![]()
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघावर सलग १८ वर्षे वर्चस्व गाजवणाऱ्या चव्हाणांच्या पराभवानंतर आता महायुतीतच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी या पराभवाचे खापर थेट सतीश चव्हाणांच्या १८ वर्षांच्या अकार्यक्षमतेवर आणि त्यांच्या बोलण्यातील ‘आविर्भावा’वर फोडले आहे. ‘ना धड इकडचे केले, ना तिकडचे’ सतीश चव्हाणांच्या पराभवाचे कारण सांगताना आमदार प्रशांत बंब म्हणाले, “ते माझे मित्र असल्यामुळे मला हे बोलणे उचित वाटणार नाही, तरीही मी सांगतो. झाले असे की, ना धड ते इकडचे राहिले, ना त्यांनी तिकडचे केले. ते गंगापूर, खुलताबादमध्ये आले, चार-पाच वर्षे इकडे लक्ष दिले. पण इकडेही बरोबर काम केले नाही आणि तिकडेही बरोबर काम केले नाही.” ‘१८ वर्षांत अपेक्षित कामे केली नाहीत’ चव्हाणांच्या १८ वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळावर बोट ठेवत बंब पुढे म्हणाले, “१८ वर्षांचा कार्यकाळ हा काही कमी नसतो. आम्ही तर काम करतोच, परंतु लोकांची पण ऐकण्याची एक मर्यादा असते. १८ वर्षांमध्ये जी कामे खरोखर जनतेची करायला पाहिजे होती, ती न केल्यामुळे मला वाटते की त्यांचे नुकसान झाले असेल. पदवीधरांच्या ज्या अपेक्षा असतात, त्या पूर्ण न झाल्यामुळेच इतक्या वर्षांनंतर असे घडत असते.” ‘त्यांच्या बोलण्यातला आविर्भाव बरोबर नसतो’ सतीश चव्हाणांच्या वैयक्तिक वर्तनावरही बंब यांनी सूचक टिप्पणी केली. “जे आपण सगळे ऐकतो, त्यांच्या बोलण्यामध्ये थोडासा आविर्भाव बरोबर नसतो, ते देखील एक महत्त्वाचे कारण असू शकते. पण ते सोडून दिले तरी, त्यांनी अपेक्षित कामे न केल्यामुळेच त्यांचा पराभव झाला असावा. आता तो त्यांच्या आत्मचिंतनाचा विषय आहे,” असा टोला त्यांनी लगावला. ‘पराभवाला पक्ष जबाबदार नाही’ या पराभवाला नेमका कोणता पक्ष जबाबदार आहे, आणि भाजपवर दाखवल्या जाणाऱ्या बोटाबाबत विचारले असता बंब यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला. “पक्षाचा यात काय संबंध आला? पक्षाचा काहीही संबंध नाही. दोन्ही उमेदवारांनी कामे केली तरी एक जण पडणार आणि एक जण निवडून येणारच असतो. या वेळेला जनतेने प्रतापसिंह पाटील यांना पसंती दिली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. ————– हेही वाचा.. सतीश चव्हाणांचे 18 वर्षांचे साम्राज्य संपवण्यात माझा खारीचा वाटा: अब्दुल सत्तार म्हणाले- लपूनछपून नाही, उघडपणे पाडले; नवनाथ बन यांच्या टीकेलाही दिले सडेतोड प्रत्युत्तर
“मराठवाडा पदवीधर मतदारसंघात 18 वर्षे आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांनी कोणतेही काम केले नव्हते. त्यामुळे त्यांचे 18 वर्षांचे साम्राज्य संपवण्यात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या ऐतिहासिक विजयात माझा खारीचा वाटा आहे. मी लपूनछपून नव्हे, तर पहिल्या दिवसापासून उघडपणे सतीश चव्हाणांच्या विरोधात प्रचार केला. मतदान केंद्रांना भेटी देतानाही माझी हीच ठाम भूमिका होती आणि ती आजही बदललेली नाही,” असा मोठा राजकीय गौप्यस्फोट शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link
18 वर्षांत जनतेची कामे केली नाहीत म्हणून पराभव:सतीश चव्हाणांच्या पराभवावर भाजप आमदार प्रशांत बंब यांची प्रतिक्रिया