![]()
“पुणे आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात जनतेने आणि सुशिक्षित पदवीधरांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा दृढ विश्वास दाखवून दिला आहे. सत्ता आणि अफाट पैशाचा गैरवापर होऊनही मतदारांनी परिवर्तनाला कौल दिला आहे. जर महाविकास आघाडीने निवडणुकीच्या 2 महिने आधीच समन्वय साधून, कोणत्याही पक्षाची प्रतिष्ठा न करता संयुक्त उमेदवार दिले असते, तर विधानपरिषदेच्या 5 ही जागांवर महाविकास आघाडीने 5-0 अशी ऐतिहासिक मुसंडी मारली असती. महाविकास आघाडीतील मतांच्या विभाजनाचाच थेट फायदा सत्ताधारी महायुतीला झाला आहे,” असे अत्यंत रोखठोक आणि आत्मपरीक्षणात्मक मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणुकांचे कल, समन्वयातील त्रुटी, कराळे मास्तरांची बंडखोरी, ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील धमक्या आणि शरद पवार यांच्या आगामी दुष्काळी दौऱ्याबाबत पक्षाची भूमिका मांडली. पुणे आणि मराठवाड्यात ‘गोकुळ पॅटर्न’ यशस्वी पदवीधर मतदारसंघांच्या निकालावर भाष्य करताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. गोकुळ दूध संघाप्रमाणेच जनतेने इथेही सत्ताधाऱ्यांना नाकारून बदल घडवला आहे. सुशिक्षित आणि विश्वासू चेहरे दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून पक्षाच्या भावी वाटचालीसाठी हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरेल.” हर्षदा जाधव अवघ्या 750 मतांमुळे दुसऱ्या फेरीत “पुणे पदवीधरमध्ये पहिल्या फेरीत हर्षदा जाधव अवघ्या 750 मतांमुळे कोटा पूर्ण करण्यापासून राहिल्या, त्यामुळे मोजणी दुसऱ्या फेरीत गेली असली तरी दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचा विजय 100% निश्चित आहे.” नागपुरात कराळेंना समजावण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयातील त्रुटींवर बोट ठेवताना त्यांनी कबुली दिली. “निवडणूक जाहीर होण्याच्या 1 ते 2 महिने अगोदर सर्व मित्रपक्षांनी एकत्र बसून निर्णय घेणे गरजेचे होते. मात्र, आपण अगदी शेवटच्या क्षणी जागावाटप करायला गेलो. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाने वेगळा उमेदवार दिला, तर नागपूरमध्ये नितेश कराळे यांनी बंडखोरी केली. कराळे मास्तरांशी मी स्वतः, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख यांनी चर्चा केली होती, परंतु त्यांनी ऐकले नाही. शेवटी आघाडीचा धर्म पाळण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी लागली.” पुण्यात विरोधकांची मते एकत्र केली तर सत्ताधाऱ्यांपेक्षा दुप्पट “पुणे शिक्षक मतदारसंघात दत्तात्रय सावंत, सचिन सानप आणि जयंत आसगावकर यांच्या मतांची एकत्रित बेरीज केली, तर ती विजयी उमेदवारापेक्षा दुप्पट भरते. अमरावती आणि नागपूरमध्येही हेच चित्र दिसले. जर आपण एकत्र लढलो असतो, तर निकाल 5-0 असा लागला असता.” प्रशासनाचा नंगानाच; पेन, वही अन् फॉर्म घेऊन जाण्यासही मज्जाव! मतमोजणीच्या दिवशी प्रशासनाच्या भूमिकेवर त्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले. “मतमोजणी केंद्रांवर उमेदवारांच्या प्रतिनिधींना साधे पेन, वही, डायरी किंवा काउंटिंग फॉर्म घेऊन जाण्यासही प्रशासनाने मज्जाव केला होता. प्रशासनाचा प्रचंड गैरवापर आणि पैशांचा वारेमाप वापर या निवडणुकीत उघडपणे झाला आहे.” ठाण्यात ‘बाहेर पडू देणार नाही’ अशी धमकी देणे अयोग्य ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर त्यांनी सडेतोड भूमिका मांडली. “प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्के यांनी कोणाला धमक्या देऊ नयेत. एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष मारला जातो, तेव्हा न्याय मागण्यासाठी ते रस्त्यावर उतरतात. ‘ठाण्यातून बाहेर पडू देणार नाही’ अशी धमकी देण्यापेक्षा तुमचे सरकार आणि पोलीस यंत्रणा आहे, त्यांनी निष्पक्ष तपास करून आरोपींना शिक्षा करावी.” एकनाथ शिंदेंना नक्की कोण टार्गेट करतंय? “एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले जात असल्याचा दावा जर सत्ताधारीच करत असतील, तर त्यांना कोण टार्गेट करत आहे, हे त्यांनीच जाहीर करावे; विरोधक त्यांना टार्गेट करत नाहीत. शिंदे साहेब पूर्णेकर कुटुंबाला का भेटत नाहीत, हा त्यांचा प्रश्न आहे.” शरद पवार लवकरच दुष्काळी दौऱ्यावर “राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत भीषण असून आदरणीय शरद पवार स्वतः लवकरच दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांशी आणि सामान्य जनतेशी ते थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतील,” अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी शेवटी दिली. ———————————————————- हेही वाचा… मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 13 हजार मतांनी आघाडीवर: पुणे शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीतून काँग्रेसचे जयंत आसंगावकर बाद महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या मतमोजणीचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आले नसले, तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. सविस्तर वाचा
Source link
एकत्रित लढलो असतो तर 5-0 असा विजय झाला असता!:समन्वयाला उशीर झाल्याचा फटका; शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया; पुणे अन् मराठवाड्यात बदल झाल्याचा दावा