![]()
कोयना धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग थांबवल्यामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांवर भयंकर पाणीबाणी ओढवली आहे. या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सत्ता संघर्षामध्ये या तीन जिल्ह्यांतील जनतेचा बळी जात आहे. आज पाणी सोडले नाही तर उद्या सांगलीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळणार आणि स्वतः धरणावर जाऊन पाणी सोडणार,” असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ‘शंभूराज देसाईंच्या आदेशाने पाणी थांबले’ शेट्टी म्हणाले, “कोयना धरणात सध्या ८९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. यावर्षी धरण १००% भरले होते. वीजनिर्मितीसाठी १,००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता, ज्यामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या जनतेला पिण्यासाठी आणि शेतीला पाणी मिळत होते. मात्र, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आदेश देऊन हे पाणी थांबवले. परिणामी, कृष्णा आणि कोयना नद्या आता पूर्णपणे कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत.” ‘सांगलीला उद्या पाण्याचा थेंबही मिळणार नाही’ परिस्थितीचे गांभीर्य मांडताना शेट्टी म्हणाले, “मी १८ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर विमानतळावर भेटून सावध केले होते. २६ तारखेला पुन्हा फोन करून पाणी सोडण्याचे आदेश देण्याची विनंती केली. त्यांनी ‘लगेच आदेश देतो’ असे सांगितले, पण काहीच झाले नाही. उद्या दुपारनंतर सांगलीला पिण्यासाठी पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज पाणी सोडले तरी ते सांगलीला पोहोचायला ५ दिवस लागतील, तोपर्यंत सांगलीकरांनी काय करायचे?” ‘शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव’ पाणी न सोडण्यामागे राजकीय कट असल्याचा आरोप करत शेट्टी म्हणाले, “शेतकऱ्यांचा ऊस वाळल्याशिवाय साखर कारखाने चालू होणार नाहीत, हा मुख्यमंत्र्यांचा डाव आहे. एकनाथ शिंदेंनीच पाणी सोडू नका असे सांगितल्याचे मला समजले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या अंतर्गत राजकारणात आणि भांडणात सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे.” ‘स्वतः धरणावर जाऊन पाणी सोडेन’ सरकारला शेवटचा इशारा देताना शेट्टींनी आक्रमक भूमिका घेतली. “आज जर पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही, तर उद्या सायंकाळी सांगलीच्या स्टेशन चौकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळले जातील. एवढेच नाही, तर सर्वसामान्य जनतेला घेऊन मी स्वतः कोयना धरणावर जाणार आणि पाणी सोडणार. बघू कोण आडवायला येतंय ते! ते पाणी आमच्या हक्काचे आहे, त्या धरणासाठी आमच्या बापजाद्यांनी जमिनी, घरेदारे दिली आहेत. तुमचे हे क्षुद्र राजकारण आम्ही खपवून घेणार नाही,” असा इशारा त्यांनी भरला. ————— हेही वाचा.. कर्जाचा हप्ता न भरल्याने एजंट्सकडून शेतकऱ्याचे अपहरण:3 दिवसांनंतर फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मृतदेह आढळला; 5 जणांना अटक नांदेड जिल्ह्यात ४० वर्षीय शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह एका खासगी वित्त कंपनीच्या कार्यालयात सापडला. कर्जाचा हप्ता न भरल्यामुळे वसुली एजंटनी चंद्रकांत यांचे अपहरण केल्याचा आरोप कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी केला आहे. तीन दिवसांनंतर त्यांचा मृतदेह सापडला. सविस्तर वाचा
Source link
पाणी सोडलं नाही तर स्वतः कोयना धरणावर जाऊन पाणी सोडेन:बघू कोण अडवतंय? राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा