Headlines

मी 18 वर्षांचा दुष्काळ संपवला अन् प्रस्थापित गिळला!:मराठवाडा पदवीधरमध्ये 20 हजारांवर मते घेणाऱ्या रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया




मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षांची मक्तेदारी मोडून काढत एका शेतकरीपुत्राने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्ध रिलस्टार आणि उद्यमशील शेतकरी रविराज साबळे-पाटील यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरत तब्बल 20,450 पहिल्या पसंतीची मते मिळवत महायुतीचे सलग 3 टर्म आमदार राहिलेले प्रस्थापित नेते सतीश चव्हाण यांच्या पराभवाचा मार्ग सुकर केला. “मी केवळ 28 दिवसांत प्रचार करून एक भलामोठा प्रस्थापित गिळला आहे आणि मराठवाड्यातील पदवीधरांचा 18 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. पहिल्या फेरीत कोटा पूर्ण न झाल्याने आता माझ्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवरच दोन्ही प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे,” अशी खणखणीत आणि रोखठोक प्रतिक्रिया रविराज साबळे यांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पहिल्या पसंतीक्रमात 73,931 मते मिळवत तब्बल 13,163 मतांची भक्कम व निर्णायक आघाडी घेतली आहे. विजयाचा अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच डॉ. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. पक्षांची मक्तेदारी मोडीत काढली निवडणूक निकालांमधील चमकदार कामगिरीनंतर मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांशी बोलताना रविराज साबळे म्हणाले, “मी 24 सप्टेंबर रोजी निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली होती. प्रचारासाठी माझ्याकडे अवघे २८ दिवस होते. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही केवळ मातब्बर राजकीय पक्षांचीच मक्तेदारी मानली जाते. मात्र, कोणताही राजकीय वारसा नसताना मी थेट तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.” माझ्या मतांवरच निकाल ठरणार “पहिल्या पसंतीक्रमात कोणत्याही उमेदवाराने ८८,५५८ चा विहित कोटा गाठलेला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या पसंतीक्रमाची मते मोजली जात आहेत. मला मिळालेली २०,४५० मते ही दोन प्रमुख उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. मी एक प्रस्थापित नेता गिळून मराठवाड्यातील पदवीधरांचा १८ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.” विदर्भात कराळे मास्तर, तर मराठवाड्यात साबळेंचा ‘सोशल मीडिया फॅक्टर’ ठरला गेमचेंजर यंदाच्या विधानपरिषद निवडणुकीत सोशल मीडियाचे दोन मोठे चेहरे राजकारणात प्रभावी ठरले. शेती आणि सुशिक्षित तरुणांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यांवर सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या रविराज साबळे यांनी तळागाळातील पदवीधरांशी थेट संपर्क साधला. सतीश चव्हाणांविरोधातील नाराजीचा फायदा सलग 18 वर्षे (3 टर्म) आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांच्या विरोधात पदवीधरांमध्ये असलेली सुप्त नाराजी आणि महायुतीमधील अंतर्गत धुसफुस मतपेटीतून बाहेर पडली. या नाराजीची मते मोठ्या प्रमाणावर रविराज साबळे यांच्या पारड्यात गेल्याने चव्हाणांचा मोठा राजकीय गेम फिरला. तिसऱ्या फेरीअखेर अधिकृत सांख्यिकी आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिसऱ्या फेरीअखेर जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी पुढीलप्रमाणे: एकूण मोजलेल्या मतपत्रिका: १,९३,६५५ एकूण वैध मते: १,७७,११५ अवैध (हस्तांतरणास अपात्र) मते: १६,५४० विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा: ८८,५५८ प्रमुख उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीची मते: डॉ. प्रतापसिंह पाटील (महाविकास आघाडी): ७३,९३१ मते सतीश चव्हाण (महायुती): ६०,७६८ मते रविराज साबळे-पाटील (अपक्ष): २०,४५० मते दिलीप घुगे (उबाठा): ८,४३९ मते मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण; निवडणूक आयोगाच्या सूचना तिसऱ्या फेरीअखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी १३,१६३ मतांची भक्कम आघाडी कायम राखल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटले आणि गुलालाची उधळण केली. कार्यकर्त्यांची वाढती गर्दी आणि घोषणाबाजी लक्षात घेता निवडणूक आयोगाने व पोलिसांनी कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसराबाहेर राहण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. पहिल्या पसंतीक्रमात कोणालाही ८८,५५८ हा जादुई कोटा गाठता न आल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांचे हस्तांतरण सुरू असून, डॉ. पाटील यांचा विजय आता केवळ औपचारिकतेचा भाग उरला आहे. ———————————————————————– हेही वाचा… मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 13 हजार मतांनी आघाडीवर: पुणे शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीतून काँग्रेसचे जयंत आसंगावकर बाद महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या मतमोजणीचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आले नसले, तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *