Headlines

शिवसेना ठाकरे गटाच्या विभागप्रमुखावर काळाचा घाला:जळगावात विजेच्या धक्क्याने मृत्यू; रुग्णालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी




जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात एका घरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून योगेश उर्फ भैय्या वाघ या खासगी वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. मृत योगेश वाघ हे शिवसेना ठाकरे गटाचे पिंप्राळा भागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेलेल्या योगेश यांच्या अपघाती मृत्यूची बातमी दुपारी समजताच त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच नातेवाईक आणि शिवसैनिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. ठाकरे गटाचे माजी महानगर अध्यक्ष गजानन मालपुरे यांनीही या दुर्दैवी घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची ही दुसरी मोठी घटना आहे. कालच भुसावळ येथे एका शेतकरी दाम्पत्याचाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. घरात मुलीच्या साखरपुड्याची आनंदाची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांवर काळाने घाला घातला. भुसावळच्या या घटनेची हळहळ ताजी असतानाच, आज शिवसेना विभागप्रमुख योगेश वाघ यांचाही अशाच प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. तरसोद बायपासवर भीषण अपघात जळगाव शहरालगत असलेल्या पाळधी-तरसोद बायपासवर अपघातांचे सत्र सुरूच असून, एका भीषण अपघातात योगेश गजमल राक्षे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. योगेश हे आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरीचे काम आटोपून दुचाकीने घरी परतत होते. त्यावेळी पाळधी रेल्वे पुलावर समोरून भरधाव येणाऱ्या आयशर मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या योगेश यांना तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे, अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच योगेश यांचा विवाह झाला होता. त्यांच्या या अकाली जाण्याने नवविवाहित पत्नीसह संपूर्ण राक्षे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या बायपासवरील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. 30 जुलै रोजी आसोदा पुलाचा भराव धसल्यामुळे बायपासवरील वाहतूक बंद करून अवजड वाहने शहरातून वळवण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, जुलै महिन्यापासून आतापर्यंत या मार्गावर झालेल्या तब्बल 25 अपघातांमध्ये 13 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बायपासच्या या दुर्दशेमुळे आणि वाढत्या मृत्यूंच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता आणि संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या ताज्या अपघात प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत धडक देणाऱ्या आयशर वाहनाचा चालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल याला ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *