Headlines

Eknath Shinde Nashik Visit; Slams Congress Statement On PM Modi


“राज्यातील शेतकरी आणि बळीराजा सध्या मोठ्या दुष्काळी संकटात सापडला आहे. अशा बिकट प्रसंगी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत, ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचे पाणी, टँकर, जनावरांचा चारा आणि गाळपेऱ्यातील चारा लागवडीचे काटेकोर नियोजन प्रशासनाने करावे.

.

नाशिक दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय प्रशासनासोबत दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, कर्जमाफी आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा उच्चस्तरीय आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शासकीय उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

ऑगस्ट 2027 पर्यंत चारा व पाण्याचे नियोजन करा

दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाला दिलेल्या सूचनांचा पाढा वाचताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असून ऑगस्ट 2027 पर्यंत टँकर, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची कोणतीही कमतरता भासणार नाही, या दृष्टीने प्रशासनाने आतापासूनच संपूर्ण पूर्वतयारी करावी. धरणांच्या आजूबाजूला आणि गाळपेरा जमिनींमध्ये चारा लागवडीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जावे.”

पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य

“उपलब्ध पाणीसाठ्यातून सर्वप्रथम नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण ठेवावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. टंचाईग्रस्त भागात आवश्यकतेनुसार तातडीने पाण्याचे टँकर सुरू करण्यात येतील. दुष्काळी कामांमध्ये निधीची कमतरता भासू नये म्हणून जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या (DPDC) माध्यमातून आवश्यक ते निर्णय घेण्याची पूर्ण मोकळीक स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे.”

18,000 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा

शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले. “नाशिक जिल्ह्यात कर्जमाफीच्या निर्णयानुसार सुमारे 18,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आलेली आहे. एका बाजूला प्रशासकीय मदत आणि दुसऱ्या बाजूला थेट आर्थिक दिलासा देण्याचे काम शासन करत आहे.”

सक्तीच्या वसुलीवर थेट कारवाई

“शासनाने सक्तीची कर्जवसुली पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रो फायनान्स कंपन्या किंवा बँकांनी जर दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना छळण्याचा किंवा सक्तीची वसुली करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणारी कोणतीही दुर्दैवी घटना घडता कामा नये. नाशिक व दिंडोरी या दोन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आला असून, कृषी विभागानेही त्यावर सकारात्मक अहवाल दिला आहे. लवकरच या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी सवलतींमध्ये अधिकृत अंतर्भाव केला जाईल.”

शासनाकडून 5 हजार रुपयांची मदत

“शासनाच्या वतीने दुष्काळग्रस्तांना अन्नधान्य वाटपासह जाहीर केलेली 5,000 रुपयांची तातडीची मदत दिली जाईल, तसेच दुष्काळातील सर्व 12 सवलती व लाभ शेतकऱ्यांना मिळतील.”

कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाला राष्ट्रपती महोदयांची उपस्थिती!

नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. “आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी देशाच्या राष्ट्रपती महोदया नाशिकमध्ये उपस्थित राहणार असून प्रशासनाने त्या दृष्टीने संपूर्ण जय्यत तयारी केली आहे. कुंभमेळ्यानिमित्त शहरात सुरू असलेली सर्व विकासकामे दर्जेदार पद्धतीने आणि दिलेल्या वेळेतच पूर्ण केली जातील. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये येतील, त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक मंत्री आणि प्रशासन जातीने लक्ष ठेवून आहेत.”

शंखनादाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

“कुंभमेळ्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या भव्य शंखनादाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली असून, हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि भाग्याची गोष्ट आहे.”

मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत; पर्यायी वाहतुकीचे आदेश

मुंबईत मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होऊन प्रवाशांचे होत असलेल्या हालांवर विचारले असता, त्यांनी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी (ST), बेस्ट (BEST) आणि इतर पर्यायी वाहतूक सेवा तातडीने सक्षम करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले असल्याचे सांगितले.

पंतप्रधानांच्या आई-वडिलांवर बोलणे ही काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी!

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या विधानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदीतून बोलताना अत्यंत कडक शब्दांत निषेध केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्यांचे वडील आणि मातोश्री यांच्याबद्दल काँग्रेस नेत्यांकडून अपशब्द वापरले जाणे हे अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. एका दिवसाचीही सुट्टी न घेता 140 कोटी जनतेसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या पंतप्रधानांचा हे लोक केवळ जळफळाटातून आणि पोटदुखीतून अपमान करत आहेत.”

काँग्रेस स्वतःच खड्ड्यात जाईल

“काँग्रेसच्या लोकांचे डोके फिरले असून, ते जेवढ्या शिव्या मोदीजींना देतील तेवढे स्वतःच अधिक खोल खड्ड्यात जातील. 2014 पूर्वी देशात बॉम्बस्फोट आणि महाघोटाळे होत असताना काँग्रेस मूग गिळून बसत होती, मात्र आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी घरात घुसून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. देशातील जनता संपूर्णपणे पंतप्रधान मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”

—————————————————————

हेही वाचा…

लवासा-अ‍ॅम्बी व्हॅलीला पर्यावरण आठवले नाही!:मग भीमाशंकरच्या जलविद्युत प्रकल्पालाच विरोध कशासाठी? सदाभाऊ खोत यांचा विरोधकांवर थेट प्रहार

“श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी मुळशीत 25,000 एकरावर लवासा आणि लोणावळ्यात 10,600 एकरावर अ‍ॅम्बी व्हॅली सिटी उभी राहिली, तेव्हा तथाकथित पर्यावरणप्रेमींना निसर्गाचा ऱ्हास दिसला नाही. आता मात्र भीमाशंकर परिसरामध्ये 600 एकरावर शेतकऱ्यांना आणि उद्योगांना लागणारी स्वस्त वीज देण्यासाठी जलविद्युत प्रकल्प उभा राहत असताना, हेच उपटसुंभ विरोध करायला पुढे आले आहेत. प्रकल्प परराज्यात गेला तरी ओरडायचे आणि राज्यात आला तरी आक्रमक व्हायचे, या विरोधकांना नेमके काय करायचे आहे यासाठी त्यांचे आधी प्रशिक्षण शिबिर घ्यायला हवे,” असा घणाघाती हल्लाबोल रयत क्रांती संघटनेचे प्रमुख तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.