![]()
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोटात प्रचंड मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी समाजमाध्यमांवर थेट पोस्ट करत आपल्याच पक्ष नेतृत्वाला उघडपणे घरचा आहेर दिला आहे. “आजचे विधान परिषदेचे निकाल हा पक्षासाठी एक अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहेत. जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करायचा असेल आणि संघटनेत सुधारणा घडवून आणायची असेल, तर तातडीने कठोर आत्मपरीक्षण करावेच लागेल,” अशा स्पष्ट शब्दांत प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला आहे. विधान परिषद निवडणुकीतील अपेक्षेपेक्षा निराशाजनक कामगिरी आणि पक्षांतर्गत वाढती अस्वस्थता या पार्श्वभूमीवर प्रफुल पटेल यांच्या या भूमिकेने महायुतीसह राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. हक्काची पुणे पदवीधर जागा का सोडली? विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपापासूनच पक्षात अंतर्गत धुसफुस सुरू होती. निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना अजिबात विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोप सुरुवातीपासून केला जात होता. पुणे पदवीधर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला आणि हक्काची जागा मानली जात असतानाही, महायुतीच्या जागावाटपात ती जागा सहज सोडून देण्यात आली. या निर्णयावर प्रफुल पटेल यांनी यापूर्वीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता लागलेल्या निकालांनी पटेल यांची ही भीती खरी ठरल्याचे मानले जात आहे. पार्थ पवारांच्या मर्जीतील नियुक्त्यांवरून पक्षात अंतर्गत धुसफुस प्रफुल पटेल यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमागे पक्षातील नियुक्त्यांचा वादही कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत आणि विविध महत्त्वाच्या पदांवर ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा न करता पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयांची वर्णी लावली जात असल्याची चर्चा पक्षात रंगत होती. निवडणुकीच्या पराभवानंतर पटेल यांनी थेट राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या निर्णयक्षमतेवर जाहीरपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे पक्षात दोन उभे गट पडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रफुल पटेलांची ती पोस्ट ठरली चर्चेचा केंद्रबिंदू प्रफुल पटेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेमके काय म्हटले आहे… आजचे विधान परिषदेचे निकाल हा एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहेत. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी, पक्षाचे प्राधान्यक्रम नव्याने ठरवण्यासाठी आणि संघटनेत सुधारणा करण्यासाठी तातडीने आणि कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल? विधानपरिषदेच्या 5 जागांच्या निकालानंतर महायुतीमधील घटक पक्षांमध्ये ताळेबंद मांडणे सुरू झाले आहे. त्यातच प्रफुल पटेल यांच्यासारख्या संस्थापक आणि वरिष्ठ नेत्याने उघड बंडसदृश भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीत आगामी काळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षात एकतर्फी निर्णय घेणाऱ्या तरुण फळीवर अंकुश लावण्यासाठी ज्येष्ठ नेते आता आक्रमक झाले असून, यावर पक्षप्रमुख सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ———————————————— हेही वाचा… मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 13 हजार मतांनी आघाडीवर: पुणे शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीतून काँग्रेसचे जयंत आसंगावकर बाद महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या मतमोजणीचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आले नसले, तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. सविस्तर वाचा
Source link
हक्काची जागा सोडली, वरिष्ठांना विश्वासात न घेता निर्णय:लोकांचा विश्वास मिळवायचा असेल तर कठोर आत्मपरीक्षण करा; विधान परिषद निकालांवरून प्रफुल पटेलांचा घरचा आहेर