![]()
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात या ऑडिओ क्लिपप्रकरणी मोठी खदखद आहे. फडणवीस यांना अंधारात ठेवून काही लोकांनी हे सर्व कारस्थान रचले होते. या षड्यंत्रातून शिंदे आणि फडणवीस दोघांचाही राजकीय गेम करायचा होता; मात्र ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे कट रचणाऱ्यांचाच गेम झाला आहे, असा दावा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ही ऑडिओ क्लिप एआयने तयार केलेली नाही. सरकारने अशा पळवाटा शोधू नयेत. नवनाथ बन यांना प्रवक्तेपद दिले म्हणून ते कशालाही एआय म्हणणार का? 5 ते 7 जणांनी हे षड्यंत्र का रचले, याचा शोध घेतल्याशिवाय शिंदे गप्प बसणार नाहीत. मित्रपक्ष आणि सत्तेपेक्षा स्वतःची प्रतिष्ठा महत्त्वाची असते. एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. फडणवीस यांना माहिती नसावी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात भाजपचे काही लोक सहभागी आहेत, परंतु कदाचित फडणवीस यांना याबद्दल पूर्वकल्पना नसावी. फडणवीस यातील एकाही दोषीला सोडणार नाहीत, असा मला विश्वास आहे. मात्र, सरकारने जर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, तर यामागे फडणवीस आणि शिंदे हेच होते, असा संदेश जनतेत जाईल. तसेच, आरोप करणाऱ्या महिला राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या असून त्या खोटा आरोप करणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारने मला खूप त्रास दिला मनोज जरांगे पाटील म्हणाले की, दोन्ही गटांत सध्या प्रचंड अस्वस्थता आणि खदखद आहे, ती ते उघडपणे दाखवणार नाहीत. मात्र, मित्र म्हणून जवळ करायचे आणि पडद्यामागून संपवण्याचे प्रयत्न करायचे, हे राजकारण कोणीही सहन करणार नाही. जर तपास यंत्रणांवर दबाव आणला जाणार नसेल, तर या प्रकरणाची तातडीने ईडी चौकशी झाली पाहिजे. मराठ्यांच्या लढ्यामुळे सरकारने मला खूप त्रास दिला आहे, आता मी कोणालाही सोडणार नाही आणि या मुद्द्याच्या मुळापर्यंत जाणारच.
Source link
शिंदे-फडणवीसांचा राजकीय 'गेम' करण्याचा कट:ऑडिओ क्लिपची ED चौकशी व्हावी, मराठा समाजासाठी लढल्यामुळे सरकारने खूप त्रास दिला- जरांगे पाटील