Headlines

प्रकल्प अडवून कोकणाचा विकास रोखायचा का?:कर्जतमध्ये 48,500 झाडे तोडली तरी साताऱ्यात 70 हजारांपेक्षा जास्त झाडे लावणा – भरत गोगावले




“तिसरी मुंबई उभी राहत असताना, वाढत्या लोकसंख्येला आणि महाकाय उद्योगांना लागणाऱ्या विजेची सोय करण्यासाठी कर्जत येथील जलविद्युत प्रकल्प आवश्यक आहे. या प्रकल्पात 48,500 झाडे तोडली जाणार असली, तरी पर्यावरण संवर्धनासाठी साताऱ्यातील पाटण तालुक्यात तब्बल 70 हजारांहून अधिक झाडांची नवी लागवड केली जाणार आहे. प्रकल्पांना असेच सतत विरोध होत राहिला, तर कोकणाचा विकास कसा होणार?” असा रोखठोक सवाल राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थित केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना भरत गोगावले यांनी टोरंट पॉवर प्रकल्पावरील वृक्षतोडीचे समर्थन केले. तसेच सुनील तटकरे यांच्याविषयीच्या तक्रारी, विरोधकांचे भ्रष्टाचाराचे आरोप, कथित 500 कोटींची ऑडिओ क्लिप, महायुतीतील अंतर्गत समन्वय आणि अर्थखात्याच्या वाटपावर पक्षाची सविस्तर भूमिका मांडली. 48,500 झाडे तुटणार, पण साताऱ्यात 70 हजारांवर लागवड करणार कर्जत येथील प्रस्तावित जलविद्युत साठवण प्रकल्पावरून विरोधक आणि पर्यावरणप्रेमींकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना गोगावले म्हणाले, “कर्जत तालुक्यातील गावांमध्ये येऊ घातलेल्या या प्रकल्पाला केंद्र सरकार, वन विभाग, जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाने रीतसर मंजुरी दिली आहे. जेएनपीटी बंदर, दिघी पोर्ट, वाढवण बंदर, नवी मुंबई व मुंबई विमानतळ, मुंबई-पुणे मिसिंग लिंक आणि मुंबई-गोवा महामार्ग यामुळे सध्या सर्वाधिक औद्योगिक विकास रायगड जिल्ह्यात होत आहे. या उद्योगांना वीज हवी असल्यास अशी वीजनिर्मिती केंद्र उभी करावीच लागतील.” साताऱ्यात 233 हेक्टर जमीन वर्ग “प्रकल्पासाठी वन विभागाने 233 हेक्टर जागा दिली आहे. त्याच्या बदल्यात शासनाने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात तेवढीच जमीन वर्ग केली आहे. तिथे 70 हजारांहून अधिक झाडे लावली जातील. याशिवाय आणखी 30 हेक्टर जागा देऊन तिथेही वृक्षारोपणाचा आमचा मानस आहे. त्यामुळे 48,500 झाडे तुटली तरी 70 हजारांपेक्षा जास्त झाडे जगवून वाढवली जातील.” झाडे पुन्हा वाढू शकतात, गेलेला प्रकल्प परत येत नाही “झाडे पुन्हा लावून वाढवता येतात; मात्र विरोध करून जर मोठा प्रकल्प राज्याबाहेर किंवा कोकणातून निघून गेला, तर तो पुन्हा मिळवणे कठीण होते. विरोधकांचे कामच अडवणूक करण्याचे आहे. ते त्यांचे काम करत आहेत, आम्ही आमचे काम करत राहू.” सुनील तटकरेंबाबत तक्रार आली तर खातरजमा करू रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील कथित वादावर आणि खासदार सुनील तटकरे यांच्याविषयी विचारले असता ते म्हणाले, “कोकणातील नेत्यांनी तटकरेंविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची मला अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र, साहेबांकडे तशी काही तक्रार आली असल्यास आम्ही त्याची खातरजमा करू. संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरला असतात, त्यांना कोणी काय सांगितले हे त्यांना विचारू. राजकारणात कधी कोणाचे जमले आणि कधी बिघडले हे सांगता येत नाही. पण महायुतीमध्ये एकत्रितपणे पुढे जायचे असे आमचे ठरले आहे. त्यामुळे वादावर पडदा टाकून समन्वयाने काम केले जाईल.” वडेट्टीवारांनी अधिवेशनात आरोप सिद्ध करावेत विरोधी पक्षांच्या टीकेचा समाचार घेताना गोगावले आक्रमक झाले. “विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्र्यांच्या कथित भ्रष्टाचारावर विधाने केली आहेत. आता ऑक्टोबर संपत आला असून नोव्हेंबरनंतर डिसेंबरमध्ये नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होईल. अजून 1 ते सव्वा महिना बाकी आहे; त्यांनी तयारी करावी, आम्हीही तयार आहोत. त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ.” राऊतांचे वक्तव्य हे निव्वळ मनोरंजन “संजय राऊत हे वेगळे रसायन आहे. रोज सकाळी 9 वाजता टीव्हीवर हजेरी लावल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. तडक-भडक बोलून सनसनाटी निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव आहे.” 500 कोटींच्या क्लिपची निष्पक्ष चौकशी व्हावी कथित ऑडिओ क्लिप आणि मंत्रिमंडळ फेरबदलावर बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “कथित 500 कोटींच्या व्यवहाराच्या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी सुरू असून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ समोर येईल. संकट काळात महाड-पोलादपूरचा महापूर असो, दरड कोसळण्याची घटना असो वा जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यातील नागरिकांची मदत असो; एकनाथ शिंदे नेहमी धावून गेले आहेत. अशा नेतृत्वावर विनाकारण आरोप होत असतील, तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही यावर मिश्कील प्रत्युत्तर देऊन विरोधकांची बोलती बंद केली आहे.” अर्थखात्याबाबत स्पष्ट मत “राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा अर्थखात्याची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, पूर्वी हे खाते ज्यांच्याकडे (अजित पवार यांच्याकडे) होते, त्यांनाच ते पुन्हा द्यायला काहीच हरकत नाही. ते काही वेगळे किंवा अतिरिक्त मागत नसून आपले जुनेच खाते मागत आहेत. मंत्रिमंडळातील इतर बदलांबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून योग्य तो निर्णय घेतील,” असेही गोगावले यांनी शेवटी स्पष्ट केले. ———————————————— हेही वाचा… मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?: कर्जतमधील वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला सवाल, म्हणाले- जनतेने आता पेटून उठावे
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि भीमाशंकर अभयारण्य परिसरात ‘टोरेंट पॉवर’ कंपनीच्या प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांनंतर आता पर्यावरणप्रेमी आणि अभिनेत्यांनी या जंगलतोडीविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. ‘सह्याद्री देवराई’च्या माध्यमातून राज्यभरात वृक्षारोपणाची मोठी चळवळ उभी करणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीवरून सरकारवर सडकून टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीचे मुख्यमंत्र्यांना वाळवंट करायचे आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *