Headlines

क्लिपची चौकशी होईपर्यंत महायुतीतील अंतर्गत आरोप-प्रत्यारोप थांबवा:रामदास कदमांनी बोलताना भान ठेवायला हवे होते – राधाकृष्ण विखे पाटील




मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून महायुतीत सुरू असलेल्या अंतर्गत वादावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “या क्लिपप्रकरणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून त्यातून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ समोर येईल. मात्र, तोपर्यंत महायुतीतील नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक आणि संशयाचे राजकारण करणे तात्काळ थांबवावे. रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी अशी वक्तव्ये करताना भान ठेवायला हवे होते,” असे परखड मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील यांनी ऑडिओ क्लिपच्या चौकशीसह, कर्जत येथील जलविद्युत प्रकल्पावरून सुरू असलेली वृक्षतोडीची चर्चा, अकोले येथील किसान सभेचे आंदोलन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. महायुतीतील नेत्यांनी संशयकल्लोळ थांबवावा ऑडिओ क्लिपवरून निर्माण झालेल्या वादावर आणि मराठा आरक्षणावर बोलताना विखे पाटील म्हणाले, “या ऑडिओ क्लिपवरून कोणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणा केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी पद्धतशीर डाव आखल्याचे जे सांगितले जात आहे, ते कपोलकल्पित आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः चौकशीची घोषणा केल्याने सत्य समोर येईलच. परंतु चौकशी पूर्ण होईपर्यंत महायुतीमध्ये जो विनाकारण संशयास्पद वाद सुरू आहे, तो पूर्णपणे थांबला पाहिजे. रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी काल ज्या पद्धतीने विधाने केली ती अजिबात योग्य नव्हती. बोलताना जबाबदारीचे भान राखणे गरजेचे होते.” आरक्षणावर मविआने पाणी फेरले “देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014 ते 2019 या काळात मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारने त्याचे वाटोळे केले. पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा प्रामाणिक प्रयत्न झाले, अधिसंख्य पदे निर्माण करून सुमारे 4,000 ते 5,000 तरुणांना शासकीय सेवेत न्याय मिळवून दिला गेला. त्यामुळे सरकार मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.” कर्जत प्रकल्पासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांपेक्षा दुप्पट झाडे लावणे बंधनकारक कर्जत येथील प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून होणाऱ्या आरोपांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. “राज्याच्या विकासाचा वेग आणि वाढती औद्योगिक गुंतवणूक लक्षात घेता महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर विजेची आवश्यकता आहे. कर्जत येथे उभारला जाणारा हा हायड्रो प्रकल्प राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.” दुप्पट वृक्षारोपणाचे कडक नियम “या प्रकल्पासाठी जेवढी झाडे तोडली जातील, त्यापेक्षा दुप्पट झाडे लावण्याचे कायदेशीर बंधन संबंधित कंपन्यांवर घालण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण आयोगाने आणि शासनाने अत्यंत कडक अटी घातल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका पोहोचत नसताना, मूळ विषय समजून न घेता काही लोक केवळ राजकीय स्वार्थासाठी यावर राजकारण करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.” अजित नवलेंनी आंदोलन स्थगित करावे अकोले येथील किसान सभेच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, “सध्या संपूर्ण राज्यासमोर दुष्काळाचे गंभीर सावट आहे. चारा, टँकर आणि पाणी नियोजनात संपूर्ण शासकीय यंत्रणा व्यस्त आहे. त्यामुळे आंदोलन करण्यासाठी ही योग्य वेळ नाही. डॉ. अजित नवले यांनी सुरू केलेले आंदोलन सध्या स्थगित करावे, अशी माझी त्यांना विनंती आहे. गरज पडल्यास मी स्वतः त्यांची भेट घेईन. दिवाळीनंतर तत्पूर्वी संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठक घडवून आणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निश्चित मार्ग काढला जाईल.” मल्लिकार्जुन खरगेंचे वक्तव्य वैफल्यातून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना विखे पाटील संतापले. “काँग्रेसची बौद्धिक दिवाळखोरी आता सर्वोच्च नेत्यांपासून ते गल्लीबोळातील नेत्यांपर्यंत सर्वांसमोर उघडी पडली आहे. राजकारणात काही संकेत आणि आचारसंहिता पाळली पाहिजे. खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने पंतप्रधानांवर अशी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे म्हणजे काँग्रेसच्या सर्व आघाड्यांवरील अपयशाची कबुली आहे.” अपयशातून आलेली हताशा “आंदोलने करून झाली, विविध मुद्द्यांचा आधार घेऊन झाला, तरीही जनता काँग्रेसला नाकारत आहे. त्यामुळे आलेल्या प्रचंड राजकीय नैराश्यातून आणि वैफल्यातूनच खरगे यांनी हे अशोभनीय वक्तव्य केले असून, मी त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.” ———————————————- हेही वाचा… मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?: कर्जतमधील वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला सवाल, म्हणाले- जनतेने आता पेटून उठावे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि भीमाशंकर अभयारण्य परिसरात ‘टोरेंट पॉवर’ कंपनीच्या प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांनंतर आता पर्यावरणप्रेमी आणि अभिनेत्यांनी या जंगलतोडीविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. ‘सह्याद्री देवराई’च्या माध्यमातून राज्यभरात वृक्षारोपणाची मोठी चळवळ उभी करणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीवरून सरकारवर सडकून टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीचे मुख्यमंत्र्यांना वाळवंट करायचे आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *