![]()
“महाराष्ट्रात दर ३ ते ४ वर्षांनी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते, मात्र यंदा पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत भीषण आणि गंभीर आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पंचनामे करून दुष्काळ घोषित केला जायचा; परंतु या महायुती सरकारने डिसेंबरची वाट न पाहता स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सप्टेंबर महिन्यातच दुष्काळ जाहीर केला. केंद्राची मदत येण्यापूर्वीच दिवाळीसाठी शेतकऱ्यांच्या हातात ५,००० रुपयांची प्राथमिक अग्रीम मदत दिली जात आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दुष्काळी शेतकऱ्याला केवळ २,५०० रुपये दिले जातात, तिथे विरोधक तोंड उघडत नाहीत आणि महाराष्ट्रात मात्र राजकारण करत आहेत,” असा सवाल भाजपचे नेते तथा आमदार गोपिचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे. नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार गोपिचंद पडळकर यांनी राज्यातील दुष्काळी उपाययोजना, ३०५ तालुक्यांतील सवलती, कायमस्वरूपी पाणी योजना, विधानपरिषद निवडणुकीचे कल आणि धनगर आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत सविस्तर माहिती दिली. ३०५ तालुके दुष्काळी जाहीर, १२ विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना पडळकर म्हणाले, दरवर्षी प्रशासन डिसेंबरपर्यंत पंचनामे करत बसते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि सप्टेंबरमध्येच ऐतिहासिक निर्णय घेत दुष्काळ जाहीर केला. २६५ वरून ३०५ तालुक्यांपर्यंत विस्तार पहिल्या टप्प्यात २६५ तालुके दुष्काळी म्हणून घोषित केले होते. त्यानंतर मागणी वाढल्याने मंत्रिमंडळ बैठकीत आणखी ४० तालुक्यांचा समावेश करण्यात आला. सध्या राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ लागू करण्यात आला आहे. १२ कल्याणकारी योजनांचा लाभ या ३०५ तालुक्यांमधील शेतकऱ्यांना महसूल करात सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीमध्ये सवलत, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, कर्जाचे पुनर्गठन आणि बँकांच्या कर्जवसुलीच्या तगाद्याला तात्काळ स्थगिती अशा १२ विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून दिला जात आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याबाबतही शासन ठोस पावले उचलत आहे. कर्नाटकात अडीच हजार अन् महाराष्ट्रात पाच हजार काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या टीकेचा समाचार घेताना त्यांनी सीमाभागाचा दाखला दिला. “माझ्या मतदारसंघाचा जवळपास ७० टक्के भाग कर्नाटकच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे तिथली माहिती मला रोज मिळते. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असून त्यांनी दुष्काळी शेतकऱ्यांना केवळ २,५०० रुपयांची मदत दिली आहे, तोही त्यांचा पहिला टप्पा आहे. महाराष्ट्रात ५,००० रुपये अग्रीम दिले जात असताना विरोधक इथे मात्र शिमगा करत आहेत. विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनासोबत उभे राहिले पाहिजे.” दुष्काळ कायमचा घालवण्यासाठी २ हजार कोटींची कामे सुरू शाश्वत जलसंधारण आणि कायमस्वरूपी दुष्काळ निवारणासाठी सुरू असलेल्या विकासकामांवर त्यांनी प्रकाश टाकला. दुष्काळ कायमचा नष्ट व्हावा यासाठी माझ्या मतदारसंघात २,००० कोटी रुपयांची कामे वेगाने सुरू आहेत. तसेच सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील गावांना वरदान ठरणाऱ्या टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी तब्बल ७,००० कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. मराठवाडा वॉटर ग्रीड व नदीजोड महाविकास आघाडीच्या काळात बंद पाडलेली ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवणे आणि नदीजोड प्रकल्पांची कामे हाती घेऊन राज्याला दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन सुरू आहे. विधान परिषद निकालांचे आत्मपरीक्षण करू विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतमोजणीवर आणि निकालांवर बोलताना ते म्हणाले, पदवीधर व शिक्षक निवडणुकांमध्ये ज्या उमेदवारांचा विजय झाला आहे, त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. अंतिम निकालानंतर जर कुठे आम्ही कमी पडलो असू, तर त्याचे नक्कीच गांभीर्याने आत्मपरीक्षण करू. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी संघटनेत आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जातील. महायुतीत कसलीही कुरबूर नसून महायुती पूर्णपणे एकदिलाने आणि एकसंघाने काम करत आहे. निवडणुकांमध्ये थोडेफार मागे-पुढे झाले तरी वरिष्ठ नेते एकत्र बसून त्यावर योग्य तो मार्ग काढतील. धनगर आरक्षणासाठी दिल्लीत; 2 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता आपल्या दिल्ली दौऱ्याचे कारण स्पष्ट करताना गोपिचंद पडळकर यांनी सांगितले. धनगर आरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा विषय सध्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. येत्या २ तारखेला (२ नोव्हेंबर) हे प्रकरण न्यायालयात पटलावर लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आरक्षणासंदर्भातील कायदेशीर बाजू भक्कम करण्यासाठी वकिलांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी आलो आहे. याव्यतिरिक्त महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या पुरस्काराच्या नियोजनासंदर्भातील एका बैठकीसाठी दिल्लीत उपस्थित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ———————————————————- हेही वाचा… मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 13 हजार मतांनी आघाडीवर: पुणे शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीतून काँग्रेसचे जयंत आसंगावकर बाद महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या मतमोजणीचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आले नसले, तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. सविस्तर वाचा
Source link
दुष्काळमुक्तीसाठी 2 हजार कोटींची कामे सुरू!:गोपीचंद पडळकरांचा दावा, म्हणाले- काँग्रेसच्या कर्नाटकात फक्त अडीच हजार, मग विरोधकांकडून इथे राजकारण का?