![]()
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता आणि व्यक्तिमत्त्व विकासामध्ये बुद्धिबळाचे महत्त्व अधोरेखित करत एस एन डी टी महिला विद्यापीठ – चेतनाने पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळाचा दोन क्रेडिटचा कोर्स सुरू केला आहे. बुद्धिबळ शिक्षणतज्ञ आणि संशोधक डॉ. मकरंद वेलणकर यांच्या या अभिनव संकल्पनेला प्रतिसाद देत या अभ्यासक्रमाची रचना आणि अंमलबजावणी करण्यासाठी ‘ वेलणकर चेस इन्स्टिट्यूट’ सोबत विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळाचा दोन क्रेडिटचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. बुद्धिबळाला औपचारिक शैक्षणिक चौकटीत स्थान देणारे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरण्याच्या दिशेने एस एन डी टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमात विद्यापीठाच्या एस एन डी टी महिला विद्यापीठ – चेतना (सेन्टर फॉर होलिस्टिक एज्युकेशन, ट्रेनिंग अँड नोव्हेल ऍडवांसमेंट – चेतना) या केंद्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, शिक्षणाच्या माध्यमातून विविध कौशल्ये विकसित करणे आणि त्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, या उद्देशाने करत एस एन डी टी महिला विद्यापीठ – चेतना कार्यरत आहे. एस एन डी टी महिला विद्यापीठ – चेतनाचे संचालक डॉ.महेश कोलतमे यांनी सांगितले की, “बुद्धिबळाकडे केवळ स्पर्धात्मक खेळ म्हणून पाहण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, आणि मानसिक विकासासाठी उपयुक्त शैक्षणिक साधन म्हणून त्याचा विचार करण्याची गरज आहे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, सारासार विचार, विश्लेषणात्मक क्षमता, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, या क्षमता विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या कोर्सचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत माफक शुल्कात ऑनलाइन माध्यमातून उत्तम दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. त्यामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंतही बुद्धिबळ शिक्षणाचे फायदे पोहोचविण्यास मदत होईल.” वेलणकर चेस इन्स्टिट्यूटचे डॉ. मकरंद वेलणकर म्हणाले, “बुद्धिबळाकडे केवळ स्पर्धात्मक खेळ म्हणून न पाहता, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करणारे प्रभावी माध्यम म्हणून त्याचे महत्त्व ओळखण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे. बुद्धिबळाचा क्रेडिट कोर्स सुरू करून एस एन डी टी महिला विद्यापीठ विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक क्षमता जाणीवपूर्वक विकसित करता याव्यात, यासाठी एक शैक्षणिक चौकट निर्माण करत आहे.” हा अभ्यासक्रम एकूण ३० तासांचा असून स्त्री-पुरुष दोघांसाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ऑनलाइन उपलब्ध असणार आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २ क्रेडिटसह कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल तर अन्य सहभागींना कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल.
Source link
एसएनडीटी विद्यापीठात बुद्धिबळाचा क्रेडिट कोर्स सुरू:पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी; राज्यातील पहिले विद्यापीठ, वेलणकर चेस इन्स्टिट्यूटसोबत करार