![]()
राज्यातील दुष्काळाच्या गंभीर संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना त्यांच्या मदतीसाठी सरकारसोबत शिवसेनाही ठामपणे उभी असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने 24 ट्रक दिवाळीचा शिधा धाराशिव जिल्ह्याकडे रवाना करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वाहनांना भगवा झेंडा दाखवून शिधा रवाना केला. दरम्यान, दुष्काळाचा फायदा घेत शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि सावकारांना त्यांनी पुन्हा एकदा कठोर कारवाईचा इशारा दिला. ‘जिथे संकट, तिथे शिवसेना आणि जिथे आपत्ती, तिथे मदत’ या भूमिकेतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मिळणाऱ्या सर्व सवलती आणि लाभ मिळतीलच; मात्र त्याचबरोबर 5 हजार रुपयांची तातडीची मदतही शासनाकडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 24 ट्रकच्या माध्यमातून घराघरांत पोहोचणार दिवाळीचा शिधा राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून विशेष मदत उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दसऱ्यापासूनच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या घरोघरी दिवाळीचा शिधा पोहोचविण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून २४ ट्रकच्या माध्यमातून शिधा धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात पाठविण्यात आला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरी जाऊन या साहित्याचे वाटप करणार आहेत. या शिध्यामध्ये बेसन, साखर, रवा, मैदा, तूप, रांगोळी, पणत्या तसेच शिवसेनेने प्रकाशित केलेल्या खास दिनदर्शिकेचा समावेश आहे. दुष्काळामुळे उत्पन्न घटल्याने आणि आर्थिक संकट ओढवल्याने अनेक शेतकरी कुटुंबांना सण साजरा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत या कुटुंबांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ‘शिवसेना घरात बसून काम करणारी संघटना नाही’ शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष मदतीसाठी त्यांच्या दारापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर भर दिला. “शिवसेना घरात बसून काम करणारी संघटना नाही; लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या दारात पोहोचून मदत करणारी शिवसेना आहे,” असे ते म्हणाले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या सवलती आणि मदत उपलब्ध करून दिली जाईल. मात्र, सरकारी मदतीसोबतच सामाजिक आणि संघटनात्मक पातळीवरही संकटग्रस्त कुटुंबांना आधार देण्याची गरज आहे. याच भावनेतून शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्नधान्यासोबत चारा आणि पाण्याचीही मदत दुष्काळामुळे ग्रामीण भागात अन्नधान्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबांना केवळ दिवाळीचा शिधा देऊन थांबणार नसून, दुष्काळग्रस्त भागातील गरजा लक्षात घेऊन मदतकार्य सुरू ठेवण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पाठविणे आणि आवश्यक ठिकाणी पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करणे, अशा उपाययोजनांवरही भर देण्यात येणार आहे. दुष्काळाचा परिणाम शेतीपुरता मर्यादित नसून त्याचा फटका संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसत आहे. त्यामुळे संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना विविध स्तरांवर मदतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. दुष्काळामुळे काही कुटुंबांतील मुलींच्या लग्नांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अशा अडचणीत सापडलेल्या कुटुंबांनाही मदतीचा हात देण्याचे काम शिवसेनेकडून करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर आलेले संकट कमी करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे येऊन मदतीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कठोर कारवाई दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना काही बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि सावकारांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधितांना स्पष्ट इशारा दिला. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणे सहन केले जाणार नाही, असे त्यांनी बजावले. “शेतकरी संकटात असताना त्याला नाडता कामा नये. कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका. असा त्रास होत असेल, तर सरकार, प्रशासन किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सांगा. संबंधितांवर कायदेशीर आणि कठोर कारवाई केली जाईल,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. दुष्काळामुळे शेतीचे उत्पन्न घटलेले असताना कर्जाचे हप्ते भरणे अनेक शेतकऱ्यांसाठी कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांवर दबाव आणला जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन आणि प्रशासनाने आवश्यक ती भूमिका घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी अडचणींच्या वेळी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘शेतकऱ्यांनी धीर सोडू नये’ दुष्काळाचे संकट मोठे असले, तरी शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत धीर सोडू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. “शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत धीर सोडू नये. हे संकट मोठे आहे. त्यामुळे लाखो हात मदतीसाठी पुढे आले पाहिजेत. शेतकरी आपला बांधव आहे; त्याला या संकटातून बाहेर काढणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या मदतीसोबतच सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. धाराशिवसह राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक गरजू शेतकरी कुटुंबापर्यंत मदत पोहोचवून त्यांची दिवाळी गोड करण्याचा शिवसेनेचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकर, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, नगरसेवक राकेश शिंदे, युवासेनेचे मराठवाडा समन्वयक बाजीराव चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेही वाचा…. शिंदे-ठाकरे गट आमनेसामने, टेंभी नाक्यावर शक्तिप्रदर्शन:आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी घेतली पूर्णेकर कुटुंबीयांची भेट; ठाण्यातील राजकीय वातावरण तापले प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. टेंभी नाका येथे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत असून, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर ते पत्रकार परिषदेत कोणती भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा….
Source link
भीषण दुष्काळात शेतकऱ्यांना सरकारसोबत शिवसेनेचा दुहेरी आधार:24 ट्रक दिवाळीचा शिधा धाराशिवकडे रवाना