Headlines

प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी ठाणे पोलिसांची मोठी माहिती:आतापर्यंत 5 आरोपींना अटक; कायदा हातात घेणाऱ्यांनाही कारवाईचा इशारा




ठाण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची गेल्या महिन्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पूर्णेकरांच्या हत्येनंतर ठाण्यात चांगलेच वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तर शिंदे गटाने देखील याला पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आज ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद आयोजित करत तपासासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ठाणे पोलिसांनी म्हटले की, आज आपण या ठिकाणी जो कापूरबावडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे त्या अनुषंगाने झालेल्या तपासाबाबत आपल्याला विस्तृत माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे यापूर्वी वारंवार आमचे एसआयटीचे तपासी अधिकारी त्याचबरोबर तपास प्रमुख यांनी आपल्याला वेळोवेळी तपासाबद्दल अवगत केलेलं आहे. तरीसुद्धा आत्तापर्यंत जो तपास झालेला आहे त्याचं एक सविस्तर आपल्याला एक विवेचन या ठिकाणी करण्यात येईल. पुढे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कापूरबावडी पोलिस स्टेशनला गु.र.नं. ४७२/२४ कलम भारतीय न्याय संहिता १०३(१), ३(५), ६१, सह शस्त्र अधिनियम ३, २५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी त्यामधला एक जो मारेकरी आहे त्याला स्पॉटवरती पकडण्यात आलेलं आहे. सुभाष उर्फ पप्या शिंदे. यानंतर या घटनेच्या अनुषंगाने गांभीर्य लक्षात घेऊन आपण तात्काळ गुन्हा दाखल केला. पोस्ट मॉर्टमसाठी जे काही मयताची बॉडी आहे ती आपण जे जे हॉस्पिटलला पाठवलेली आहे जेणेकरून जे जे हॉस्पिटलला त्याचं प्रॉपर शविच्छेदन होईल याची दक्षता घेतली. आणि लगेच यामध्ये माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने एक तपास पथक निर्माण केलेलं आहे. त्या तपास पथकामध्ये अधिकारी आणि कर्मचारी मिळून जवळपास २३ अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश आहे. 12 साक्षीदारांचे स्टेटमेंट रेकॉर्ड पुढे ते म्हणाले की, याचे तपास प्रमुख शैलेश साळवी आहेत आणि तपासाचे जे पथकाचे प्रमुख आहेत ते अमरसिंग जाधव आहेत. मला या ठिकाणी हे सांगावसं वाटतं या गुन्ह्याच्या अनुषंगाने जो आपल्याला पुरावा आवश्यक होता त्या पुराव्याची आपण अगोदर जुळवाजुळव करायचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये जो काही सीसीटीव्ही फुटेज होते ते सीसीटीव्ही फुटेज वेगवेगळ्या ठिकाणचे प्राप्त केले जशी जशी आपल्याला माहिती मिळत गेली त्याप्रमाणे आपण ते सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केलेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये जवळपास १२ साक्षीदार जे आहेत महत्त्वाचे त्यांचे आपण स्टेटमेंट्स रेकॉर्ड केलेले आहेत. त्याचबरोबर यातील जे काही महत्त्वाचे साक्षीदार आहेत राम पूर्णेकर, नंतर जयनाथ पूर्णेकर आणि इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे आपण जबाब आणि जे पुरवणी जबाब असतील, ॲडिशनल त्यांची इन्फॉर्मेशन ती पण आपण नोंद केलेली आहे. आणि त्याचा सुद्धा तपासकामी आपण उपयोग करत आहोत. त्याचबरोबर या घटनेच्या अनुषंगाने आपण जो पहिला आरोपी आहे सुभाष उर्फ पप्या शिंदे याला अटक केली. त्यानंतर त्याची जवळपास १३ ते १४ दिवस आपण पोलीस कस्टडी मिळवलेली आणि त्याच्याकडे सविस्तर इंट्रोगेशन केलेलं आहे. दोन मोटरसायकल एक अल्टो कार जप्त त्यानंतर यामध्ये जे अजून दोन आरोपी आहेत यादव आणि नितेश पवार यांना सुद्धा २ ऑक्टोबर रोजी अटक करून त्यांची सुद्धा १३ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेऊन त्यांच्याकडे सविस्तर तपास करण्यात आलेला आहे. तपासादरम्यान या आरोपींकडनं निखिल यादव आणि नितेश पवार हे जे आहेत त्यामध्ये नितेश पवार उर्फ भावड्या याच्याकडनं निवेदन पंचनाम्याप्रमाणे एक पिस्तूल आणि एक मोबाईल जप्त केलेला आहे. त्याचबरोबर या तपासकामी जी काही गाड्या वापरल्या दोन मोटरसायकल एक अल्टो कार ही सुद्धा आपण जप्त केलेली आहे आणि हा जो काही जप्त मुद्देमाल आहे तो सर्व फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच यामध्ये महत्त्वाची बाब आहे का यामध्ये काही जे महत्त्वाचे साक्षीदार आहेत त्यांचे सुद्धा आपण १६४ जे गुन्हा पूर्वीचा जो आयपीसी १६४ आहे किंवा आताचा १८३(२) याप्रमाणे आपण माननीय न्यायालयासमोर कबुली जबाब नोंद करणार आहोत त्या अनुषंगानेही पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचबरोबर ज्या सुरुवातीला घटना घडली त्यावेळेस आरोपी बाहेर पळून जातील किंवा ते उत्तर प्रदेश साईडचे आहेत हे लक्षात घेऊन आपण त्यांची एलओसी सुद्धा ओपन केली. टल्ली जो आहे त्याची पासपोर्टची माहिती प्राप्त करून एलओसी ओपन केली, एसटीएफच्या संपर्कात राहिलो आणि त्या ठिकाणी एसटीएफच्या मदतीने आपण प्रकाश कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंग जयकिशन उर्फ पपलू या दोघांनाही अटक केलेली आहे. त्यांना अटक केल्यानंतर १२ तारखेला १२ ऑक्टोबरला आपण न्यायालयात हजर केले आणि त्यांची २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी होती. ओळख परेड करण्यात येणार हे सर्व आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असतानी त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल विचारपूस केलेली आहे. त्यांनी जी काही माहिती डिस्क्लोज केली त्या माहितीच्या अनुषंगाने आपल्याला गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यास मदत झालेली आहे. आता यामध्ये काही महत्त्वाचे अजून जे एव्हिडन्सेस आहेत त्यामध्ये आरोपीची ओळख परेड हा एक भाग आहे त्या अनुषंगाने सुद्धा आपण माननीय न्यायालयाला पत्रव्यवहार केलेला आहे जेणेकरून घटनास्थळावर जे आरोपी आले होते ज्यांना कोणी साक्षीदारांनी बघितलं त्यांची आपण त्यांच्या मदतीने ओळख परेड करून घेणार आहोत. असा हा सविस्तर गुन्ह्याचा आत्तापर्यंत तपास झालेला असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. त्याचबरोबर जी गाड्या जप्त केल्या त्या गाड्यांची सुद्धा माहिती आपण आरटीओकडनं प्राप्त केली आहे. सीडीआर प्राप्त केलेले आहेत. त्यानंतर वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आरोपीकडे चौकशी केलेली आहे. