![]()
सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे मायक्रो फायनांन्स कंपनीच्या कर्जाच्या हप्त्यासाठी तगाद्याला कंटाळून भुमीहीन शेतमजूर व बचतगटाच्या महिलांनी राहते घरच विक्रीला काढले आहे. गुरुवारी ता. २९ या गावकऱ्यांनी घरावर पोस्टर चिटकवले आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून पालकमंत्री केवळ टक्केवारी घेण्यासाठीच आहेत काय, असा आरोप क्रांतीकारी शेतकरी संघटनेने केला आहे. सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील शेतमजूर व महिला बचत गटांनी यापुर्वी बँकेकडून कर्ज घेतले होेते. या कर्जावर बचत गटाने लहान मोठे व्यवसाय सुरु करून कर्जाची परतफेड देखील केली आहे. त्यानंतर त्यांनी विदर्भातील मायक्रो फायनांन्सकडून कर्ज घेतले. सुमारे दिड वर्षापुर्वी कर्ज घेतले असून तीन वर्षात परतफेड आहे. या कर्जाचा हप्ता सुमारे ३५०० ते ४ हजार रुपये आहे. दरम्यान, यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम नाही तसेच शेतीचे उत्पादन नसल्याने ग्रामीण अर्थकारण पार बिघडून गेले आहे. गावातील लहान मोठे व्यवसाय देखील ठप्प पडले आहेत. त्यामुळे बचतगटाचे व्यवसाय अडचणीत सापडले असून त्याचा परिणाम कर्जाच्या हप्त्यावर झाला आहे. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे मायक्रो फायनांन्स कंपनीकडून हप्त्यासाठी तगादा लावला जात आहे. या प्रकारामुळे कंटाळलेल्या शेतमजूर व बचतगटातील महिलांनी राहते घरच विक्रीला काढले आहे. या संदर्भातील फलक देखील घरावर चिटकवले आहे. या संदर्भात शेतमजूर धम्मरत्न मोरे यांनी सांगितले की, विदर्भातील दोन मायक्रो फायनांन्स कंपनीकडून १७ हजार व ४० हजाराचे कर्ज घेतले. या दोन्ही कर्जाचा हप्ता सुमारे ३५०० व ४ हजार रुपये आहे. मागील महिन्याचा हप्ता थकल्यामुळे वसुली अधिकारी बुधवारी ता. २८ घरी येऊन बसले होते. वारंवार विनवणी केल्यानंतर ते परत केले. मात्र त्यांची भाषा योग्य नव्हती. या प्रकाराला कंटाळून घर विक्रीला काढले. फायनांन्सचे हप्ते फेडण्याचा प्रश्नः चंद्रभागाबाई मोरे, वाघजाळी विदर्भातील कंपनीकडून ८० हजाराचे कर्ज घेतले. मात्र आता दुष्काळामुळे आर्थिक अडचण असल्याचे सांगतल्यानंतरही त्यांचा वसुलीसाठी तगादा लावला आहे. त्यामुळे घर विक्रीसाठी काढले आहे. पालकमंत्री केवळ टक्केवारीसाठी आहेत कायः गजानन कावरखे, मराठवाडा अध्यक्ष क्रांतीकारी शेतकरी संघटना हिंगोली जिल्हयाचे पालकमंत्री नरहरी झिरवळ झेंडामंत्री म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना जिल्हयातील नागरीकांशी देणे घेणे नाही. पालकमंत्र्यांना केवळ जिल्हयातील विकासाच्या टक्केवारीतच रस असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मुख्यमंत्री कर्ज वसुली करू नका असे म्हणतात तर दुसरीकडे फायनांन्स कंपन्यांचा तगादा कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला खाली करावा आणि भूमिहीन शेतमजुरांना राहण्यासाठी जागा द्यावी.
Source link
हिंगोलीत मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा फास!:हप्ते फेडण्यासाठी भूमिहीन शेतमजुरांनी विक्रीला काढले राहते घर, पालकमंत्र्यांवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप