![]()
पाली आणि सह्याद्री परिसरातील डोंगर आणि वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निसर्गावरील हा घाव थांबवण्यासाठी येत्या 3 तारखेला होणाऱ्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन रद्द करण्याची थेट मागणी जरांगे यांनी केली आहे. सरकारने स्थानिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास सावध राहावे, असा सल्ला देत त्यांनी स्थानिकांना एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हा लढा शांततेत पण तितक्याच तीव्रतेने लढा, वेळ पडल्यास हेलिकॉप्टरखाली झोपा पण वृक्षतोड होऊ देऊ नका, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे म्हणाले, हा विषय फक्त पाली गावापूर्ता मर्यादेत ठेऊ नका. या सह्याद्रीच्या चारी दिशेला असलेल्या लोकांना एकत्र करा. याचे कारण सांगतो, आज पाली गावावर आणि डोंगरावर घाव झाला, काही दिवसांनी चारही दिशांच्या झाडांवर घाव होईल, तुमच्या अस्तित्वावर घाव होईल. त्यांना आत्ताच जागे करा. तुमच्यात एकजूट राहू द्या. हे लोक इतके विचत्र आहेत, तुमच्यातले किती लोकं फोडले आणि माहिती सरकारला पुरवली हे कळणार सुद्धा नाही. मला 3 वर्ष कळाले नाही. हे मोठी चळवळ आहे. ही टिकवण्यासाठी माझे अनुभव तुम्हाला सांगितले. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, तुमच्यासोबत लढायला आहोत असे सुद्धा ते लोकं दाखवतील, तुमचे प्लॅनिंग सुद्धा ते करून देऊ शकतात, यावर बारकाईने लक्ष ठेवा. सरकारने फोडले तर फुटू नका. याच्यापासून सगळे सावध रहा. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाचे पंतप्रधान यांना माझे सांगणे आहे जे 3 तारखेला उद्घाटन ठेवले आहे ते रद्द करावे, अशी मागणी आहे. इथे जर आले तर तुम्हाला वाटा पळवाटा माहीत आहेत, त्यांचे हेलिकॉप्टर आले तर कुठून उडेल? हेलिकॉप्टरच्या खालीच झोपा, आम्ही आहेच तुमच्या सोबत. आपल्या इथे येऊन दंगा मस्ती करायची नाही, दादागिरी नाही करायची आणि आमच्या भावना समजून घ्यायच्या, तर ते सरकार म्हणता येईल. कोकणचा सगळा पट्टा आणि भीमाशंकरच्या डोंगरावर असे वादळ दिसले पाहिजे, तुमचे अस्तित्व तुम्ही टिकवा आणि आंदोलन हे शांततेत करायचे. जाळपोळ करायची नाही. जिथे उद्घाटनचे ठिकाण आहे, तिथून ते जाऊ शकत नाही कारण वाटा तुम्हाला माहीत आहे. वृक्षतोड थांबवली पाहिजे, अशी विनंती सध्या आपण पंतप्रधानांना करतो. नंतर विनंती नाही करणार. कारण इथल्या लोकांमध्ये छत्रपती शिवरायांचे रक्त आहे.
Source link
वृक्षतोडीवरून मनोज जरांगे आक्रमक:पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम रद्द करण्याची केली मागणी; स्थानिकांना एकजूट राहण्याचे आवाहन