![]()
“राज्यातील 305 तालुके सध्या भीषण दुष्काळाच्या सावटाखाली होरपळत असून बळीराजा मोठ्या अस्मानी संकटात सापडला आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकरी आणि कष्टकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ नये, तर ती गोड व्हावी म्हणून शासन आणि शिवसेना खंबीरपणे बांधावर उभी राहिली आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची कोणीही सक्तीने कर्जवसुली करता कामा नये. खासगी सावकार, मायक्रो फायनान्स कंपन्या किंवा बँकांनी शेतकऱ्यांना छळण्याचा किंवा आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, तर थेट 302चा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही,” असा कडक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील हरसूल या आदिवासीबहुल दुर्गम भागामध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित दुष्काळग्रस्त नागरिकांना दिवाळी शिधावाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमहापौर विलास शिंदे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या 10 हजार विशेष दिवाळी शिधा किट्सचे वाटप परिसरातील आदिवासी व शेतकरी कुटुंबांना करण्यात आले. शेतकऱ्यांच्या नादाला लागाल तर गाठ आमच्याशी मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांच्या जाचावर कडक शब्दांत ताशेरे ओढताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “नांदेडमध्ये एका शेतकऱ्याला फायनान्स कंपनीच्या कार्यालयात नेऊन मारहाण करण्यात आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्या प्रकरणात पोलिसांनी थेट कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. बँका, विमा कंपन्या, खासगी सावकार किंवा मायक्रो फायनान्स संस्थांनी लक्षात ठेवावे, जर शेतकऱ्याला अडवून छळले किंवा मानसिक त्रास दिला, तर कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटू शकणार नाही. शिवसैनिक अशा लोकांना जागेवरच सरळ करतील. शासनाने सक्तीची कर्जवसुली पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे कोणीही शेतकऱ्यांच्या दारात येऊन अरेरावी करू नये. अशा लोकांना शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांच्या स्वाधीन करावे.” आत्महत्येचा विचार करू नका “आसमान फाटले तरी धीर सोडू नका, कोणत्याही बळीराजाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. तुमचा परिवार मागे उघड्यावर पडतो. तुमच्या संकटात सरकार आणि शिवसेना पूर्ण ताकदीनिशी पाठीशी उभी आहे.” 12 शासकीय सवलतींसह तातडीने 5 हजारांची मदत दुष्काळी उपाययोजना आणि शासकीय मदतीचा आढावा घेताना त्यांनी स्पष्ट केले. “राज्यातील 305 तालुक्यांमध्ये आभाळाला कोरड पडल्याने हातातोंडाशी आलेली पिके करपून गेली आहेत. मंत्रिमंडळाने प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर दुष्काळ जाहीर केला असून, त्या अंतर्गत मिळणाऱ्या सर्व १२ सवलती शेतकऱ्यांना दिल्या जातील. याशिवाय तातडीची मदत म्हणून ५ हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळाची भीषणता मांडली आहे. केंद्राकडूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सडळ हस्ते मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.” लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही “माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू झालेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही कोणत्याही परिस्थितीत आणि कोणाच्याही दबावाखाली बंद होणार नाही. याशिवाय शेतकऱ्यांसाठी केंद्राचे 6 हजार आणि राज्याचे 6 हजार असे एकूण 12 हजार रुपये सन्मान निधी सातत्याने मिळत राहील.” प्रत्येक दुष्काळग्रस्त भागात ‘शेतकरी मदत कक्ष’ सुरू करा मंत्री दादाजी भुसे आणि पक्षाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना निर्देश देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “ज्या ज्या भागात दुष्काळ आहे, तिथे शिवसेनेने तात्काळ ‘शेतकरी मदत कक्ष’ सुरू करावेत. पंचनामे वेळेवर होतात की नाही, शासकीय मदत पोहचली का, टँकर आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था आहे का, याची संपूर्ण नोंद या कक्षातून ठेवली जावी.” सामुदायिक विवाह सोहळ्यांची जबाबदारी “दुष्काळामुळे ज्या गरीब कुटुंबांना मुलींची लग्ने करणे शक्य नाही, त्यांची संपूर्ण यादी तयार करावी. या सर्व कन्यांचे सामुदायिक विवाह सोहळे शिवसेना स्वतःच्या खर्चाने पार पाडेल. याशिवाय दुर्गम पाड्यांवर लहान-मोठ्या टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा शिवसेनेमार्फत केला जाईल.” 100 टक्के समाजकारण “80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विचार घेऊन आम्ही काम करतो. सध्या सर्व निवडणुका आणि राजकारण बाजूला ठेवून 100 टक्के समाजकारणावर लक्ष केंद्रित करा आणि दुष्काळात होरपळणाऱ्या बांधवांना मायेचा हात द्या.” हरसूलमध्ये 10 हजार कुटुंबांना दिलासा कार्यक्रमाच्या शेवटी स्थानिक आदिवासी बांधवांसाठी योजनांची माहिती देताना त्यांनी सांगितले. हरसूल आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील दुर्गम भागातील १० हजार कुटुंबांना दिवाळी गोड करण्यासाठी धान्याचे व फराळाचे किट वितरित करण्यात आले. परभणीच्या धर्तीवर महिला व मुलींना मदत “यापूर्वी परभणी येथे 25 हजार शेतकरी भगिनींना शिलाई मशीन आणि 25 हजार शाळकरी मुलींना सायकलींचे वाटप केले होते. हरसूल-पेठ भागातील दुर्गम पाड्यांतील मुलींसाठीही लवकरच ही योजना राबवली जाईल.” आदिवासी भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी बंधारे व जलसंधारणाचे छोटे प्रकल्प हाती घेतले जातील, तसेच निसर्गरम्य परिसराचा विकास करून पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार मिळवून दिला जाईल. या कार्यक्रमाला पालकमंत्री दादाजी भुसे, उपमहापौर विलास शिंदे, माजी आमदार निर्मलाताई गावित, धनराज महाले, बाळासाहेब लांबे, अनिल डिकले, सदा नवले, रवींद्र भोये, नैना गावित यांच्यासह हजारो नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ————————————————- हेही वाचा… प्रकल्प अडवून कोकणाचा विकास रोखायचा का?: कर्जतमध्ये 48,500 झाडे तोडली तरी साताऱ्यात 70 हजारांपेक्षा जास्त झाडे लावणा – भरत गोगावले “तिसरी मुंबई उभी राहत असताना, वाढत्या लोकसंख्येला आणि महाकाय उद्योगांना लागणाऱ्या विजेची सोय करण्यासाठी कर्जत येथील जलविद्युत प्रकल्प आवश्यक आहे. या प्रकल्पात 48,500 झाडे तोडली जाणार असली, तरी पर्यावरण संवर्धनासाठी साताऱ्यातील पाटण तालुक्यात तब्बल 70 हजारांहून अधिक झाडांची नवी लागवड केली जाणार आहे. प्रकल्पांना असेच सतत विरोध होत राहिला, तर कोकणाचा विकास कसा होणार?” असा रोखठोक सवाल राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थित केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
सक्तीची कर्जवसुली करून शेतकऱ्याला छळाल तर तुरुंगात खडी फोडायला पाठवू:नाशिकमधून एकनाथ शिंदेंचा इशारा, 10 हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप