![]()
हिंगोली शहरात नळ पाणीपुरवठ्याद्वारे येणारे पाणी वाया घालवणाऱ्या ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय हिंगोली नगरपरिषदेने घेतला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर पालिका प्रशासनाने या संदर्भातील निर्णय घेतला असून नागरीकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर, मु्ख्याधिकारी प्रांजली मुंढे यांनी केले आहे. हिंगोली शहराला सिध्देश्वर धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी धरणामध्ये केवळ 35 टक्केच पाणी आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यापैकी काही पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यानुसार राखीव पाण्यातूनच शहराला पाणी पुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, हिंगोली शहरातील 17 प्रभागांमधील नागरीकांना योग्य दाबाने व मुबलक पाणी पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी पुरवठ्यामध्ये 10 टक्के कपात करण्यात आली आहे. तर नागरीकांनीही पाण्याची बचत करावी, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून केले जात आहे. दरम्यान, नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर, मुख्याधिकारी प्रांजली मुंढे यांनी नुकतेच प्रसिध्दी पत्रक जारी केले आहे. यामध्ये नागरीकांनी घरातील नळांमधून पाण्याची गळती होत असल्यास संबंधित नळांची तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी. पाणी भरून झाल्यानंतर नळ व्यवस्थित बंद करता यावा आणि पाण्याचा अपव्यय टाळता यावा, यासाठी प्रत्येक नळाला योग्य प्रकारची तोटी किंवा नळ बंद करण्याची व्यवस्था बसवून घ्यावी. शहरातील पाण्याचा अपव्यय रोखणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि सर्व नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होण्यास मदत करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नळ उघडे ठेवल्यामुळे होणारी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी सर्व नळधारकांनी तातडीने दुरुस्ती व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, कोणत्याही घरगुती नळ जोडणीतून पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नळधारकाची नळजोडणी खंडित करण्यात येईल, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.
Source link
हिंगोलीकरांनो, पाणी जपून वापरा:पाण्याचा अपव्यय केल्यास नळ जोडणी थेट खंडित होणार, सिद्धेश्वर धरणात केवळ 35% पाणी साठा असल्याने पालिकेचा इशारा