Headlines

ज्यांच्या पदरात भोपळा पडलाय, त्यांनी ज्ञान पाजळू नये:चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल, म्हणाल्या- तुमचा पळपुटेपणा उघडा पडलाय




विधान परिषदेच्या पाच जागांच्या निकालांवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळालेल्या अत्यल्प मतांवरून चित्रा वाघ यांनी राऊतांवर टीका केली. ज्यांच्या स्वतःच्या पदरात भोपळा पडलाय, त्यांनी आम्हाला ज्ञान पाजळू नये,” अशा शब्दांत त्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. ‘ईव्हीएम हॅकचे रडगाणे गाण्याची आमची सवय नाही’ चित्रा वाघ यांनी राऊतांना ‘सर्वज्ञानी’ म्हणत खोचक टोला लगावला. त्या म्हणाल्या, “सर्वज्ञानी संजय राऊत साहेब, आमच्या जागा किती आल्या याची चिंता तुम्ही करू नका. आम्ही आमचं आत्मपरीक्षण करू आणि पुन्हा जोमाने कामाला लागू. तुमच्यासारखं ईव्हीएम हॅक झालं म्हणून रोज सकाळी कॅमेरासमोर रडत बसण्याची आमची सवय नाहीये.” ‘बॅलेट पेपरवर तुमची खरी ताकद समोर आली’ पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदानाचा दाखला देत चित्रा वाघ यांनी राऊतांची कोंडी केली. “ही निवडणूक ईव्हीएमवर नाही तर बॅलेट पेपरवर झाली. तरीही तुमच्या उबाठा पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला अवघी ३,३०० मतं मिळाली. ज्या बॅलेट पेपरचा तुम्ही रोज सकाळी जप करता, त्याच बॅलेट पेपरवर जनतेने तुम्हाला शून्य दाखवून तुमची खरी ताकद समोर आणली आहे, असा प्रहार त्यांनी केला. ‘आता खापर कुणावर फोडणार, बॅलेटवर की मित्रपक्षांवर?’ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या यशाकडे लक्ष वेधत वाघ पुढे म्हणाल्या, “पाचपैकी तीन जागा आघाडीला मिळाल्या, पण तुमच्या पदरात फक्त भोपळा पडला. दुसरीकडे तुमच्या मित्रपक्षाचे उमेदवार १ लाख १३ हजाराहून अधिक मते घेऊन जिंकले. आता या पराभवाचं खापर तुम्ही कुणावर फोडणार? बॅलेट पेपरवर की मित्रपक्षांवर?” ‘मतपत्रिकेने दाखवलेला आरसा स्वीकारा’ संजय राऊत यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना चित्रा वाघ यांनी त्यांना आत्मचिंतनाचा सल्ला दिला. “ईव्हीएमवर निवडणूक झाली की रडायचं आणि बॅलेटवर झाली की पळ काढायचा, हा तुमचा पळपुटेपणा उघडा पडलाय राऊत साहेब. ईव्हीएमला दोष देऊन अपयश लपवणं सोपं आहे, पण कागदी मतपत्रिकेने दाखवलेला हा आरसा स्वीकारा आणि आधी स्वतःच्या पक्षाची उरलीसुरली मतं कुठं गायब झाली याचं आत्मचिंतन करा,” असा टोला त्यांनी लगावला. —————– हेही वाचा.. सतीश चव्हाणांचे 18 वर्षांचे साम्राज्य संपवण्यात माझा खारीचा वाटा: अब्दुल सत्तार म्हणाले- लपूनछपून नाही, उघडपणे पाडले; नवनाथ बन यांच्या टीकेलाही दिले सडेतोड प्रत्युत्तर
“मराठवाडा पदवीधर मतदारसंघात 18 वर्षे आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांनी कोणतेही काम केले नव्हते. त्यामुळे त्यांचे 18 वर्षांचे साम्राज्य संपवण्यात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या ऐतिहासिक विजयात माझा खारीचा वाटा आहे. मी लपूनछपून नव्हे, तर पहिल्या दिवसापासून उघडपणे सतीश चव्हाणांच्या विरोधात प्रचार केला. मतदान केंद्रांना भेटी देतानाही माझी हीच ठाम भूमिका होती आणि ती आजही बदललेली नाही,” असा मोठा राजकीय गौप्यस्फोट शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *