Headlines

गोकुळच्या अध्यक्षपदावरून मोठा ट्विस्ट:निवडणूक अधिकाऱ्यांचा विरोध झुगारून शशिकांत चुयेकरांची निवड, 13 संचालकांच्या बहुमताचा दावा




गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोल्हापुरात राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठा पेच निर्माण झाला आहे. महायुतीचे संचालक उपस्थित नसताना समविचारी आघाडीच्या 13 संचालकांनी समांतर सभा घेत शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याचा दावा केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गणपूर्तीचे कारण देत निवड प्रक्रियेला असमर्थता दर्शवल्यानंतरही समविचारी आघाडीच्या संचालकांनी बहुमताच्या जोरावर ही प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदावरून नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, आजपासून गोकुळचा अध्यक्ष मीच आहे आणि कामकाज सुरू करणार असल्याची घोषणा स्वतः शशिकांत पाटील चुयेकर यांनी केली. या घडामोडींमुळे आता महायुतीचे संचालक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 13 संचालकांच्या बहुमतावर अध्यक्षपदाची निवड केल्याचा दावा गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड 29 ऑक्टोबर रोजी होणार होती. या निवड प्रक्रियेसाठी समविचारी आघाडीचे 13 संचालक उपस्थित होते. आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याने शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी, अशी विनंती निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मात्र, गणपूर्तीचे कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेला असमर्थता दर्शवल्याचे समविचारी आघाडीच्या संचालकांनी सांगितले. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाला विरोध करत समविचारी आघाडीच्या संचालकांनी त्याच ठिकाणी समांतर सभा घेतली. या सभेत 13 संचालकांच्या बहुमताच्या आधारावर शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. या निर्णयामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून संघर्ष निर्माण झाला असून, या निवडीची कायदेशीर वैधता आणि त्यानंतरची प्रशासकीय प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. ‘गोकुळचा अध्यक्ष मीच’; शशिकांत चुयेकर यांची घोषणा अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा केल्यानंतर शशिकांत पाटील चुयेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “गोकुळ दूध संघाची निवडणूक झाल्यानंतर कायदेशीररीत्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी लागते. त्याप्रमाणे आज 29 तारखेला निवड होणार होती. आज निवडणूक अधिकाऱ्यांनी ही निवड प्रक्रिया घेतली. आम्ही त्यांना सांगितले की, आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. आम्ही त्यांना विनंती केली; मात्र त्यांनी ती मान्य केली नाही. त्यामुळे आम्ही त्याचवेळी त्यांच्या निर्णयाला विरोध करत निवड प्रक्रियेची सभा घेतली. या सभेत 13 संचालकांमध्ये माझी निवड झाली आहे. त्यामुळे गोकुळचा अध्यक्ष आता मी झालो आहे.” पुढे बोलताना चुयेकर म्हणाले की, समांतर सभा घेऊन अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. आपण कायदेशीररीत्या अध्यक्ष झालो असून, कामकाज सुरू करणार आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. गोकुळ दूध संघात सध्या दूध कमी आलेले आहे. त्यामुळे दूध संकलन वाढवण्यासाठी आपण प्रथम प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक अधिकाऱ्यांनी गणपूर्तीचे कारण दिले; अभिजीत तायशेटे यांची माहिती समविचारी आघाडीचे संचालक अभिजीत तायशेटे यांनीही अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे 13 निवडून आलेले संचालक अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित होते. बैठकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्यांना स्पष्ट बहुमताचा मुद्दा सांगण्यात आला आणि शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्याची विनंती करण्यात आली. मात्र, गणपूर्तीचे कारण दाखवत निवडणूक अधिकाऱ्यांनी निवड प्रक्रिया पुढे नेण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर उपस्थित संचालकांनी त्याच ठिकाणी बैठक घेऊन बहुमताच्या आधारावर शशिकांत पाटील चुयेकर यांची चेअरमनपदी निवड केल्याचे तायशेटे यांनी सांगितले. ‘संपूर्ण जिल्हा आणि राज्याची इच्छा पूर्ण केली’ शशिकांत पाटील चुयेकर यांच्या निवडीमागील भूमिका स्पष्ट करताना अभिजीत तायशेटे यांनी दिवंगत आनंदाराव पाटील चुयेकर यांच्या योगदानाचा उल्लेख केला. ज्यांनी गोकुळ दूध संघ उभा केला आणि त्याचा विस्तार केला, त्या आनंदाराव पाटील चुयेकर यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या मुलाला अध्यक्ष करण्याची संपूर्ण जिल्ह्याची आणि राज्याची इच्छा होती, असा दावा त्यांनी केला. तायशेटे म्हणाले की, ही इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीच्या सर्व 13 संचालकांनी अध्यक्षपदाची निवड केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत बहुमताच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजपासून शशिकांत पाटील चुयेकर अध्यक्ष म्हणून काम पाहतील, अशी भूमिका समविचारी आघाडीच्या संचालकांनी मांडली आहे. सुप्रिया सुळे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेल्या वादावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नेते सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विजय मिळवला. हा पराभव सत्ताधाऱ्यांच्या इतका जिव्हारी लागला आहे की, तांत्रिक बाबींचा आधार घेऊन अध्यक्ष निवडीची बैठकच होऊ न दिल्याचा प्रकार समोर आला आहे, असा आरोप त्यांनी केला. हा प्रकार संतापजनक असून लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारा आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी या घडामोडींचा निषेध केला. गोकुळच्या सभासदांनी आपला कौल स्पष्टपणे दिला आहे. त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना संस्थेचा कारभार करू देणे आणि सभासदांच्या जनादेशाचा आदर राखणे अपेक्षित आहे, असे त्यांनी म्हटले. संस्थेच्या कारभारात वारंवार हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न करणे म्हणजे सभासदांच्या विश्वासाचा आणि त्यांनी दिलेल्या कौलाचा अपमान असल्याची भूमिकाही सुप्रिया सुळे यांनी मांडली. या संपूर्ण प्रक्रियेत आपण सतेज पाटील आणि गोकुळच्या सभासदांसोबत खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळच्या अध्यक्षपदाचा वाद आणखी वाढण्याची शक्यता सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना हस्तक्षेपाचे प्रयत्न थांबवून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरळीत पार पडू द्यावी, असे आवाहन केले आहे. गोकुळच्या सभासदांचा आणि सहकारी चळवळीच्या तत्त्वांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, समविचारी आघाडीच्या 13 संचालकांनी बहुमताच्या जोरावर शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याचा दावा केला असला, तरी या निवडीबाबत महायुतीच्या संचालकांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी गणपूर्तीचे कारण देत प्रक्रिया पुढे नेण्यास असमर्थता दर्शवल्याने या निवडीच्या वैधतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे गोकुळ दूध संघाचा कारभार पुढे कसा चालणार, महायुतीचे संचालक या निर्णयाला काय उत्तर देणार आणि अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेला हा पेच कसा सुटणार, याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. ‘नवनाथ बन यांना निवडणुकीची पार्श्वभूमी माहिती नसावी’:उदय सामंतांचा टोला, ‘एकनाथ शिंदेंना सल्ला देण्याइतके ते मोठे आहेत का?’ महायुतीतील मित्रपक्षांमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना, शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी या वादावर भूमिका स्पष्ट केली आहे. नवनाथ बन यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना सामंत यांनी, नवनाथ बन यांना या निवडणुकांची संपूर्ण पार्श्वभूमी माहिती नसावी, असे म्हटले. तसेच, “नवनाथ बन यांनी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत त्यांची भूमिका मांडावी; मात्र एकनाथ शिंदे साहेबांना सल्ला देऊ नये. ते त्यांना सल्ला देण्याइतके मोठे आहेत का?” असा सवालही त्यांनी केला. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये कोणताही गैरसमज नसल्याचे सांगत, निवडणुकीदरम्यान शिवसेनेने महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही सामंत यांनी केला. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *