Headlines

उजनीच्या प्रकल्पांसाठी नऊ टीएमसी पाणी लागणार:रोहित पवारांचा आरोप; साडेपाच लाख शेतकरी आणि 30 हजार मच्छीमार कुटुंबांच्या अर्थकारणावर परिणामाची भीती




उजनी येथे प्रस्तावित एआय डेटा सेंटर आणि अणुऊर्जा प्रकल्पांसाठी नऊ टीएमसी पाणी लागणार आहे. त्यामुळे साडेपाच लाख शेतकरी आणि ३० हजार मच्छीमार कुटुंबांच्या अर्थकारणावर परिणाम होऊ शकतो, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. या प्रकल्पांमुळे पर्यावरणाचे नुकसान होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. पवार यांनी, “उजनीतील एआय डेटा सेंटर हा विकास की विनाश?” असा सवाल केला. उजनी धरण दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभे राहिले. धरणामुळे हजारो एकर जमीन सिंचनाखाली आली आणि शेतीला बळ मिळाले, असे ते म्हणाले. उजनीच्या पाण्यावर शेती, मासेमारी आणि अनेक कुटुंबांचे अर्थकारण अवलंबून आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी वापरणारे प्रकल्प उभारल्यास स्थानिक नागरिकांच्या गरजांसाठी पाणी कमी पडू शकते, अशी शक्यता पवार यांनी मांडली. सरकारने उजनी परिसरात दोन हजार मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प आणि ४५० मेगावॉट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पांसह डेटा सेंटरमध्ये सुमारे एक लाख ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे. चीनमधील सॅनी कंपनीकडून तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. फ्रान्स आणि दक्षिण कोरियातील कंपन्यांचाही यात सहभाग असल्याचा दावा पवार यांनी केला. डेटा सेंटरमधील सर्व्हर थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी आणि वीज लागते. प्रस्तावित डेटा सेंटरसाठी सहा टीएमसी, तर अणुऊर्जा प्रकल्पासाठी तीन टीएमसी पाणी लागेल, असा दावा पवार यांनी केला. ठाणे शहराला वर्षभरात सुमारे ८.२५ टीएमसी पाणी लागते. त्या तुलनेत या दोन प्रकल्पांसाठी नऊ टीएमसी पाणी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. उजनी धरणावर अवलंबून असलेल्या साडेपाच लाख शेतकऱ्यांची सुमारे दहा हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल आहे. या प्रकल्पांमुळे त्यावर परिणाम होण्याची शक्यता पवार यांनी व्यक्त केली. राज्याच्या एकूण वीज वापरापैकी आठ टक्के वीज केवळ डेटा सेंटरसाठी लागेल, असाही त्यांचा दावा आहे. उजनी जलाशयातील मासेमारीवर सुमारे ३० हजार कुटुंबे अवलंबून आहेत. या व्यवसायातून सुमारे २०० कोटी रुपयांची उलाढाल होते. पाण्यावर सौरऊर्जा पॅनेल बसवल्याने माशांच्या अधिवासावर आणि जलचरांवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली. मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथील तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाचा दाखला देत त्यांनी हा मुद्दा मांडला. डेटा सेंटरमधील सतत सुरू असणाऱ्या शीतकरण यंत्रणांचा आवाज, वाढती वीज मागणी आणि पाण्याचा वापर यांचाही परिसरातील पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *