्हा संस्थांवरच आरोप करायला मोकळे होतील.”

पंतप्रधानांचा बाप काढणारे फ्रस्ट्रेटेड

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पाटण्यातील विधानाचा समाचार घेताना ते म्हणाले, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबद्दल अपशब्द वापरले. हे शब्द खरगे यांचे नसून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आहेत. देशातील 140 कोटी जनतेने निवडून दिलेल्या पंतप्रधानांना कधी ‘मौत का सौदागर’, कधी ‘चौकीदार चोर’ तर कधी त्यांच्या आई-वडिलांवरून शिवीगाळ करणे ही काँग्रेसची जुनी विकृती आहे. मात्र ‘गाली को गहना बनाना’ ही मोदीजींची सवय आहे. या शिव्यांचा हिशोब देशातील जनता योग्य वेळी चुकता करेल.”

स्वतःच्याच कार्यकर्त्याला मारहाण

“पाटण्यातील त्या सभेमध्ये 50 टक्के सभागृहही भरले नव्हते. रिकाम्या खुर्च्या पाहून आलेले वैफल्य खरगे यांच्या वक्तव्यातून दिसले. सभेत ‘मोदीजींना हटवता येणार नाही’ असे म्हणणाऱ्या स्वतःच्याच कार्यकर्त्याला काँग्रेस नेत्यांनी भाजपचा समजून मारहाण केली. कंसाला जसा मरणपंथाला लागल्यावर सगळीकडे श्रीकृष्ण दिसायचा, तसेच काँग्रेस आणि राऊतांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ भाजपच दिसत आहे.”

संजय राऊतांना खडे बोल

“संजय राऊत हे सरकारचा बाप काढण्याची भाषा करतात. बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून स्वतःचा संपूर्ण पक्ष काँग्रेस आणि राहुल गांधींच्या मांडीवर नेऊन बसवणाऱ्यांनी बापाची भाषा करू नये. कधी काळी मोदींना ‘आंधी नाही तुफान’ म्हणणाऱ्या राऊतांनी स्वार्थासाठी राजकीय भूमिका बदलली आहे.”

कर्जत प्रकल्पावरून सुपारीबाज विरोध

कर्जत येथील जलविद्युत प्रकल्पावरून विरोधकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी प्रत्युत्तर दिले. “उबाठा गटाला प्रत्येक विकास प्रकल्पाला विरोध करण्याची सवय जडली आहे. त्यांनी मुंबई मेट्रोला विरोध केला, समृद्धी महामार्गाला विरोध केला; तरीही आज हे प्रकल्प जनतेच्या सेवेत आहेत. आता कर्जतच्या प्रकल्पाला विनाकारण विरोध केला जात आहे. हा प्रकल्प घनदाट जंगलापासून तब्बल 16 किलोमीटर लांब आहे. कुठेही अवैध वृक्षतोड झालेली नाही, उलट तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या 3 पट अधिक जमीन संबंधित कंपनीने वनीकरणासाठी दिली आहे.”

राज ठाकरेंची समजूत काढता येईल

“प्रकल्प महाराष्ट्रात आले की त्याला विरोध करायचा आणि प्रकल्प बाहेर गेले की बोंब ठोकायची, ही विरोधकांची दुटप्पी वृत्ती आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे समजूतदार नेते आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रकल्पाचे महत्त्व आणि रोजगार निर्मिती समजवून सांगितल्यास ते या प्रकल्पाला विरोध करणार नाहीत.”

दिवाळीत व्यापाऱ्यांना वेठीस धरणारे हिंदूविरोधी

दिवाळीच्या काळात काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनावर आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर बन यांनी स्पष्टीकरण दिले. “1 तारखेला दिवाळीच्या सणात बाजारपेठेत मोठी खरेदी-विक्री होत असताना राहुल गांधी मोर्चा काढून व्यापाऱ्यांचे नुकसान करू पाहत आहेत. हिंदू सणांच्या काळात असे अडथळे आणणाऱ्या हिंदूविरोधी काँग्रेसचे जनता स्वतः दिवाळे काढेल.”

कलाकारांच्या सुरक्षेची मुंबई पोलिसांकडून काळजी

“टायगर श्रॉफ यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना मुंबई पोलिसांनी अवघ्या 24 ते 25 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. आमिर खान असो, टायगर श्रॉफ असो वा सलमान खान; मुंबईत राहणाऱ्या सर्व बॉलिवूड कलाकारांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असून गृहखाते आणि मुंबई पोलीस पूर्ण खबरदारी घेत आहेत.”

महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत

“देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे तिन्ही नेते एकत्र मिळून महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत असून, महायुतीमध्ये कोणतीही धुसफूस किंवा कपडे फाडण्याची स्पर्धा नाही; विरोधकांनी कपोलकल्पित बातम्या पसरवणे बंद करावे,” असेही ते शेवटी म्हणाले.

———————————————————————

हेही वाचा…

पर्याय असेल तर जंगल वाचवलंच पाहिजे, आवश्यक नसताना वृक्षतोड नकोच: सुधीर मुनगंटीवारांनी भूमिका, म्हणाले- संवादातून मार्ग काढला पाहिजे

भीमाशंकरच्या जंगलात वृक्षतोडीवरून राज्यात वाद पेटला असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आवश्यक नसताना कोणतीही वृक्षतोड करू नये हीच वनविभागाची आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.