Headlines

Eknath Shinde Statement On Thane Murder Case; Warning To Opponents


“ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांची हत्या अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेची पहिल्याच दिवशी गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्तांना निःपक्षपाती चौकशीचे कडक आदेश दिले होते. पोलिसांनी तत्काळ आरोपींना बेड्या ठोकून शस्त्रे जप्त केली आहेत. मात्र, एका कुटुं

.

ठाणे आणि मुंबई परिसरातील विविध घडामोडींनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील पोलिसांचा तपास, मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा, विरोधी पक्षांचे आंदोलन, विधानपरिषद निवडणुकीतील भाजपचे आक्षेप आणि दुष्काळी मदत वाटपावर सविस्तर भूमिका मांडली.

पूर्णेकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सोबत

प्रदीप पूर्णेकर हत्याकांडावर आणि ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “घटना घडल्याच्या पहिल्याच दिवशी मी स्वतः पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला होता. कोणालाही पाठीशी न घालता जलद गतीने निष्पक्ष तपास करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी अधिकृत बुलेटिन जारी करून आरोपींची धरपकड आणि तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.”

बाहेरच्या लोकांकडून ठाणेकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न

“ठाण्याबाहेरून येऊन काही राजकीय मंडळी आंदोलने करत आहेत. परवा रात्री महामार्गावर जाळपोळ झाली, गाड्यांची तोडफोड केली, पोलिसांवर दगडफेक करून सोड्याच्या बाटल्या भिरकावल्या गेल्या, पोलीस कर्मचारी जखमी झाले. ठाणेकर शांतताप्रिय आहेत; त्यांना त्रास देण्याचे आणि पोलिसांवर दबाव आणण्याचे काम थांबले पाहिजे. या दुर्दैवी घटनेवर राजकीय पोळ्या भाजणाऱ्यांचा हेतू जनतेला चांगला ठाऊक आहे.”

मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

“महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मिनाक्षी शिंदे यांनी स्वतःहून माझ्याकडे राजीनामा पाठवला आहे. घटनेशी वारंवार आपले नाव जोडून पक्षाला नाहक त्रास दिला जात असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे.”

शेतकऱ्यांची जबरदस्तीने कर्जवसुली कराल तर थेट 302चा गुन्हा!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देताना उपमुख्यमंत्र्यांनी कठोर इशारा दिला. “दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांकडून कोणत्याही मायक्रो फायनान्स, खाजगी फायनान्स, बँका किंवा सावकारांनी सक्तीने वसुली करू नये. जर जबरदस्तीमुळे किंवा तगाद्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, तर संबंधित सावकार आणि संस्थाचालकांवर थेट खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल.”

5,000 रुपयांची मदत ही तातडीची; इतर 12 सवलती लागू

उपमुख्यमंत्री म्हणाले, “शासनाने जाहीर केलेली 5,000 रुपयांची प्राथमिक मदत ही अंतिम नसून दिवाळीच्या तोंडावर दिलेली तत्काळ मदत आहे. याशिवाय शाळांची फी माफी, वीज बिलात सूट, पाणी टँकर यासह दुष्काळातील सर्व 12 प्रमुख सवलती शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत. सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. धारावीतील गरजू आणि कष्टकरी नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी 24 ट्रक भरून फराळाचे वाटप करण्यात येत आहे.”

शिवसेनेने नेहमीच युतीधर्म पाळला; जर-तरच्या चर्चेला अर्थ नाही

विधानपरिषद निवडणुकीच्या निकालांवरून भाजप नेत्यांकडून होणाऱ्या आरोपांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. “विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेहमी युतीधर्माशी प्रामाणिक राहिली आहे. 4 जागांवर भाजप-शिवसेना महायुती म्हणून लढली. केवळ पुणे पदवीधर मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत आणि भाजप अशी मैत्रीपूर्ण (फ्रेंडली) लढत होती, ज्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी एकत्र बसून घेतला होता.”

‘जर आणि तर’ला राजकारणात स्थान नाही

“शिवसेनेने मदत केली असती तर निकाल वेगळा लागला असता, या भाजपच्या आरोपांवर बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राजकारणात ‘जर आणि तर’ला जागा नसते. शिवसेनेने नेहमी युतीधर्म पाळला असून मित्रपक्षानेही तो पाळावा, हीच आमची भूमिका आहे.”

उठता-बसता एकनाथ शिंदेच दिसतो; मोगलांना जसे संताजी-धनाजी दिसायचे

विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या वैयक्तिक टीकेचा समाचार घेताना एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक दाखला दिला. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोगलांचे सैन्य आणि घोडे पाणी पितानाही त्यांना पाण्यात संताजी आणि धनाजी दिसायचे. आज विरोधकांची अवस्था तशीच झाली आहे. झोपताना, उठताना त्यांना फक्त एकनाथ शिंदेच आठवतो. त्यांच्या या टीकेची मी अजिबात पर्वा करत नाही.”

जनता कामाची पावती देईल

“मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांत घेतलेले लोकोपयोगी निर्णय आणि आता महायुती सरकार म्हणून जनतेसाठी करत असलेले काम संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला जनता भीक घालणार नाही,” असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी व्यक्त केला.

—————————————————————

हेही वाचा…

आरोपांची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत पदावर राहणार नाही:पूर्णेकर हत्याकांडाच्या वाढत्या दबावानंतर मिनाक्षी शिंदेंचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा

ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, या प्रकरणात अत्यंत मोठी आणि नाट्यमय राजकीय घडामोड समोर आली आहे. पूर्णेकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा थेट आरोप असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) मातब्बर नेत्या आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी अखेर आपल्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा (महिला जिल्हा संघटक) राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला असून, “माझ्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत मी पदापासून दूर राहीन,” अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे समजते. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.