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत जे पुरावे निष्पन्न झालेले आहेत ते आपल्या समोर आलेले आहेत. ते सर्व साक्षीदार त्यानंतर बायोलॉजिकल एव्हिडन्स जे आपण ब्लड किंवा वेपन्स पिस्तूल हे जप्त केले ते एफएसएलला पाठवलेले आहेत. त्याचबरोबर टेक्निकल अनालिसिस आणि सीडीआर याच्या अनुषंगाने ह्या सगळ्या गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपींचा ताळमेळ घालून त्या पद्धतीने या गुन्ह्याचा तपास चालू आहे. तर माझं एकच सर्वांना विनंती आहे किंवा सांगणं आहे की या गुन्ह्यामध्ये जी काही घटना आहे त्या घटनाच्या अनुषंगाने इन डिटेल इन्व्हेस्टिगेशन करून पुरावे गोळा करून आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र पाठवण्याची आमची जी कर्तव्य आहेत ती आम्ही निश्चितपणे करूया. फक्त एकच सांगणं आहे यामध्ये तपासादरम्यान आम्ही बऱ्याच गोष्टीसाठी लोकांना विचारतो सहकार्य करा परंतु अपेक्षित ते असं सहकार्य काही ठिकाणी मिळत नाही. जसं की आता आम्हाला १६४ चे स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे आहेत. तर ते जर लवकर झाले तर आपल्याला यामध्ये पुराव्याकामी बळकटी मिळेल. असा हा एकंदरीत सर्व हा गुन्ह्याचा तपास आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत सुद्धा प्रॉपर अनालिसिस करून जे काही त्यामध्ये पुरावे आहेत त्याचे धागेदोरे त्याची जुळवाजुळव करून तपासाची दिशा निश्चित होणार आहे. तर हे झालं एक तपासाच्या बाबतीमध्ये. आता आपण बघत असाल हा तपास चालू असतानी गेल्या काही दिवसात किंवा कालची घटना बघितली आपण तर सर्व तपास हा चालू असतानी सुद्धा केवळ तपासामध्ये तपासाबद्दल वेगळ्या पद्धतीचा भावना ठेवून काही ठिकाणी कायद्या आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे. काल आपण बघितलं असेल नौपाडा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे रास्ता रोको केला. सकाळी १२-१ वाजता माणसं गेली रात्रभर ते चाललं. त्यानंतर माजीवडा नाका किंवा चितळसरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या ठिकाणी लोकांनी रास्ता रोको केला, हायवेला जॅम केलं, टायर जाळले, अशा प्रकारे जो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न होतो आहे ती बाब जरा गंभीर आहे. आणि त्या अनुषंगाने सुद्धा चितळसर पोलीस स्टेशन आणि कापूरबावडी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्वमेंट असेल त्याचा सुद्धा सखोल तपास करून पुढची कारवाई केली जाईल. या अनुषंगाने माझं फक्त ठाणेकरांना आणि आपल्या सर्वांना एक विनंती आहे, आव्हान आहे की गुन्ह्याचा तपास हा सविस्तर चालू आहे. एसआयटी स्थापन केलेली आहे, त्याचं प्रॉपर मॉनिटरिंग होत आहे. तरीसुद्धा कोणीही कायदा हातात घेऊन या तपासाला अडथळा निर्माण होईल किंवा लोकांच्या भावना दुखावल्या जातील किंवा लोकांस वेठीस धरल्या जाणार नाही याची सर्वांनी काळजी घेणं अपेक्षित आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये काल आपल्याला माहित असेल बऱ्याच ठिकाणी अम्बुलन्सेस अडकल्या. बऱ्याच लोकांना घरी जाता आलं नाही. बरेच लोक पेशंट असतात त्यांना वेळेवर गोळ्या घ्याव्या लागतात, हे करावं लागतं ते करावं लागतं. परंतु त्या ठिकाणी खूप लोकांना त्रास सहन करावा लागला. तर एकच विनंती आहे गुन्ह्याचा तपास चालू राहील परंतु कोणीही कायदा हातात घेऊ नये किंवा तसा प्रयत्न करू नये. आणि जर तसा काही प्रयत्न केला तर शेवटी कायद्याचं राज्य आहे त्याप्रमाणे कार्यवाही ही करणं अपेक्षित आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *