![]()
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचा पाठिंबा नसताना अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेल्या नितेश कराळे उर्फ ‘कराळे मास्तर’ यांनी तब्बल 25,000 वैध मते खेचून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रस्थापित आघाड्यांच्या नाकात चांगलाच दम आणला आहे. “कोणतेही होर्डिंग-बॅनर न लावता, मतदारांना न दारू पाजता, न मटण चारता आणि कोणालाही एक रुपया न देता सुशिक्षित पदवीधरांनी माझ्या पारड्यात तब्बल 25,000 मतांचे दान टाकले आहे. मला पक्षाने उमेदवारी दिली असती, तर काल संध्याकाळी 5 वाजताच विजयाचा डीजे वाजवून मी घरी आलो असतो. आता दोन्ही उमेदवारांचे भवितव्य माझ्याच दुसऱ्या पसंतीच्या मतांवर ठरणार आहे,” अशा अत्यंत झणझणीत आणि गावरान शैलीत कराळे मास्तरांनी काँग्रेससह महाविकास आघाडीला आरसा दाखवला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या पसंतीक्रमात महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यावर सुमारे 4,000 मतांची आघाडी घेतली आहे. मात्र, विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पहिल्या पसंतीत पूर्ण न झाल्याने आता कराळे मास्तरांच्या २५,००० मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीक्रमाची मतेच या निवडणुकीचा निकाल ठरवणार आहेत. 8,000 मते इनव्हॅलिड, तरीही 25,000चा आकडा पार आपल्या मतदानाच्या आकडेवारीचे विश्लेषण करताना कराळे मास्तर म्हणाले, “बॅलेट पेपरवर माझे नाव एकदम मध्यभागी होते. सुशिक्षित मतदारांनी ते नाव शोधून काढून माझ्या नावासमोर 1 नंबर लिहिला. मला 25,000 पहिल्या पसंतीची पूर्णपणे वैध मते मिळाली आहेत.” 8,000 मतपत्रिका बाद “अनेक मतदारांनी माझ्या नावासमोरील क्रमांकावर 21 लिहिले, काहींनी बरोबरची खूण केली, तर काहींनी गोल केले. यामुळे माझी सुमारे 8,000 हून अधिक मते इनव्हॅलिड (अवैध) झाली. ही बाद झालेली आणि दुसऱ्या पसंतीची मते धरली, तर मला मानणाऱ्या मतदारांचा आकडा 34,000 ते 35,000 पर्यंत पोहोचतो.” हलक्यात घेणाऱ्यांना चपराक “मागच्या वेळेस मला 8,500 मते मिळाली होती, त्यामुळे ‘यावेळेस 5,000 तरी मिळतील का’ म्हणून मला हिणवणाऱ्या प्रस्थापितांच्या थोबाडीत मतदारांनी हा सणसणीत चपराक लगावला आहे. कराळे मास्तर केवळ भाषणांपुरता मर्यादित नसून रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या हक्कांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे, हे पदवीधरांनी सिद्ध केले.” माझ्या 25,000 मतपत्रिकांवरच फैसला; कोहळे-वंजारींमध्ये काँटे की टक्कर निवडणुकीतील विजयाच्या समीकरणांवर प्रकाश टाकताना त्यांनी दोन्ही पक्षांना घाम फुटल्याचे स्पष्ट केले. “सध्या भाजपचे सुधाकर कोहळे हे अभिजित वंजारी यांच्यापेक्षा सुमारे 4,000 मतांनी पुढे आहेत. हा 4,000चा गड्डा भरून काढण्यासाठी वंजारींना माझ्या बॅलेट पेपरवरील दुसऱ्या पसंतीच्या मतांची नितांत गरज आहे. मात्र, माझ्या बॅलेट पेपरवर सर्वच्या सर्व मते वंजारींचीच निघतील असे अजिबात नाही. 25,000 पैकी साधारण 5,000 ते 6,000 मते वंजारींची असतील, तर किमान 1,500 ते 2,000 मते कोहळेंचीही निघतील.” 500 ते 1,000 मतांच्या फरकानेच जय-पराजयाचा फैसला “ही निवडणूक पूर्णपणे रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. ही जागा जो कोणी जिंकेल किंवा पडेल, तो अवघ्या ५०० ते १,००० किंवा फार तर १,५०० मतांच्या फरकाने ठरेल. निकाल कोणाच्याही बाजूने झुकू शकतो.” डोळे पुसत रात्र काढली; पक्षांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणाऱ्याला डावलले! काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर थेट ताशेरे ओढताना कराळे मास्तरांनी संताप व्यक्त केला. “ज्यांनी केवळ खाजगी शिक्षणसंस्थांचे इमले उभे केले, विद्यार्थ्यांचा किंवा तरुणांचा एकही ज्वलंत प्रश्न कधी विधानपरिषदेत मांडला नाही, अशा लोकांना राजकीय पक्ष तिकीट देतात, याची पक्षांना जरा तरी लाज वाटली पाहिजे. ज्या माणसाने पक्षासाठी सातत्याने काम केले, त्या कार्यकर्त्याला मात्र डावलले गेले.” नेत्यांना नाकीनऊ आणले “माझ्या उमेदवारीमुळे दोन्ही बाजूंच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नाकीनऊ आले आहेत. एकाही पक्षाच्या कार्यकर्त्याला मतमोजणी केंद्रावरून डोळे मिटता आले नाहीत; नेत्यांनी डोळे पुसत आणि बैठका घेत रात्र जागून काढली आहे. मी प्रस्थापितांच्या नाका-तोंडात पाणी घालून आणि त्यांना घाम फोडून शांतपणे घरी आलो आहे,” असा घणाघात त्यांनी केला. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत कराळे मास्तरांची मते कोणाच्या पारड्यात झुकतात आणि विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. ——————————————————————- हेही वाचा… मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 13 हजार मतांनी आघाडीवर: पुणे शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीतून काँग्रेसचे जयंत आसंगावकर बाद महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या मतमोजणीचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आले नसले, तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. सविस्तर वाचा
Source link
ना दारू पाजली, ना मटण चारलं; 25,000 पदवीधरांनी ताकद दाखवली!:तिकीट दिलं असतं तर डीजे लावून घरी आलो असतो; कराळे मास्तरांचा काँग्रेसला सणसणीत टोला